जॉर्ज फर्नांडिस आणि मी...
महा एमटीबी   02-Jun-2018 

मी अरुणा देशपांडे, एक सर्वसामान्य महिला. समाजात माझा परिचय अजिबात नसला तरीसुद्धा १९७८ ते २०१८ या ४० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीचे माझे आयुष्य, तुमच्याबरोबरच वाहते आहे. माझे पती, कै. जगदीश देशपांडे, १९७४च्या रेल्वे संपाच्या तयारीपासून तुमच्या सहवासात होते. मी नेहमी मजेने म्हणत असे, “साहेब, जगदीशने तुमच्या बरोबरच लग्न केले आहे.” मी असे म्हटले की, मिश्किलपणे माझ्यावर रोखलेली तुमची तीक्ष्ण नजर आणि आज कोणाचीही ओळख न पटणारी तुमची भावहीन नजर मनाला विदीर्ण करते.
 

साहेब, (म्हणजेच आदरणीय जॉर्ज फर्नांडिस) आज तुमच्या वयाला ८८ वर्ष पूर्ण होत आहेत.

८८ वर्षांच्या या कालावधीत सहा दशके आम्हा भारतवासीयांसाठी जगत असताना तुमची अनेकविध रूपे आम्ही बघितली. आज संपूर्णपणे अलझायमरच्या व्याधीने शांतपणे निपचीत पडलेल्या साहेबांची त्यांच्या जिवंतपणीसुद्धा दखल न घेणारा समाज बघितल्यानंतर, ‘मैत्री-स्नेह-माणुसकी,’ ‘सामाजिक मूल्यांची जाणीव’ वगैरे शब्दांची विफलता जाणवते, ही माझ्या मनातील सल आहे.

 

मी अरुणा देशपांडे, एक सर्वसामान्य महिला. समाजात माझा परिचय अजिबात नसला तरीसुद्धा १९७८ ते २०१८ या ४० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीचे माझे आयुष्य, तुमच्याबरोबरच वाहते आहे. माझे पती, कै. जगदीश देशपांडे, १९७४च्या रेल्वे संपाच्या तयारीपासून तुमच्या सहवासात होते. रेल्वेसंप आणि बिहारमधील माननीय जयप्रकाश नारायण यांच्या हरितक्रांती आंदोलनापासून तुम्हा दोघांचे नातं जोडले गेले. मी नेहमी मजेने म्हणत असे, “साहेब, जगदीशने तुमच्या बरोबरच लग्न केले आहे.” मी असे म्हटले की, मिश्किलपणे माझ्यावर रोखलेली तुमची तीक्ष्ण नजर आणि आज कोणाचीही ओळख न पटणारी तुमची भावहीन नजर मनाला विदीर्ण करते.

 

१९७७च्या आणीबाणी नंतरच्या निवडणुकीपासून २००४सालातील तुमच्या शेवटच्या निवडणुकीपर्यंत, तुमचा राजकीय आणि समाजकारणाचा संसार सांभाळण्यासाठी, जगदीश जास्त काळ बिहारमध्येच असायचा आणि मी, माझ्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी १९९८ सालापर्यंत मुंबईत नोकरी करीत राहिले. १९७८ ते १९९८ ही २० वर्षे मी तुम्हाला बघितले ते जगदीशच्या नजरेतून आणि तुमच्याबद्दलच्या त्याच्या कथाकथनातून... १९९८ सालापासून मी दिल्लीत तुमच्या घरी राहायला आल्यानंतर तुमचे लोहचुंबकासारखे व्यक्तिमत्व जवळून बघितलं, अनुभवले ज्याच्या आकर्षणातून मी आजही बाहेर पडू शकत नाही. अनेक वर्षे तुमचा वाढदिवस मी प्रथम ग्रीटिंग कार्ड पाठवून आणि नंतर काही वर्षे तुमच्या सहवासात साजरा केला. मागच्या वर्षीसुद्धा, काही ठराविक व्यक्तींसमवेत मीही त्यादिवशी तुमच्याबरोबर होतेच. पण, या वर्षी मात्र दिल्लीत तुम्हाला भेटण्यापेक्षा मला उमगलेला जॉर्ज आणि त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवावे म्हणून माझा हा खटाटोप सुरू असेल.

