'काळजीसाठी धन्यवाद पण राज्याचे आरोग्य महत्त्वाचे'
महा एमटीबी   13-Jun-2018

मोदींच्या फिटनेस चॅलेंजवर कुमारस्वामींचे उत्तर

 


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या फिटनेस चॅलेंजवर कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ' आपल्या आरोग्याची काळजी केल्याबदल धन्यवाद परंतु सध्या आपण आपल्या राज्याच्या आरोग्यावर आणि विकासावर जास्त लक्ष देत आहोत' अशी प्रतिक्रिया कुमारस्वामी यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे कुमारस्वामी यांनी आपल्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटरवरून हे ट्वीट केले आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि, 'आपल्या आरोग्यविषयी काळजी केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. शारीरिक आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचे असून व्यायाम करण्याला सतत प्रोत्साहन देतो. योग आणि ट्रेडमिल हा माझ्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. परंतु सध्या आपण आपल्या राज्याच्या विकासावर आणि आरोग्यावर जास्त लक्ष देत असून यामध्ये आपल्या सहकार्याची आशा करत आहोत.'दरम्यान कुमारस्वामी यांच्या या ट्वीटवर अनेकांकडून आक्षेप घेण्यात येत आहे. मुळात कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्वीट केल्यामुळे काहींनी आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी कुमारस्वामी यांना वैयक्तिक पातळीवर फिटनेस चॅलेंज दिले आहे, त्यामुळे कुमारस्वामी मुख्यमंत्री पद बाजूला ठेवून मोदींच्या ट्वीटकडे पाहावे, असा सल्ला काहींनी दिला आहे. तर काहींनी कुमारस्वामी यांच्या वक्तव्यावरच आक्षेप घेतला, जनतेला प्रोत्साहन देण्यासाठी कुमारस्वामी यांनी आपला व्हिडीओ शेअर केल्यास त्यात गैर काय ? असा प्रश्न काही नेटीझन्सने त्यांना विचारला आहे. परंतु कुमारस्वामींच्या एकूण ट्वीटमधील वक्तव्यावरून त्यांनी मोदींचे फिटनेस चॅलेंज नाकारल्याचे दिसत आहे.