त्यांना गवसला यशाचा मार्ग
महा एमटीबी   14-Jun-2018शैक्षणिक पात्रता फक्त दहावी असताना देखील एक कामगार म्हणून दाखल झालेल्या मंजुळा वाघेला त्याच संस्थेचा सर्वेसर्वा बनून, अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

 

उच्च शिक्षणाने विचार प्रगल्भ होतात, नवा दृष्टिकोन तयार होतो, ही बाब खरी असली, तरी शिक्षणाची शिदोरी जवळ नसली, म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच करू शकत नाही, असा अर्थ होत नाही. अहमदाबादमध्ये राहणाऱ्या दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या मंजुळा वाघेला या ६० वर्षीय महिलेने चारशे महिलांना रोजगार मिळवून देण्याची वाट मोकळी करून दिली आहे. ‘सौंदर्य सफाई उत्कर्ष महिला सेवा सरकारी मंडळ लिमिटेड’ नावाच्या को-ऑपरेटिव्हच्या सर्वेसर्वा मंजुळा या एके काळी शहरांच्या रस्त्यांवर कचरा वेचून, दिवसभरात पाच रुपये कमवायच्या, मात्र आज त्यांच्या संस्थेची एकूण उलाढाल (टर्नओव्हर) ६० लाखांपर्यंत गेली आहे.

 

मंजुळा वाघेला यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा उपभोग घेण्यासाठी त्यांना संर्घषाला सामोर जावं लागलं होतं. एका लहानशा खोलीमध्ये मंजुळा यांचे आई-वडील आणि सहा भावंडं असं कुटुंब राहत होतं. मंजुळा यांना लहानपणापासूनच शिक्षणामध्ये विशेष रुची होती. गिरणी कामगार असलेल्या वडिलांच्या उत्पन्नातून प्राथमिक गरजा भागवणे कठीण होत चालले होते. त्यामुळे दहावीनंतरचे पुढचे शिक्षण घेणे आपल्याला परवडणार नाही असे स्पष्टपणे मंजुळा यांच्या वडिलांनी सांगितले. त्यामुळे नाईलाजाने त्यांना शिक्षण थांबवावे लागले, पण नुसतं घरी बसून काय करणार, या विचाराने त्यांनी चार पैसे कमावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कचरा वेचण्याचे काम करायला सुरुवात केली. या कामातून त्यांना केवळ पाच रुपयांचा मोबदला मिळत होता. काही दिवस गेल्यानंतर त्यांना कामातून मिळणारा मोबदला अपुरा पडत आहे, याची जाणीव झाली, परंतु शैक्षणिक पात्रता दहावी आणि गाठीशी कोणत्याच कामाचा अनुभव नसल्याने आपल्याला कोण काम देणार, अशी काहीशी मनस्थिती त्यांची झाली होती. याच दरम्यान महिला सबलीकरणाशी निगडीत असलेल्या ‘सौंदर्य सफाई उत्कर्ष महिला सेवे’सोबत त्यांचा संपर्क आला आणि त्या या संस्थेच्या सदस्या झाल्या. या संस्थेमध्ये अनेक प्रकारची मंडळेदेखील होती, जी वेगवेगळ्या प्रकारची कामे करत होती. साधारण १९८१ मध्ये स्थापन करण्यात आलेली ‘सौंदर्य सफाई उत्कर्ष महिला सेवा सहकारी मंडळ लिमिटेडला’ मंडळांमध्ये स्थान देण्यात आले. हे मंडळ शहरातील विभिन्न शासकीय आणि अशासकीय कार्यालयात साफसफाईचे काम करत असे.

