नावात काय नसते?
महा एमटीबी   19-Jun-2018
 

 
 
जगविख्यात नाटककार विल्यम शेक्सपिअर याने नावात काय असते? असा उल्लेख केला होता. नावावरून नव्हे, तर व्यक्तीच्या कर्तृत्वावरून त्याची ओळख निर्माण होते. परंतु नावातच बरेच काही असते. नावावरुन कशा प्रकारे वादंग निर्माण केले जातात याचा प्रत्यय गेल्या आठवड्यात जामनेर तालुक्यातील वाकडी येथे घडलेल्या घटनेतून दिसून आला. सामान्यत: आडनावावरून जात ठरविण्याचा दुर्दैवी प्रकार भारतात घडत असतो. नावावरून जातीचा अंदाज घेऊन जातीय तेढ निर्माण करण्याचे निंदाजनक कृत्य धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारे नेते कसे करतात हे गेल्या आठवड्यात सिद्ध झाले आहे.
 
जामनेर तालुक्यातील वाकडी येथे मागास समाजाच्या दोन अल्पवयीन मुलांना विहिरीत पोहण्याच्या कारणावरुन मागास समाजाच्याच मुलांनी मारहाण केली होती. या मारहाणीचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आरोपींकडे अपराधी म्हणून समाज पाहतो. पण आरोपींपैकी एकाचे आडनाव जोशी होते आणि विहीरसुद्धा त्यांच्याच शेतातील असल्याने कोणतीही माहिती न घेता सवर्ण विरुद्ध दलित असा अपप्रचार नागरिक, लोकप्रतिनिधी व माध्यमांनी केला. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनीही अपूर्ण माहितीच्या आधारे वाकडी येथील घटनेचा निषेध करून हा सवर्णांकडून असवर्णांवर झालेला अत्याचार असून, हे भाजप व संघाचे कारस्थान असल्याचे सोशल मीडियावर जाहीर करून टाकले. दुर्दैवाने सोशल मीडियावरसुद्धा जोशी हे आडनाव ब्राह्मण समाजातील आहे, असे गृहित धरूनच वाकडी घटनेला जातीय रंग देण्यात आला. जातीचे राजकारण करणार्‍या पक्षांना तर आयते कोलितच मिळाले होते. पण जेव्हा या घटनेतील आरोपी जोशी हे सुद्धा मागास जमातीतील असल्याचे स्पष्ट झाले तेव्हा जातीय तेढ निर्माण करणार्‍या राजकीय पक्षांचा आणि बुद्धीजिवींचा हिरमोड झाला. तोपर्यंत उशीर झाला होता. ज्या गावात कायम जातीय सलोखा आहे, अशा वाकडी गावाचे नाव देशपातळीवर बदनाम झाले होते.
 
कथित बुद्धीवंतांनी त्यांच्या अकलेचे तारे तोडून टाकलेले होते. यापेक्षाही माध्यमे (प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स) त्यांचे कर्तव्य विसरून केवळ टीआरपी खेचण्यासाठी वस्तुस्थितीला धरून नसलेली खोटी माहिती कशी प्रसिद्ध करतात आणि जातीय सलोखा टिकविण्यापेक्षा त्याचे विभाजन कसे करता येईल यासाठी प्रयत्न करतात हे उघड झाले. गल्लीतील बुद्धीजिवींपासून जिग्नेश मेवाणीपर्यंत अनेकांच्या वाकडीबद्दल प्रतिक्रिया माध्यमांनी घेतल्या. जेव्हा आरोपी आणि पीडित दोन्ही मागास समाजाचे आहेत हे उघड झाले तेव्हा चॅनेलवाल्यांनी हळूहळू काढता पाय घेतला. म्हणून नावात काय? तर नावात काय नसते... त्यावरून काहीही होऊ शकते हे कथित धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष, बुद्धीजिवी आणि समाजसेवकांनी दाखवून दिले.
 
 
 
- निलेश वाणी (८८८८८७७६१०)