भारत-अफगाणिस्तानमधील कसोटी सामन्याला सुरुवात
महा एमटीबी   14-Jun-2018

नाणेफेक जिंकून भारताच्या फलंदाजी करण्याचा निर्णय
बंगळूरू :
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्याला आज बेंगळूरू येथे सुरुवात झाली आहे. सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारताकडून मुरली विजय आणि शिखर धवन ही जोडी सलामीसाठी उतरली आहे.
 
बंगळूरूमधील चिनाम्मास्वामी मैदानावर या सामन्याला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य राहणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज मैदानात उतरला आहे. भारताकडून मुरली विजय आणि शिखर धवनने उत्तमपणे भारताच्या डावाला सुरुवात केली आहे. तसेच अफगानिस्तान संघाने देखील कर्णधार असगर स्टानिकझेच्या नेतृत्वाखाली आपल्या खेळाला उत्तम प्रकारे सुरुवात केली आहे.

 
 
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात हा एकमेव कसोटी सामना घेतला जाणार आहे. अफगाणिस्तान संघाचा हा भारताविरोधातील पहिलाच कसोटी सामना असल्यामुळे अनेकांसाठी हा सामना म्हणजे एक विशेष पर्वणी ठरणार आहे. भारताविरोधातील या पहिल्याच सामन्यासाठी अनेकांनी अफगाणिस्तान संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या सामन्यासाठी दोन्ही संघाना शुभेच्छा दिल्या असून खेळाच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.