भ्रूणहत्येचे कथानक
महा एमटीबी   02-Jun-2018कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा शपथविधी आणि त्यात सहभागी झालेले १५-२० पक्षाचे दुबळे नेते. त्यांनी एकमेकांत हात गुंफून उंचावले, तर विविध वाहिन्यांना विरोधी एकजुटीचे डोहाळे लागले होते.

गेल्या आठवड्यात दोन-तीनदा ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या चर्चेत सहभागी होण्याचा प्रसंग आला. वास्तविक मागल्या तीन वर्षांत वाहिन्यांच्या चर्चेत जायचे मी सातत्याने टाळत आलो आहे. कारण, नुसत्याच उखाळ्यापाखाळ्या काढल्या जातात आणि काही गंभीर चर्चा तिथे होत नाही. विविध पक्षांचे प्रवक्ते बोलावून, त्यांना एकमेकांच्या उरावर बसवणे, हा वाहिन्यांवरील चर्चेचा खेळ होऊन बसला आहे. त्यात पुन्हा इकडची वा तिकडची बाजू घेणार्या पत्रकारांनाच सहभागी करून घेतले जात असते. परिणामी, गडगडाट खूप होतो, पण प्रेक्षक म्हणून तो गोंधळ बघणार्‍यांच्या हाती काही लागण्यासारखे बोलले जात नाही. त्यालाच वैतागून मी अशा चर्चांपासून दूर राहायचे ठरवले होते. पण, आग्रहाखातर एखाद्यावेळी जावे, म्हणून अशा चर्चेत सहभागी झालो. विषय होता, कर्नाटकातील आघाडीचे यश किंवा भाजपचे फसलेले राजकारण. विषय कुठलाही असो, चर्चा बघणार्‍या-ऐकणार्‍याला त्यातून काही बोध मिळावा, अशी किमान माझी अपेक्षा आहे. पण, अशा कार्यक्रमात चर्चा कसली होती? तर कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा शपथविधी आणि त्यात सहभागी झालेले १५-२० पक्षाचे दुबळे नेते. त्यांनी एकमेकांत हात गुंफून उंचावले, तर विविध वाहिन्यांना विरोधी एकजुटीचे डोहाळे लागले होते. मी मागल्या अर्धशतकापेक्षा अधिक काळच्या राजकीय घडामोडी बघितल्या व अनुभवल्या आहेत. साहजिकच असे हात उंचावणार्‍यांची नियत मला पक्की ठाऊक आहे. म्हणूनच मला त्यांच्या एकजुटीविषयी कसलीही आस्था नाही की अपेक्षा नाही. पण, पत्रकारिता किंवा माध्यमात नव्याने आलेल्यांना जगात पहिलाच काही चमत्कार वाटला, तर माझा त्याविषयी आक्षेपही नाही. आपल्यालाच सत्य गवसले असल्याच्या थाटात चालणारा खुळेपणा, माझ्या गळ्यात घालण्याचा प्रयास मला आवडत नाही. मग तिथे झाले काय?

मी माझी मते स्पष्ट मांडल्यावर चर्चेचा नियोजक प्रसन्न जोशी याने माझ्यावर अतिशय खुळेपणाने काही गर्हणीय आरोप केले. ‘नव्याने आघाडी निर्माण होत असेल, तर त्या अर्भकाच्या नरडीला नख लावण्याचा करंटेपणा कशाला? इतका नतद्रष्टपणा कशाला?’ वगैरे शेलक्या भाषेत त्याने मला खडसावण्याचा प्रयत्न केला. अर्थात, त्याच्या पिढीची पत्रकारिता अशीच उथळ असल्याने त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हते. पण, त्याच्यावर उलटा ओरडून कल्लोळ माजवण्याची ऊर्जा माझ्यापाशी नव्हती, म्हणून मी पुढल्या टप्प्यात मला बोलण्याची संधी येईपर्यंत प्रतीक्षा केली. जेव्हा ती संधी मिळाली, तेव्हा मात्र उत्तर दिले. कारणही स्पष्ट होते. प्रसन्न किंवा तत्सम पिढीच्या पत्रकारांना महाविद्यालयातील प्रशिक्षण व पुस्तकांनी पत्रकारिता शिकवली आहे. प्रत्यक्ष घटनांचे आकलन करून त्याचे विश्लेषण करण्याची त्यांना गरज वाटत नाही. त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे, आपण काय बोलत आहोत आणि त्या शब्दांचा अर्थ काय होतो, त्याचाही त्यांना थांगपत्ता नसतो. साहजिकच लंबेचौडे शब्द फेकले, मग त्यांना आपण परखड, निर्भीड वगैरे झाल्याचे वांझोटे समाधान मिळत असते. उदाहरणार्थ, मी आघाडीच्या राजकारणाविषयी अनास्था दाखवली, तर त्यामुळेच आता उद्या विरोधकांची आघाडी मोडून पडणार असल्याच्या सुतकात जाण्याची प्रसन्नला काहीही गरज नव्हती. माझ्यासारखा निवृत्त पत्रकार व ब्लॉगर विरोधात गेला म्हणून आघाड्या मोडत नसतात किंवा कुणा संपादक-पत्रकाराच्या आशीर्वादाने कुठला पक्ष जिंकणार नसतो. पण, अशा नुसत्या कल्पनेने ‘अर्भकाची गर्भातच भ्रूणहत्या’ वगैरे बोलण्यापर्यंत मजल मारणार्‍यांना ‘भ्रूणहत्या’ म्हणजे तरी नेमके काय, ते ठाऊक आहे काय? नसेल तर बोलण्यापूर्वी समजून घेण्याचे तरी सौजन्य असायला नको काय? भ्रूणहत्या वा अर्भकाची हत्या कोणी येणारा-जाणारा परका करत असतो काय?