जॉर्जसाहेब, ६० वर्षांच्या तुमच्या प्रदीर्घ सामाजिक, राजकीय कारकिर्दीत तुम्ही ‘एक वादग्रस्त आणि धाडसी नेते’ म्हणूनच ओळखले गेले आहात. एकेकाळी मुंबईतील तुमची प्रतिमा ‘बंदसम्राट’ अशीच होती. १९५० ते १९६०च्या दशकांत; म्युनिसिपल मजदूर युनियन, बॉम्बे लेबर युनियन, टॅक्सी मेन्स युनियन अशा अनेक युनियन, संघटना नि चळवळी, तुमच्या मार्गदर्शनाखाली कष्टकरी आणि कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी निर्माण झाल्या. आजही त्या सर्व चळवळी कार्यरत आहेत. मला कदाचित पुरावे देता येणार नाहीत, पण कधीतरी वाटते की सर्वात जास्त सदस्य असणार्‍या अशा सर्व संघटनांचे नेतृत्व फक्त तुम्हीच केले असावेत. तुमचे ‘२०४, चर्नी रोड’ हे ऑफिस ‘चक्काजामचे ऑफिस’ म्हणून त्या काळी ओळखले जात होते.

 

१९६० नंतर आठ वर्षे तुम्ही मुंबईचे नगरसेवक होता. सर्वार्थाने ‘सेवकच.’ सामाजिक, राजकीय प्रतिष्ठेचा उपयोग करून, जमिनी हडप करणारे आणि नगरसेवक होताच मालामाल होणारे नगरसेवक आपल्या अवतीभोवती असतातच. पण, नगरपालिकेकडून मिळणारी विनामूल्य सदनिकासुद्धा तुम्ही नाकारलीत. कारण, नगरपालिका ही जनतेसाठी, त्यांची घरे बांधण्यासाठी असावी असे तुमचे स्पष्ट आणि आग्रही मत आजमितीस असा एकही नगरसेवक औषधांसाठीसुद्धा सापडणार नाही.

 

दैदीप्यमान कर्तृत्व आणि लोकमान्यता प्राप्त झालेल्या माननीय स. का. पाटलांना १९६७च्या निवडणुकीत हरविणेही गोष्ट किती अवघड होती याचे मूल्यमापन, आज न्यायनिष्ठ वृत्तीने राजकीय विश्लेषण करणारे विचारवंतच करू शकतील.

 

माझी आणि जगदीशची ओळख १९७४ सालात झाली. आमचा विवाह झाला तेव्हापासून आजपर्यंत ४० वर्षे माझे अनुबंध तुमच्याबरोबर जोडले गेले आहेत. १९७४ हे साल देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाचे परिवर्तनाचे वर्षच म्हणावे लागेल. त्यावर्षी तुम्ही All India Railway Federation' चे अध्यक्ष झालात. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पश्चिमेपासून पूर्वेकडील जनतेस एकमेकांस जोडणारी रेल्वे; पण रेल्वेत काम करणारा कामगारवर्ग मात्र त्या काळात हलाखीच्या परिस्थितीत होता. तुमचे धाडसी व्यक्तिमत्व, प्रखर वाणी, शब्दाशब्दांतून प्रतीत होणारी माणुसकी, दुसर्‍यांच्या व्यथा समजणारे तुमचे मन,१७ लाख रेल्वे कामगारांना उमगलं. त्यांनी तुम्हाला ‘नेता’ म्हणून स्वीकारले आणि जगाच्या इतिहासात ८ मे १९७४ या दिवशी पुकारलेल्या सर्वात देदीप्यमान २० दिवसांच्या रेल्वे संपाचे तुम्ही अधिपती झालात.

 

रेल्वे संपाची परिणती म्हणूनच २५ जून १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. आणीबाणीच्या काळात भूमिगत राहून, मुजोर आणि अविवेकी सरकार विरुद्ध लढणारा नेता तुम्ही एकटेच! इतर अनेक राजकीय पुढार्‍यांचे, देशातील विविध तुरुंग हेच जणू माहेर घर बनले होते.

