जगीश्रीमंत अॅमेझॉनवाला
महा एमटीबी   19-Jun-2018
१९८६ मध्ये प्रिंस्टन विद्यापीठामधून पदवी घेतल्यानंतर अनेक नोकऱ्या करत ते शेअर बाजारातील डी.ई. शॉ या संगणक कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट बनले. यानंतर त्यांनी या नोकरीला लाथ मारून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले. इंटरनेटचे वाढते जाळे पाहून त्यांनी ऑनलाईन व्यवसाय करण्याचे ठरवत १९९५ साली ऑनलाईन बुक साईट कंपनीची म्हणजेच ‘अॅमेझॉन डॉट कॉम’ची सुरूवात एका गॅरेजमधून केली.

 

आज घडीला जवळपास प्रत्येकाने 'अमेझॉन' हे नाव ऐकले असेल कारण, ऑनलाईन खरेदीच्या जगात हे नाव पहिला स्थानावर आहे. छोट्याशा गॅरेज मधून सुरु झालेली हि कंपनी जगभरात ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. यामुळे कंपनीचा दिवसेंदिवस ग्राहक वर्ग वाढत आहे परिणामी कंपनीचा कारभार देखील वाढत आहे. याचीच प्रचिती आपणास फोर्ब्सने सोमवारी जाहीर केलेल्या ‘द वर्ल्ड बिलियनेयर्स लिस्ट’मध्ये पाहायला मिळते. या यादीत अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी माइक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकत पहिले स्थान पटकावले . फोर्ब्सच्या ‘द वर्ल्ड बिलियनेयर्स लिस्ट’ नुसार त्यांची संपत्ती १४१.९ अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजेच ९.६ लाख कोटी रुपये झाली आहे. फोर्ब्सच्या यादीत बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर वॉरन बफेट तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

 

फोर्ब्सने जाहीर केलेल्या अद्यावत आकडेवारीनुसार,बेझोस यांनी फक्त १८ दिवसांत आपल्या संपत्तीमध्ये तब्बल ३४ हजार कोटी रुपयांची वाढ केली. एवढेच नव्हे, तर त्यांच्या एकूण संपत्तीचा विचार केल्यास ते इतिसाहातील सर्वात धनाढ्य व्यक्ती बनले आहेत. आजपर्यंत कोणाच्याही नावावर एवढी संपत्ती नव्हती म्हणजेच जेफ बेझोस यांनी इतिहास घडवला आहे. यापूर्वीही ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सने २०१८ च्या आकडेवारीत सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांना संबोधले होते. आता फोर्ब्सच्या नव्या यादीतही ते इतिहासातील सर्वात धनाढ्य व्यक्ती ठरले आहेत. दुसऱ्या नंबरवर असणारे बिल गेट्स आणि जेफ बेझोस यांच्या संपत्तीची तफावत पाहिल्यास ४९ बिलियन डॉलरने बिल गेट्स मागे आहेत. त्यांची एकूण संपत्ती ९२.९ अब्ज डॉलर आहेत तर वारेन बफेट ८२.३ अब्ज डॉलर आहे. या आकडेवारीतील तफावत पाहता आणि अमेझॉन कंपनीचा वाढता कारोभार पाहता पुढील काही महिने बेझोस यांचा पहिला क्रमांक अबाधित राहील अशी शक्यता जागतिक बाजारात व्यक्त केली जात आहे.

 

जगाच्या इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले जेफ बेझोस यांचा जीवनप्रवासही असाच चढता उतरता ठरला आहे. १९८६ मध्ये प्रिंस्टन विद्यापीठामधून पदवी घेतल्यानंतर अनेक नोकऱ्या करत ते शेअर बाजारातील डी.ई. शॉ या संगणक कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट बनले. यानंतर त्यांनी या नोकरीला लाथ मारून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले. इंटरनेटचे वाढते जाळे पाहून त्यांनी ऑनलाईन व्यवसाय करण्याचे ठरवत १९९५ साली ऑनलाईन बुक साईट कंपनीची म्हणजेच ‘अॅमेझॉन डॉट कॉम’ची सुरूवात एका गॅरेजमधून केली. तीही फक्त तीन कॉम्प्युटरच्या साहाय्याने. सुरुवातीला ते फक्त पुस्तक विक्री करायचे मात्र पुस्तक विक्रीला वाढता प्रतिसाद पाहता नंतर त्यांनी या साईटवर डीव्हीडी, सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे इत्यादी गोष्टीही विकायला सुरुवात केली. आज या ऑनलाईन रिटेल साईटवर प्रत्येक गोष्ट विक्रीस उपलब्ध आहे. जगातील सर्वात मोठी नदी अॅमेझॉन प्रमाणे आपली कंपनी मोठी व्हावी अशी त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी या कंपनीचे नाव ‘अॅमेझॉन डॉट कॉम’ ठेवले होते आणि आज त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे.