माणूसपणाची संवेदना जपणारा...
महा एमटीबी   18-Jun-2018

 


शेतकऱ्याचे पुत्र असलेले नितीन यांनी लहानपणी जवळून गरिबी पाहिली, तिचे चटके भोगले. त्यामुळे गरीब कामगाराला कोणत्या यातनांतून जावे लागते, किती लाचारी पत्कारावी लागते, याची जाणीव त्यांना होती.
 

“आठवले गुरुजींचे ‘स्वाध्याय’चे शिबीर गुजरातला होते. मी आईबरोबर गेलो होतो. आठवले गुरुजींची तब्येत ठीक नसल्यामुळे सगळे शिबीर गुरुजींच्या मुलीने म्हणजे दीदीने सांभाळले होते. दीदी मार्गदर्शन करत होत्या. आपण जसे माणूस आहोत, आपल्याला जशा भावना, मन असते, त्या भावना, ते मन दुसऱ्यालाही असते. मग तो स्त्री असू दे की पुरुष, मग तो बाल असू दे की वृद्ध. हे जो समजला, हे जो जगला, तोच माणूस... मी धुळ्याच्या दोंडाईचा गावचा. दीदीने यशस्वरित्या सांभाळलेले ते शिबीर पाहून स्त्रीशक्तीच्या, बुद्धीच्या आविष्काराची ओळख माझ्या मनात रूजली...” जांबोरी मैदान, वरळीच्या कामगार कल्याण केंद्राचे अधिकारी नितीन विक्रम पाटील सांगत होते. ‘माणूस’ म्हणून घडताना नितीन यांनी गुजरातच्या ‘स्वाध्याय’ शिबिराची आठवण सांगितली. अर्थात जे सांगितले, त्यानुसार ते जीवन जगत आहेत, यातच त्यांच्या माणूसपणाचा अर्थ दडला आहे.

 

नितीन पाटील यांच्याकडे आज मुंबई शहरातील दहा भागांचे कामगार कल्याण केंद्रांचे काम आहे. संघटित क्षेत्रातल्या कामागारांच्या कल्याणासाठी सरकारी योजनांच्या कार्यवाहीसाठी जागृती करणे, अंमलबजावणी करणे हे त्यांचे रूढार्थाने काम. पण, त्यापलीकडे जाऊन नितीन पाटील, एक माणूस म्हणून कामगारबंधुंच्या जीवनात सरकारी योजना कशा उपयोगात येतील, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. धारावी, प्रभादेवी, चिंचपोकळी, करीरोड, माझगाव, वरळी भाग हे त्यांचे कार्यक्षेत्र. तसे पाहिले तर मुंबई म्हणजे संघटित आणि असंघटित कामगारांचे आगार. या कामगारांसमोर सरकारी योजनांचे सादरीकरण करणे हे काम सोपे नाही. कारण, मुळात मालकवर्गाला कामगारांसाठीच्या सरकारी योजना आपल्या आस्थापनात राबवाव्यात, असे वाटले पाहिजे ना? नेमके याचसाठी नितीन पाटील हा धुळ्याचा तरुण काम करतो.

 

धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, नागपूर मजल दरमजल करत नितीन २०१३ साली मुंबईचे रहिवासी झाले. नितीन यांच्या बोलीतला अहिराणी भाषेचा बाज आजही प्रकर्षाने जाणवतो. शेतकऱ्याचे पुत्र असलेले नितीन यांनी लहानपणी जवळून गरिबी पाहिली, तिचे चटके भोगले. त्यामुळे गरीब कामगाराला कोणत्या यातनांतून जावे लागते, किती लाचारी पत्कारावी लागते, याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या कोणत्याही कामगाराचे कल्याणाचे काम नियमानुसार तर होईलच, पण त्यापलीकडे जाऊन त्या कामगाराला काही समुपदेशन, मदत हवी असेल तर नितीन वेळेचे बंधन पाळत नाहीत.

