दुराचार्‍यांची दुष्कृत्ये
महा एमटीबी   13-Jun-2018

 

रामदास ज्या मोगल सम्राटांच्या राज्यातून मार्गक्रमण करीत होते, ते सारे विध्वंसक आणि हिंदुद्वेष्टे होते.

तीर्थाटन संपवून, इ.स. 1644 साली रामदास नाशिकला परत आले. त्यांनी या तीर्थयात्रेत काय पाहिले असेल, विश्वासू माणसांकडून त्यांनी काय ऐकले असेल, याचा संक्षिप्त आढावा घ्यायचा आहे. विलक्षण बुद्धीचे रामदास तत्कालीन लोकस्थिती, राजकीय स्थिती पाहत, हिंदुस्थानभर पायी प्रवास करीत होते. त्यावेळी त्यांच्या मनात काय चालले असेल, ते रामदास स्वत: किंवा त्यांचा समर्थ रामच जाणे! पण ही यात्रा करताना त्यांचे मन उद्विग्न झाले होते, हे मात्र खरे. त्यांनी काय पाहिले, काय ऐकले असेल की ज्यामुळे ही उद्विग्नता आली होती?

 शंकरराव देव यांनी त्यांच्या ’समर्थावतार’ या ग्रंथात याबाबत अनेक पुरावे दिले आहेत. त्यात त्यांनी त्या काळात हिंदुस्थानला भेट देणार्‍या परदेशी प्रवाशांनी नंतर लिहिलेल्या पुस्तकातील उतारे उद्‍धृत केले आहेत. समर्थावतार या ग्रंथात ते लिहितात, ‘गावेच्या गावे जाळण्याची या जहांगीराला लहर येत असे. हे राजे प्रजेचे रक्षक होण्याऐवजी भक्षक बनले होते.’ त्या वंशातील पुढील पिढ्यांनी हा वारसा जपला होता. रामदास काशी मुक्कामी असताना शहाजहानच्या हुकूमाने 75 मंदिरे जमिनदोस्त करण्यात आली होती. कदाचित ते रामदासांनी त्यावेळी प्रत्यक्ष पाहिले असेल.

रामदास द्वारकेच्या दिशेने प्रवास करीत असताना गुजरातमधील लोकांकडून त्यांना सोमनाथच्या मंदिरासंबंधी हकिगती ऐकायला मिळाल्या असतील. त्यांना समजले असेल की गझनीच्या महंमदाने सोरटी सोमनाथवर स्वारी करून, तेथील समृद्ध व प्राचीन मंदिरांचा विध्वंस केला आणि परत जाताना प्रचंड लूट बरोबर नेली, परंतु तेथील हिंदूंनी सोमनाथाचे ते मंदिर पुन्हा उभे केले. त्यात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यांची पूजाअर्चा होऊ लागली. थोड्याच काळात नुस्कतखानाने ते मंदिर पुन्हा पाडले. त्यातील मूर्तीचे तुकडे करून, ते तो दिल्लीला घेऊन गेला आणि तेथील मशिदीच्या बांधकामात पाया भरताना ते वापरले. ही हकिगत रामदासांच्या मनात खोलवर जिव्हारी लागली असणार. त्यामुळे दासबोधात दुराचार्‍यांचे व त्यांच्या विध्वंसक स्वार्‍यांचे वर्णन करताना ते म्हणतात की,-

देव हारपला घरी। येक देव नेला चोरी।

येक देव दुराचारी। फोडिला बळे॥

येक देव जापाणिला। येक देव उदकी टाकला।

येक देव नेऊन घातिला। पायातली॥ (दा. 6.6.34 व 35)

येथे नुस्कतखानाने सोमनाथच्या मंदिरातील मूर्ती फोडल्या व त्या दिल्लीला मशिदीच्या पाया भरण्यात वापरल्या याचा संदर्भ असण्याची शक्यता आहे.

