भारत-अफगाण कसोटी : भारताचा पहिला डाव ४७४ धावांवर संपुष्टात
महा एमटीबी   15-Jun-2018बंगळूरू : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात बंगळूरू येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी भारताचा डाव ४७४ धावांवर संपुष्टात आला आहे. शिखर धवन आणि मुरली विजय यांच्या दमदार शतकी तर हार्दिक पंड्या याच्या ७१ धावांच्या खेळीवर भारताने ही मजली मारली आहे.
आज सकाळी भारताने ६ बाद ३४७ धावांवर आपल्या दुसऱ्या दिवशीच्या खेळला सुरुवात केली. यावेळी भारताकडून हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा हे दोघे मैदानात खेळत होते. खेळाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच जडेजाला १८ धावांवर परत पाठवण्यात अफगाण गोलंदाजाना यश आले. यानंतर हार्दिक पंड्या (७१), आर. अश्विन (१८) आणि उमेश यादव २६  धावांवर बाद झाले. 

बंगळूरूमधील चिनाम्मास्वामी मैदानावर काल सकाळी या सामन्याला सुरुवात झाली होती. सामन्याच्या सुरुवातीला भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताकडून प्रथम मुरली विजय आणि शिखर धवन ही जोडी मैदानात उतरली होती. यावेळी शिखर धवनने आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये जबरदस्त खेळी करत ९६ चेंडूंमध्ये १०७ धावांची खेळी केली. तर त्यापाठोपाठ मुरली विजय याने देखील धवनच्या पावलावर पाऊल ठेवत १०५ धावांची शतकी खेळी केली. यामुळे काल दिवसअखेरपर्यंत भारताचा डाव हा कमालीचा मजबूत झाला होता. या दोघांच्याही शतकी खेळीमुळे पहिल्या ५० षटकांमध्येच भारताच्या २ बाद २८० धावा झाल्या होत्या.
यानंतर आलेल्या खेळांडूपैकी लोकेश राहुल (५४), चेतेश्वर पुजारा (३५),अजिंक्य राहणे (१०) आणि दिनेश कार्तिक (४) यांच्या खेळाच्या बळावर पहिल्या दिवशी भारताने ६ बाद ३४७ धावा केल्या होत्या. या बदल्यात अफगानिस्तानकडून यामीन अहमदझाई याने एकट्याने भारताचे तीन बळी घेतले आहेत. तसेच रशीद खान आणि वफादार या दोघांनी प्रत्येकी दोन दोन बळी घेतले आहेत.