भैय्यूजी महाराजांच्या अंतयात्रेला सुरुवात, भक्तांना अश्रु अनावर
महा एमटीबी   13-Jun-2018

 
 
इंदूर : प्रसिद्ध आध्यात्मिकगुरु भैय्युजी महाराज यांच्या अंतयात्रेला इंदूर येथे सुरुवात झाली आहे. सुर्योदय आश्रमापासून निघालेल्या अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणात त्यांचे भक्त आणि अनुयायी सहभागी झाले आहेत. थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. यावेळी त्यांच्या भक्तांमध्ये दु:खाचे वातावरण असून त्यांच्या भक्तांना अश्रू अनावर झाले आहेत. त्यांची मुलगी त्यांना मुखाग्नी देणार असल्याची माहिती सध्या मिळतेय. 
 
 
 
 
आज सकाळी ९ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत भय्यूजी महाराजांचे पार्थिव त्यांच्या आश्रमात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर विजयनगरमधील त्यांच्या निवासस्थानापासून भय्यूजी महाराजांच्या अंतिम प्रवासाला सुरूवात झाली. भय्यूजी महाराजांच्या अंतिम दर्शनासाठी देशभरातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे त्यादृष्टीने पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
काल सकाळी आध्यात्मिक गुरु म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध गुरु भय्यूजी महाराज यांनी स्वत:ला गोळी घालून आत्महत्या केली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसल्याने याचा शोध घेतला जात आहे. तसेच त्यांचे आत्महत्या पत्र सापडल्यानंत्र अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.