रामदास उज्जैनीस आले असताना त्यांना अल्तमशच्या कुरापती समजल्या असतील. या अल्तमशने उज्जैनीतील मंदिरांचा विध्वंस करण्याचा सपाटा लावला. एका मागून एक मोठी मंदिरे तो फोडू लागला. त्यातील मूर्ती फोडू लागला. तेव्हा घाबरून तेथील लोकांनी महाकालेश्वरांची मूर्ती कशीबशी वाचवली. या आक्रमकांचे लक्ष जाऊ नये म्हणून त्यांनी मंदिरातील मूर्ती एका लहानशा देवळात आणून ठेवली. हा असा स्थानभ्रष्ट महाकालेश्वर लहान देवळात स्थानापन्न झाला. रामदासांनी तेथे जाऊन, त्या महाकालेश्वराचे दर्शन घेतले असेल. अयोध्येस रामजन्मभूमीवर बांधलेली बाबरी मशीद पाहून, रामदासांना किती यातना झाल्या असतील, याची कल्पना करवत नाही. आपल्या भ्रमंतीत रामदासांनी गंजीकोटच्या किल्ल्यावर मीर जुम्लाने बनवलेली तोफ पाहिली असणार. तेथील लोकांकडून त्यांना समजले असेल की, या मीर जुम्लाने अनेक देवालये पाडली व त्यातील धातूच्या मूर्ती एके ठिकाणी जमा केल्या. त्या देव-देवतांच्या धातूच्या मूर्ती वितळवून, त्याने त्यापासून एक तोफ बनवून घेतली. ती गंजीकोटच्या किल्ल्यावर चढवण्यात आली. ती तोफ पाहिल्यावर रामदासांसारख्या संवेदनाशील मनाच्या संताला सहस्र इंगळ्या डसल्याचे दु:ख झाले असेल.

दक्षिणेकडे प्रवास करीत असताना विजयनगरचे एकमेव वैभवशाली हिंदू साम्राज्य मुसलमानी शाह्यांनी उद्ध्वस्त केलेले ऐकल्यावर तेथून जाताना स्मशानातून चालल्यासारखे त्यांना वाटले असणार. तेथून जवळच कोण्डवीड या गावी महंमद गवानने तेथील मंदिर पाडून, त्या जागी मशीद बांधली होती. कोण्डवीड ओलांडून जाताना ते खिन्न मनाने पुढे गेले असतील.

रामदास तत्पूर्वी मथुरा, वृंदावन, गोकुळला आले. त्यावेळी यमुनाकाठी तो भाग बघताना त्यांना श्रीकृष्णाने गोपगोपिकांबरोबर केलेल्या लीला आठवून, समाधान त्यांच्या चेहर्‍यावर दिसले असेल, पण तेही फार काळ टिकले नसेल, कारण तेथील लोकांकडून ज्या हकिगती कानावर पडत होत्या, त्या हृदय हेलावून टाकणार्‍या होत्या. त्या भागातील मुर्शीद कुलीखान नावाचा फौजदार एखाद्या गावाचा सारा भरायला उशीर झाला की त्या गावावर हल्ला करीत असे. गावातून लूट करून, तो त्या बरोबर तेथील सुंदर स्त्रियांनाही पळवून नेत असे. हे दृश्य अगदी शोले चित्रपटातील गब्बर सिंगच्या हल्ल्यासारखे दहशत निर्माण करणारे असायचे दरवर्षी कृष्णाष्टमीला गोवर्धन पर्वतावर तेथील हिंदू एकत्र जमून, मोठा उत्सव करीत. त्यावेळी हा मुर्शीद कुलीखान फौजदार धोतर नेसून, अंगावर उपरणे घेऊन, कपाळावर टिळा लावून, हिंदूंंच्या वेशात गोवर्धन पर्वतावर येत असे व त्यावेळी दिसतील त्या सुंदर स्त्रियांना बळजबरीने पळवून, त्यांना आग्र्याला घेऊन जात असे.

असल्या अत्याचाराच्या हकिगती त्याकाळी हिंदुस्थानला भेट दिलेल्या व येथे काही वर्षे राहिलेल्या परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवल्या आहेत. त्यात इटलीचा मनुची, फ्रान्सचे ट्रॅव्हरनिअर व बरनियर, जर्मनीचा मंडेल स्लो यांचा प्रामुख्याने समावेश आहे. ’समर्थावतार’ या ग्रंथात शं. श्री. देव यांनी अत्याचारांसंबंधी त्यांची अवतरणे दिली आहेत. ती वाचताना अंगावर शहारे येतात.

रामदासांनी संप्रदाय उभारून, मुसलमानांच्या राजकीय व सांस्कृतिक आक्रमणाला तोंड दिले, तरी मुसलमानांचा धर्म किंवा संस्कृती याबद्दल त्यांच्या मनात कसलाही द्वेष नव्हता. त्यांचे मुसलमान शिष्य होते. त्यांपैकी दोघा शिष्यांच्या समाधी सज्जनगडावर आहेत, असेही माझ्या वाचनात आले आहे.

 
 
-सुरेश जाखडी