खरीप हंगामात सर्व पात्र शेतकऱ्यांना कृषि पिक कर्ज उपलब्ध करुन दयावे
महा एमटीबी   13-Jun-2018
 
 
 
 
१५ जून रोजी सर्व महसूल मंडळ स्तरावरील ग्रामपंचायतीत पीक कर्ज शिबीराचे आयोजन
 
 
भंडारा :  खरीप हंगाम २०१८-१९ या कालावधीकरीता सर्व पात्र शेतकऱ्यांना कृषि पिक कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांनी सर्व बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच बँकांना नेमून दिलेल्या उद्दिष्टे पूर्ण करण्याकरीता उपाय योजना करण्याचे त्यांनी सांगितले. 
 
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयात सुलभ कर्ज वाटप अभियान व तातडीने पीक कर्ज वाटपाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सर्व बँकांचे नोडल अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हयातील सर्व पात्र शेतकऱ्यांना कृषि पीककर्ज पुरवठा सुलभरित्या होण्याकरीता १५ जून रोजी सर्व तालुक्यातील महसूल मंडळ स्तरावरील ग्रामपंचायतीमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पीककर्ज शिबीर व मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून सर्व पात्र शेतकऱ्यांनी सदर शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांनी केले. 
 
 
 
तसेच पात्र शेतकरी सभासद व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या योजनेंतर्गत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना कृषि कर्ज उपलब्ध व्हावे या करीता १९ ते २१ जून २०१८ तसेच ११  ते १३  जुलै २०१८  या कालावधीत जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील नियोजित ठिकाणी कृषि कर्ज मेळावे व शिबीर आयोजित केले असून सर्व पात्र शेतकऱ्यांनी शिबीराचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले. 
 
 
 
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या योजनेंतर्गत लाभ प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांची यादी तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येत असून सदर योजनेचा लाभ प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी या हंगामात पीककर्ज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिने संबंधित गावाला सलग्न राष्ट्रियकृत बँका, ग्रामीण बँका, खाजगी बँका व जिल्हा मध्यवती सहकारी बँकांच्या शाखांना संपर्क साधून कृषी कर्ज उपलब्ध करुन घ्यावे. या संबंधाने काही अडचणी उदभवल्यास संबंधीत तालुक्यातील तहसिलदार व सहाय्यक निबंधक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.