वीरेंद्र सेहवागमुळे सिहोरची ही 'सुपरवुमन' झाली प्रसिद्ध
महा एमटीबी   15-Jun-2018

 
मुंबई :  अनेकदा आपल्यासमोर अनेक असे व्हिडियोज येतात ज्यामुळे आपल्याला या न त्या रुपाने काहीतरी प्रेरणा मिळते. काही व्हिडियोज फेक म्हणजेच खोटेही असतात. मात्र काही सामान्यातील सामान्य लोकांचे खरे व्हिडियोज आपल्याला नक्कीच प्रेरित करतात. असाच एक व्हिडियो प्रसिद्ध क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने आपल्या ट्विटर खात्यावरुन शेअर केला आहे. यामध्ये मध्यप्रदेशच्या सिहोर येथील एक महिला टाईपरायटरवर अनन्य साधारण गतीने टाईप करताना दिसतेय. कौतुकाची बाब म्हणजे ही महिला ७२ वर्षांची आहे. आणि या वयात देखील तिने तिचे कृत्व सिद्ध केले आहे. वीरेंद्र सेहवागच्या या व्हिडियोमुळे या महिलेला प्रसिद्धी मिळाली आहे.
 
 
 
 
लक्ष्मी बाई असे या महिलेचे नाव आहे. वीरूने तिचे कौतुक करत लिहीले आहे की, "ती माझ्यासाठी एक 'सुपरवुमन' आहे. ती मध्यप्रदेशच्या सिहोर येथे राहते आणि युवापिढीने तिच्याकडून शिकण्यासारखे भरपूर काही तिच्यात आहे. केवळ गतीच नाही तर जिद्द काहीतरी नवीन शिकण्याची. तिने सिद्ध केले आहे की कुठलेही कार्य छोटे नसते आणि नवीन काहीतरी शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते. अशा या मातेला माझा प्रणाम." असे म्हणत सेहवागने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.मी भीक मागणार नाही, कर्ज फेडण्यासाठी करतेय ही नोकरी :सेहवागच्या या ट्वीटनंतर अनेक माध्यमांनी या महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधत, "मी माझे कर्ज फेडण्यासाठी हे कार्य करते. काही काळाआधी माझ्या मुलीला अपघात झाला, त्यामुळे मी हे कार्य करतेय. मला भीक मागायची नाहीये, मला ही नोकरी डीसी रघुवेंद्र सिंह आणि एसडीएम भावना विलंबे यांच्यामुळे मिळाली. मला आनंद आहे की वीरेंद्र सेहवाग यांनी हा व्हिडियो शेअर केला, मला स्वत:चं घर करण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी पैशांची गरज आहे." अशा शब्दात लक्ष्मीबाई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 
वयाची मर्यादा न ठेवता लक्ष्मीबाई यांनी युवापिढीला खूप काही शिकवले आहे. या व्हिडियोमुळे मिळालेल्या प्रसिद्धीने त्यांच्या समस्या सुटलीत अशी आशा नेटकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.