 

मंजुळा सांगतात की, अहमदाबादच्या ‘नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिजाईन’ येथे मी पहिल्यांदा साफसफाई आणि झाडू मारण्याचे काम केले होते. याठिकाणी तीन तास काम केल्यानंतर त्यांना महिन्याला ७५ रुपयांचा मोबदला मिळायचा. जेव्हा संस्थेला दुसऱ्या ठिकाणीदेखील काम करण्यास सांगण्यात आले, तेव्हा तेथे मला पाठविले जाऊ लागले. मुळातच कोणत्याही कामांमध्ये झोकून देऊन काम करण्याची मंजुळा यांची वृत्ती होती. त्यांची कामावरची निष्ठा पाहून, संस्थेने पर्यवेक्षक पदावर रूजू करून घेतले. त्यानंतर त्यांच्या कामाचा, प्रगतीचा आलेख उंचावत गेला. पर्यवेक्षक पदाची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळल्यानंतर पुढे काही दिवसांनी मंडळाचे त्यांना सचिव पदाची धुरा सांभाळायला दिली. सचिव झाल्यानंतर मंजुळा ‘सौंदर्य उत्कर्ष महिला सेवा सहकारी मंडळा’चा कार्यभार सांभाळायला लागल्या आणि कार्यालयाशी संबंधित दुसऱ्या कामांची जबाबदारीदेखील सांभाळायला लागल्या. मंजुळा यांनी दुसऱ्या महिलांनादेखील आपल्या मंडळात सामील करण्याचे काम सुरू केले. सुरुवातीला ३१ महिलांना घेऊन सुरू झालेली ही संस्था आज चारशे महिलांना रोजगार देण्याचे काम करत आहे. मंजुळा यांची मेहनत बघून, जवळपास १५ वर्षांपूर्वी त्यांना ‘सौंदर्य सफाई उत्कर्ष महिला सेवा सहकारी मंडळा’च्या सर्वेसर्वा बनविण्यात आले. मंजुळा सांगतात की, ‘मी अतियश हलाखीच्या परिस्थितीमधून गेल्यामुळे त्याच परिस्थितीमधून जाणाऱ्या महिलांची काय स्थिती असते, याची जाणीव मला आहे. मुळातच शिक्षणाच्या अभावामुळे अशिक्षित महिलांमध्ये आत्मविश्वास कमी असतो. आपल्याला कोणतेच काम करता येणार नाही असंच त्यांना वाटतं असतं, पण मुळातच आपल्याकडे अशी काही कामे आहेत त्यातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्या कामामध्ये शिक्षणाचा काडीमात्र संबंध येत नाही.’ मंजुळा यांच्या देखरेखीखाली अहमदाबादच्या ४५ ठिकाणी या संस्था साफसफाईचे काम करत आहेत. या ठिकाणी शासकीय इमारती, अशासकीय इमारती, शाळा आणि शॉपिंग सेंटर यांचा समावेश आहे.

 

आज मंजुळा वेगवेगळ्या ठिकाणी साफसफाईसाठी निघणारे टेंडर स्वत: भरण्यापासूनचे काम स्वत:च करतात. विशेष म्हणजे, काळाची गरज ओळखून, मंजुळा यांच्या संस्थेमधील महिलांना जीवन विमा आणि निवृत्तीवेतन यांसारख्या सुविधा देण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. जीवन विमाचा लाभ घेण्यासाठी महिलांना प्रत्येक वर्षी चारशे रुपये भरावे लागतात, ज्याच्या बदल्यात त्यांना एक लाख रुपयांचा विमा मिळतो. तर निवृत्तीवेतनासाठी त्यांची संस्था महिलांकडून प्रत्येक महिन्याला ५० रुपये घेते आणि उर्वरित ५० रुपये संस्था स्वत:कडून देते. अशाप्रकारे महिलांच्या निवृत्तीवेतनाच्या खात्यात शंभर रुपये जमा होतात. ६० वर्षानंतर ज्या महिलेने जितकी वर्ष नोकरी केली असते, त्यांना त्याच प्रकारे निवृत्तीवेतन मिळते. ‘सौंदर्य सफाई उत्कर्ष महिला सेवा सरकारी मंडळ लिमिटेड’ची आज एकूण उलाढाल (टर्नओव्हर) ६० लाख रुपये आहे. ज्याला त्यांनी पुढील वर्षांपर्यंत एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या त्यांची संस्था अद्याप केवळ अहमदाबादमध्येच काम करत असून, भविष्यामध्ये सुरत, वडोदरा या शहरांपर्यंत कामाचा विस्तार पोहोचवायचा आहे.