 

साहेब, त्या आंदोलनादरम्यान तुम्ही रुळांवर झोपलात. पोलिसांनी तुम्हाला फरफटत ओढताना नकळत झालेल्या शारीरिक इजा आणि बसलेल्या मारामुळेच आज तुम्हाला अलझायमरसारख्या व्याधीशी सामना करायला लागत आहे याची जाणीव आम्हाला आहे.

 

साहेब, तुम्ही किती रात्री तुरुंगात काढल्या असतील हे, ते अविवेकी सरकारच सांगू शकेल; मात्र तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून तुमच्या सहवासात राहताना, तुरुंगातील रात्र आणि कॅबिनेट मंत्र्याच्या घरातील रात्र, यात तुमच्यासाठी काहीच फरक नव्हता हे मला मनोमन पटलं. तुम्ही संरक्षणमंत्री असतानाच्या काळात, तुरुंगात झालेला तुमचा छळ याबद्दलचे तुमचे अनुभव आणि रात्री जेवताना हसत हसत सांगितलेल्या कथा मी अनेक वेळा ऐकल्या आहेत. इतके सगळे अनुभव घेऊनही, तुमच्या मनात वैरभावनेला किंचितही स्थान नव्हते याची सतत जाणीव होत राहिली.

 

तुम्ही संरक्षणमंत्री असताना दिल्लीतील वास्तव्यात, तुम्हाला आवडेल ते जेवण करण्यासाठी स्वयंपाकाचे काम मला विलक्षण सुखाची अनुभूती देत असे आणि त्याच वेळी तुमच्या माणुसकीची विविध रूपे मी बघितली आहेत. केंद्रीय मंत्री किती आदर्श असावा, याचे सगुण-साकार उदाहरण म्हणजे साहेब तुम्हीच! दर बुधवारी सकाळी सात वाजता भारतीय संरक्षण दलाच्या तिन्ही प्रमुखांची बैठक तुमच्या ‘साऊथ ब्लॉक’मधील ऑफिसात असायची. एकदा तुम्ही सर्वांच्या आधी, म्हणजे ऑफिस उघडणार्‍या शिपायाच्याही आधी तिथे पोहोचलात, तो आल्यानंतर तुम्ही त्यांच्याच खुर्चीत बसून, त्यालाच कडक सॅल्युट केलेत. असा निगर्वी स्वभावाचा संरक्षणमंत्री, दिल्लीत त्या काळात फार लोकप्रिय झाला होता. मंत्री असताना ज्या ज्या व्यक्ती तुमच्या सहवासात आल्या त्यांचे आणि तुमचे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध जोडले गेले आहेत. ते ‘हलका प्रकरणा’शी, तुमचा संबंध असेल असे मानायला आजही कोणी तयारच नाही. अनेक राजकीय नेतेसुद्धा खाजगीत ते मान्य करतात.

 

विष्णू भागवत बडतर्फी भारतीय इतिहास नोकरशाहीला दिलेला पहिला धक्का जो तुम्हीच देऊ शकलात. या संदर्भात वर्तमानपत्रातील उलट-सुलट चर्चांना तुम्ही भीक घातली नाहीत, मात्र त्या घटनेचा अर्थ समजण्याइतकी वैचारिक क्षमता आज आपल्यात नाही.

 

एका बाजूला युनियन लीडर म्हणून कारकीर्द सुरू करून, कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत प्रत्येक ठिकाणी भारतीय राजकीय इतिहासात तुमचा ठसा उमटला आहे. फक्त आजच्या परिस्थितीत गरज आहे ती तो परिचय सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याची. सुरुवातीच्या काळात केंद्रीय उद्योगमंत्री असताना, जोपर्यंत देशातील गरीब जनतेस पिण्याचे पाणी मिळत नाही, तोपर्यंत कोकाकोला पिण्याची चंगळ आमच्या जनतेला परवडणारी नाही, असे ठासून म्हणत, कोकाकोलाला माहेरची वाट तुम्हीच दाखवलीत.

