अन्नदाता राजेंद्रन
महा एमटीबी   18-Jun-2018 

भुकेल्या पोटी कुठलेच तत्त्वज्ञान पचनी पडत नाही असे म्हणतात. भुकेल्यांना अन्न देण्याचे महत्कार्य म्हैसूरचे राजेंद्रन करत आहेत. अन्न वाया जाऊ नये, तसेच ते गरजवतांच्या ताटात पडण्यासाठी त्यांचे कार्य सुरू आहे.
 

आपण समाजाचे काही देणे लागतो याचा विचार करणारी मंडळी तशी कमीच. जगात चांगल्या माणसांची उदाहरणे तशी कमी, सापडत नसतील तर तुम्ही व्हा. असाच एक चांगला आणि समाजाचा विचार करणारा व्यक्ती म्हणजे राजेंद्रन. राजेंद्रन हे गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करतात. राजेंद्रन यांचे वैशिष्ट्य असे की ते स्वतः स्वयंपाक बनवून लोकांमध्ये वाटत नाही. जिथे अन्न वाया जाईल अशा ठिकाणी ते अन्न मिळवतात आणि ते गरजूंमध्ये वाटून टाकतात.

 

हा प्रवास साधा सरळ नव्हता. एके दिवशी राजेंद्रन एक लग्न आटोपून घरी जात होते. तेव्हा बरेच अन्न वाया गेलेले पाहून, त्यांना वाईट वाटले. यासाठी काय करता येईल याचा विचार त्यांच्या मनात घोळत होता. आणि सुरू झाला अन्नदानाचा महायज्ञ. राजेंद्रन हे सरकारी कर्मचारी. आठवड्याचे पाच दिवस ते काम करतात आणि इतर दोन दिवस हे समाजकार्य करतात. त्यांची काही उद्दिष्टे आहेत. त्यापैकी म्हणजे कोणीही उपाशी राहता कामा नये. तसेच अन्नाचे महत्त्व लोकांना कळण्यासाठी त्यांच्यात जनजागृती करणे. आज आपला देश प्रगती करत आहे. भारत ही जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. असे असताना आजही आपल्या देशात मोठ्या प्रमाणात गरीबी आहे. दोन वेळच्या अन्नासाठी काही लोकांना मोठा संघर्ष करावा लागतो.

 

भारतात दरवर्षी ४४ हजार कोटी रुपयांचे अन्न वाया जातं. राजेंद्रन यांनी गरजू आणि दाते यांच्यातील दरी मिटवण्याचे कार्य केले आहे. त्यांनी प्रत्येक ठिकाणी होणार्‍या संमारंभातील लोकांशी संपर्क साधला. यात लग्न, साखरपुडा, स्नेहभोजन यासारखे समारंभ तर होते. तसेच मोठे मोठे हॉटेल्सशीही त्यांनी संपर्क साधला. त्यांनीही हे अन्न वाया जाऊ नये म्हणून ते स्वखुशीने राजेंद्रन यांच्या हवाली केले. सकाळी साडे सात ते रात्री ११ वाजेपर्यंत ठिकठिकाणहून त्यांना अन्न घेऊन जाण्यासाठी फोन येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नाची उपलब्धता होत होती, पण त्याच्या वितरणाचा प्रश्न होता. पण हे काम वाटते तितके सोपे नव्हते. त्याचे कारण अन्न हे शेवटी नाशिवंत पदार्थांमध्ये मोडतं. ते वेळेवर पोहोचले तरच ते खाता येतं. अन्यथा ते खराब होऊन खाण्यायोग्य राहत नाही. म्हणजेच अन्नाचे वितरण हा त्यातला प्रमुख भाग. राजेंद्रन यांनी यावर मार्ग काढत वाहने भाड्याने घेण्यास सुरुवात केली. राजेंद्रन दोन फूड व्हॅनच्या माध्यमातून अन्न गरजूंपर्यंत पोहोचवतात. त्यात त्यांना दोन मदतनीस आणि त्यांची पत्नी मदत करते. पूर्वी तुरळक ठिकाणांहून त्यांना अन्न नेण्यासाठी पाचारण केले जायचे. आज दिवसाला त्यांना ५०-६० ठिकाणांहून फोन येतात. हे सर्व अन्न म्हैसूर रेल्वे स्थानक जवळील गरजूंना दिले जाते. तसेच शहरातील झोपडपट्टीतील लोकांनाही हे अन्न पुरवले जाते. जेवण वेगवेगळ्या ठिकाणांहून आणलेले असल्याने त्यातही वैविध्य असते. भात, सांबर, बिर्याणी, पुलाव आणि कधी कधी गोडधोड ही या जेवणात असतं. कधी तरी असे चांगले जेवण मिळाल्याने खाणारेही खुश असतात.

 

जेवण बनवण्याचा खर्च जरी त्यांना करावा लागत नसला, तरी वितरणाचा खर्च त्यांना करावा लागतो. तसेच अन्न एका ठिकाणी आणून ते ठिकठिकाणी त्याचे वितरण करण्यासाठी एका जागेची गरज होती. यासाठी त्यांनी म्हैसूरमध्ये एक जागा भाड्याने घेतली आहे. याच ठिकाणी सगळे अन्न जमा केले जाते. याच जागेवर फूड व्हॅनचे चालक आणि राजेंद्रन यांचे मदतनीस विश्रांती घेतात. हे सर्व कार्य करण्यासाठी राजेंद्रन यांना महिन्याला ५५ ते ६० हजार खर्च होतो. राजेंद्रन फक्त अन्नदाते नसून, पर्यावरण प्रेमीही आहेत. दक्षिण भारतात केळीच्या पानात जेवण्याची पद्धत आजही आहे. त्यामुळे प्लास्टिकची ताटं वापरली जात नाहीत, पण ज्या भुकेल्या लोकांना जेवणाची भ्रांत त्यांच्याकडे भांडी नसणारच. म्हणून जेव्हा जेव्हा ही केळीची पाने अन्न देणार्‍यांकडून उपलब्ध नाही झाली, तर राजेंद्रन स्वतःच्या खिशातून त्याचा खर्च उचलतात.

 

राजेंद्रन हे एक सामान्य कर्मचारी. ते काही गर्भश्रीमंत नाही. या सगळ्या कार्यासाठी जो खर्च येतो, ते नेहमी त्यांना परवडतोच असे नाही. यासाठे त्यांनी अक्षया आहार फाऊंडेशनया संस्थेची सुरुवात त्यांनी केली. आपण कुठल्याही राज्यात असलो तरी त्यांना मदत करता येईल. त्याचे कारण त्यांचे कार्य हे मानवतावादी आहे. भुकेल्या पोटी कुठलेच तत्त्वज्ञान पचनी पडत नाही, असे म्हणतात. अन्नदानाचे असे महत्कार्य ते करत आहे. आपल्यालाही त्यांना मदत करायची असल्यास त्यांना तुम्ही 9886145969 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.