 

नितीन पाटील यांच्या जीवनाची ही एक बाजू झाली. दुसरी बाजू अशी की, नितीन यांचे वडील विक्रम हे शेतकरी होते. पण, त्यानंतर चळवळीतून पुढे येत ते नगरसेवकही झाले. घरी कार्यकर्त्यांचा राबता वाढला. राजकीय वातावरण तरुणपणीच पाहिले. मात्र, नितीन यांनी ‘डॉक्टरचा मुलगा डॉक्टर’ आणि ‘नेत्याचा मुलगा नेता’ या आयामाला छेद दिला. त्यांनी कला शाखेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ते करत असतानाच सरकारी नोकरी म्हणून कामगार कल्याण केंद्रामधली नियुक्ती स्वीकारली. याबाबत सांगताना नितीन म्हणतात, “मला इंजिनिअर व्हायचे होते, पण शिक्षणाचा खर्च परवडू शकत नव्हता म्हणून शिक्षणाची दिशा बदलली. त्यावेळी मला वाटे, जन्माने असलेली माझी जात खुल्या प्रवर्गातली आहे. त्यामुळे मला शिक्षणाचा खर्च करावा लागणार होता. पुढे माझी जात इतर मागासवर्गीय प्रवर्गात समाविष्ट झाली. आता कामगारांचे कल्याणासंबंधीचे काम सरकारी माध्यमातून करत असताना वाटते की, भारतीय म्हणून लोकांच्या प्रगतीसाठी आणि कल्याणासाठी जातीपातीच्या भेदापेक्षा आणि राजकारणापेक्षा माणूस म्हणून जगणे आणि दुसऱ्याला माणूस म्हणून समजून घेणे, हीच एक मोठी उपलब्धी आहे.”

 

नितीन यांची पत्नी माया या उच्चशिक्षित आहेत. मायांचे कर्तृत्वही मोठे आहे. पण यामध्येही नितीन यांचे माणूसपण उठून दिसते. परंपरेनुसार हुंडा-मानपान या गोष्टी सर्वमान्य. पण नितीन यांनी हुंडा घेऊ नये, देऊ नये ही भूमिका कायम ठेवली. विवाह झाल्यानंतर त्यांनी बी.एड्. झालेल्या मायांना एमपीएससी परिक्षेसाठी प्रोत्साहित केले. गावासाठी हे आक्रितच होते. नगरसेवकाच्या सुनेने आणि सरकारी बाबूच्या बायकोला शिकून काय करायचे? त्यावेळी कुणालाही न जुमानता नितीन यांनी ठरवले की मायाने शिक्षण पूर्ण केलेच पाहिजे. माया एमपीएससी पास झाल्या. पुढे पास झाल्यानंतर त्यांची नियुक्ती पोलीस खात्यात झाली. त्यावेळी तर सगळ्यांचे म्हणणे चांगल्या घरच्या बाईमाणसाने पोलीस खात्यात काम करू नये. पण इथेही नितीन यांनी बिलकुल माघार घेतली नाही. मायाच्या कर्तृत्वाला त्यांनी आपला विश्वास जोडला. नितीन म्हणतात, 'गावी दहावी-बारावीलाच मुलींची लग्नं लावतात. पुढे त्यांचे काय होते, हे देवाच्या भरवशावर. सासर, नवरा चांगला असेल तर ठीक, नाहीतर... त्यामुळे मायाने विवाहानंतर एमपीएससी पास केल्यामुळे गावामध्ये एक जागृती झाली की, लग्न झाले म्हणजे मुलीचे शिक्षण संपले असे नाही, तर विवाहानंतरही ती जोडीदाराशी समन्वय करून आयुष्य घडवू शकते.'

 

गरीब शेतकऱ्याचा मुलगा ते प्रस्थापित नेत्याचा मुलगा, पुढे सरकारी व्यवस्थेत जबाबदारीचे काम असा आयुष्याचा प्रवास होत असताना, नितीन पाटील यांनी प्रत्येक स्तरावर माणूसपणाची संवेदना जपली. ज्या माणूसपणाच्या संवेदनशीलतेची गरज आज सर्वत्र आहे.

9594969638