जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा संथ कारभार
महा एमटीबी   13-Jun-2018

विद्यार्थ्यांसह पालक हतबल

जळगाव :
उच्च शिक्षणासाठी जात प्रमाणपत्र सक्तीचे असून त्याची पडताळणी आवश्यक असते.परंतु जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या संथ कारभाराने विद्यार्थ्यांसह पालक हतबल झाले आहेत. समितीच्या वेळकाढू वृत्तीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
 
 
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. त्यानंतर लागलीच सीईटी आणि निट परीक्षांचे निकाल जाहीर झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच राउंड सुरु होणार आहे. त्यासाठी निर्धारित वेळेआधी कागदपत्रे आणि जातीच्या दाखल्याची पडताळणी सादर करणे सक्तीेचे करण्यात आले आहे. त्यामुळे हजारो अर्ज जात पडताळणीचे अर्ज समाज कल्याण विभागाकडे सादर झालेले आहेत.
 
 
अनेक विद्यार्थ्यांनी डिसेंबर महिन्यापासून अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या अर्जात काही त्रुटी निघाल्या. परंतु त्या त्रुटींची माहिती त्यांच्यापर्यंत समितीमार्फत पोहचविण्यात आली नाही. त्यामुळे प्रमाणपत्र घेण्यास आलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी निघाल्याचे त्यांना महत्वाच्या आणि घाईच्या वेळेस कळल्याने त्यांचा गोंधळ उडाला आहे. बी.ए. आणि बी.कॉमच्या विद्यार्थ्यांना एमबीए या अभ्यासक्रमास प्रवेश घेतांना जातीचे दाखले तसेच जात पडताळणी सक्तीची आहे. जोपर्यंत महाविद्यालय समाज कल्याण विभागास पत्र देत नाही, तोपर्यंत या विद्यार्थ्यांची जात पडताळणी होवू शकत नाही. व्हॅलिडीटी असल्याशिवाय विद्यार्थ्यांना एमबीएला प्रवेश मिळू शकत नाही. प्रवेशासाठी कागदपत्रे सादर करतांनाच जातीच्या दाखल्याची व्हॅलिडीटी सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे आहेत. पुर्वी प्रोफार्मा एच सादर केल्यानंतर विद्यार्थ्याला जातीच्या दाखल्यावर प्रवेश मिळत असे आणि व्हॅलीडीटीसाठी वेळ मिळत असे. परंतु आता तसे शक्य होत नाही.
 
 
धुळे येथून कार्यालय स्थलांतर करुनही उपयोग शुन्य?
जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना जात पडताळणीसाठी धुळे येथे जावे लागत होते. त्यात वेळ आणि पैसा खर्ची होत होता. हे टाळण्यासाठी जात पडताळणी कार्यालय जळगाव येथे हलविण्यात आले. परंतु नागरिकांना होणार्‍या त्रासात कदापीही फरक पडला नसल्यामुळे नाराजी आहे.
 
शासनाकडूनच होतोय गोंधळ
जात पडताळणीसाठी अर्ज सादर करतांना पोस्टाचे पाकिटावर २५ रुपयांची तिकिटे लावूनच ते पाकिट अर्जासोबत द्यावे लागले. परंतु प्रत्यक्ष येवूनच पालकांना जात पडताळणी प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे. त्यामुळे हे पाकिट आणि पोस्टाची तिकिटे वाया गेलीत का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. अर्जासोबत जर तिकिटे लावलेले पाकिट दिलेले होते तर ज्या अर्जामध्ये त्रुटी आहेत. त्याबद्दल माहिती संबंधित अर्जदाराला पोस्टाने पाठविण्याचा त्रास घेतला नाही.
 
नागरिकांचे हाल
प्रत्यक्ष येवून जात पडताळणीचे दाखले नागरिक घेत आहे.हजारोंच्या संख्येने समाजकल्याण कार्यालयात गर्दी आहे. रांगेने जाण्याची शिस्त नागरिक पाळत आहेत. पण या नागरिकांसाठी पंखा किंवा तत्सम सुविधा देण्यात आलेल्या नाही. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
 
शिक्षणमंत्र्यांना ट्विट
विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल अनेक नागरिकांनी शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे यांच्या ट्विटरला ट्विट करुन होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली आहे.
कर्मचार्‍यांची मुजोरी
समाज कल्याण विभागात संबंधित अधिकार्‍यांचा दुरध्वनी क्रमांक नादुरुस्त असल्याचा संदेश येतो. जाणून बुजुन असे केले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. तसेच कार्यालयातील सामान्य दुरध्वनी क्रमांकावर संपर्क केला असता कर्मचारी चालढकल करुन मुजोरी करत असल्याचा पालकांना अनुभव येत आहे.