अवांच्छित अर्भकाची हत्या कोणी भलतासलता करू शकत नाही. त्या गर्भाची माता किंवा तिच्या कुटुंबातले लोकच अशा हत्या करीत असतात. अन्य कोणी त्यामध्ये सहभागी होत असेल, तर तो निव्वळ त्यातला मदतनीस असतो. त्यात त्याचा कुठला व्यक्तिगत हेतू असू शकत नाही. मातेला वा कुटुंबातल्याच लोकांना नको झालेले मूल म्हणून असे गर्भपात वा भ्रूणहत्या होत असतात. साहजिकच त्यातला कपाळकरंटेपणा वा नतद्रष्टता असेल, तर ती आप्तस्वकीयांची असते. नरडीला नख लावणारे त्या अर्भकाचे आप्तस्वकीय वा जन्मदातेच असतात. मग आजच्या गर्भात असलेल्या विरोधी एकजुटीची हत्या त्यांच्यापासून मैलोगणती दूर राहाणारा कोणी भाऊ वा अन्य पत्रकार, त्याच्या नरडीला नख कसे लावू शकतो? तसे करणे फक्त त्यात सहभागी असलेल्यांनाच शक्य आहे आणि आजवर तेच होत आलेले आहे. प्रसन्न जोशी वा त्याच्या पिढीचे अनेक निर्भीड पत्रकार आईच्या गर्भातही नव्हते किंवा तशी शक्यता असण्यासाठी त्यांच्या मातापित्यांचे विवाहही झालेले नव्हते; अशा काळात आघाडीचे राजकारण भारतात सुरू झाले. त्यातले एक म्होरके असलेले रिपब्लिकन चळवळीचे दांडगे पुढारी दादासाहेब गायकवाड तेव्हाच म्हणाले होते, “आघाडी म्हणजे गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली.” १९५५ सालात जन्माला आलेली देशातली पहिली सर्वपक्षीय आघाडी म्हणजे महाराष्ट्रातली संयुक्त महाराष्ट्र समिती होय. त्यात हिंदू सभेपासून कम्युनिस्टांपर्यंत सर्व बिगरकाँग्रेस पक्ष सामील झाले होते आणि तिला सुरुंग लावण्यात पुढाकार घेतला होता, ते प्रजासमाजवादी पक्षाचे नेते होते. थोडक्यात, नरडीला नख लावणारे कोण होते? तर समितीतल्या दोन मोठ्या पक्षापैकी एक असलेले समाजवादी. कुमारस्वामी त्या पक्षाचे आजचे वंशज आहेत. तिथून ही भ्रूणहत्या सुरू झाली आणि त्या परंपरेचे राखणदार कायम समाजवादी परिवारातले राहिलेले आहेत.

या नव्या पिढीच्या पत्रकारांना सोयीचा इतिहास व भूगोल शिकवला गेला असल्याने पुस्तकांपूर्वी जग नव्हते असाच त्यांचा समज आहे. मग त्यांना समिती का मोडली गेली ते तरी कशाला ठाऊक असणार? कम्युनिस्ट समितीवर कब्जा करीत असल्याने बेचैन झालेल्या समाजवाद्यांनी त्या आघाडीच्या नरडीला नख लावले आणि त्याचे कारण होते दूर युरोपातील हंगेरी नामक देशाचा पंतप्रधान इम्रे नाज! सोव्हिएत गटातील हंगेरीने त्या कम्युनिस्ट गोटातून बाहेर पडून, लोकशाही देश होण्याचा निर्णय घेतला. सोव्हिएत फौजांनी त्या देशात घुसखोरी करून, इम्रे नाज याचा मुडदा पाडला. त्यातून लोकशाहीचा मुडदा पाडणार्या कम्युनिस्टांचा निषेध करणारा प्रस्ताव समाजवादी गटाने मुंबई महापालिकेत आणला आणि ‘समिती’ नावाची आघाडी मारली गेली. आघाडीच्या गळ्याला नख लावण्यासाठी असे परदेशातील राजकीय हत्याकांड वा कारण पुरेसे ठरत असेल, तर पुढल्या काळात डझनावारी आघाड्या व मोर्चे कशाला मारले गेले, त्याची कारणे देण्याची गरज नाही. प्रत्येक वेळी अशा दिवाळखोरांनीच त्या आघाड्या उत्साहात उभ्या केल्या आणि गर्भधारणा झाली, मग त्या अर्भकाचे गर्भपात करून, घेतलेले आहेत. जनता पक्ष असो किंवा सतत एकत्र येऊन दुभंगत राहिलेले समाजवादी पक्ष असोत, त्यांच्या नरडीला नख लावण्याचे पाप त्यांनीच केलेले आहे. त्यांनीच प्रेमाची नाटके रंगवून, अनौरस संततीची गर्भधारणा करण्याचे पाप केलेले होते. पण ‘गर्भधारणा,’ ‘गर्भ,’ ‘अर्भक’ वा ‘नरडीला नख’ असले शब्द नेमके संदर्भासह ठाऊक नसलेल्यांना हे कोणी कसे समजावायचे? मिळाला शब्द की दे ठोकून, असला खळखळाट करण्याची पत्रकारिता आजकाल सोकावली आहे, तर त्यापासून दूर राहणे म्हणून मला शहाणपणाचे वाटते. अशा शहाण्यांच्या गर्दीत हरवून जाण्यापेक्षा अडाण्यांच्या गावात किती सुखाने जगता येते ना?