 

रेल्वेमंत्री असताना, जगातील सर्वात मोठा BOT- 'Build-Operate-Transfer' या संकल्पनेचा प्रयत्न यशस्वी करुन, भारताच्या समुद्रकिनार्‍याजवळून धावणारी कोकण रेल्वेची निर्मिती हा तुमच्या कारकिर्दीतील फार महत्त्वाचा निर्णय. लोकसहभागातूनच लोकहितकारी कामांवर श्रद्धा ठेवून कोकण रेल्वे बाँडतर्फे जमा केलेला निधी, ही संकल्पनाच त्या काळात सर्वांना अनाकलनीय होती. यातून आजच्या मंत्र्यांनी शिकवण घेण्यासारखे खूप काही दिलेत. मला व्यक्तिशः असे वाटते की, कोकण रेल्वेने प्रवास करणारा प्रत्येक माणूस तुमच्या उपकाराचे ओझे खांद्यावर ठेवूनच प्रवास करीत असणार.

 

फक्त देशातच नव्हे, तर मानविमूल्य जपण्यासाठी जे नागरिक संघर्ष करतात, त्या सर्व राष्ट्रांशी तुमची नाळ जुळली आहे. विश्वशांती गुरू दलाई लामा यांच्याबरोबर तुमचा स्नेह सर्वश्रुत आहे. मागच्या वर्षी तुमच्या वाढदिवसाच्या आधीच ते तुम्हाला भेटून गेले आणि वाढदिवसाच्या दिवशी भारतीयांपेक्षा तिबेटी स्नेही मंडळीच जास्त होती. मंत्र्याच्या घरातील ऑफिससाठी असणार्‍या खोल्यात ऑफिस स्टाफपेक्षा, आजारावर इलाजासाठी बिहारहून येणारी गरीब जनता, तिबेट आणि बर्मादेशासाठी काम करणारे चळवळे यांनीच ते घर भरलेले असायचे.

 

भारतातील आंदोलनापैकी कुठल्याही आंदोलनात तुमचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नाही असे झालेच नाही. ‘नर्मदा बचाव आंदोलन’, सुपारीवाले, तंबाखूवाले, नारळीबागा, गालीचा कामगारांच्या समस्या, विणकर, कुंभार... साहेब तुम्ही सर्वस्पर्शी होता, हे आजच्या पिढीला कळणारच नाही. साहेब, तुम्ही ते शिवधनुष्य खांद्यावर घेतलंत, अजूनही त्याचा आवाका आम्हाला समजत नाही.

 

साहेब, आज तुम्हाला मरणासन्न अवस्थेत बघताना डोळ्यातून नकळत अश्रू येतातंच. राजकीय परिस्थितीत प्रचंड उलथापालथ नेहमीच होत असते आणि आज देशातील परिस्थिती तर फारच विदारक आहे. साहेब, आज तुमच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. दुसर्‍यांना कमी लेखून, त्यांचा आलेख पुसायच्या ऐवजी, त्यांच्यापेक्षा मोठे होऊन दाखविणे हे किती राजकारणी नेते साध्य करून दाखवतील? ते पाहणे इतकेच आमच्या हातात आहे.

तुम्ही कुठलाही लढा वैयक्तिक पातळीवर लढला नाहीत. सर्व लढे समाजाभिमुख असल्यामुळे त्यात अयशस्वी व्हायचा प्रश्नच नव्हता. इतिहास हा भविष्यकाळाचा आरसा असतो वगैरे म्हणतात. आज तुमच्या त्या ८८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना परत एकदा, तो लढवय्या जॉर्ज अजूनही जिवंत आहे याची आठवण व्हावी म्हणून हा लेखनप्रपंच.

म्हणूनच मी तुम्हालाबिनचेहर्‍याचा नेता’ म्हणते कारण तुम्ही कधी, कसा, कुठला निर्णय घेता आणि घेऊ शकता हे तुम्हाला घडविणार्‍या परमेश्वरालासुद्धा माहित नसणार, कारण आता तो एक संपन्न इतिहास झाला आहे.

अरुणा देशपांडे