अंजली दमानियाविरूध्द न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल
महा एमटीबी   13-Jun-2018

पोलिसांनी केली होती टाळाटाळ : पत्रपरिषदेत आ.एकनाथराव खडसे यांची माहिती

 
भुसावळ, १३ जून :
कथित समाजसेविका अंजली दमानियाविरूध्द मुक्ताईनगर न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल झाल्याची माहिती माजी महसूलमंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी भुसावळ येथे पत्रपरिषदेत दिली.
 
 
माहिती देतांना खडसे म्हणाले की, अंजली दमानिया यांनी २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात माझ्याविरूध्द जनहित याचिका दाखल केली होती. त्याची प्रमाणित प्रत मला २०१७ ला मिळाली. त्यात दाखल करण्यात आलेले अनेक कागदपत्र बोगस असल्याचे दिसून आले. चोपडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत माझे खाते नाही. ९ कोटी ५० लाख व १० लाखांचा माझ्या नावाचा खोटा धनादेश चोपडा बँकेचा दिला असल्याचे दाखविले आहे आणि ते धनादेश ऍक्सिस बँकेत वटले नाहीत. हे दोन्ही धनादेश चौकशीसाठी पोलीस अधीक्षकांना दिले असून त्यांनी स्था.गु. शाखेमार्फत चौकशी केली असता ते धनादेश बनावट निघाले.
 
 
हे धनादेश चोरून आणून त्याचा वापर केला असल्याचे पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे. तसेच दमानियांसह ६ जणांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन त्यांनी दिलेले पुरावे सत्य असल्याचे सांगितले आहे. त्यांनी न्यायालयात खोटी माहिती व प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
 
 
दमानियांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करावा असे सांगितले पण, प्रमाणित प्रती आणल्या तरच गुन्हा दाखल होईल असे पोलिसांचे म्हणणे होते. न्यायालयातून प्रमाणित प्रती काढल्या पण, सुमारे पोलिसांनी सुमारे दीड महिना टाळाटाळ केली. स्थानिक पोलीस आणि पोलीस अधीक्षकही कोणाच्यातरी दबावात असल्याचे दिसले. त्यामुळे न्यायालयात अर्ज सादर केला. त्यावर सुनावणी होऊन भादंवि ३७९, ३८०,४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ४७२, ४७४, १२० ब आणि ३४ प्रमाणे अंजली दमानिया, रोशनी राऊत, गजानन मालपुरे, सुशांत कुर्‍हाडे, सदाशिव सुब्रमणियम व चारमेन फर्नस यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून चौकशी करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
कल्पना इनामदार यांची दंडाधिकार्‍या समोर साक्ष
कल्पना इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी खडसे यांना फसविण्यासाठी षडयंत्र केले गेले असल्याचे सांगितले. तसेच दमानिया यांनी ५ कोटी रुपये तुम्ही खडसे यांच्या टेबलावर ठेवा त्यांना एसिबि कडून पकडु असेहि कल्पना इनामदार यांनी सांगितले . याची सखोल चौकशी मुख्यमंत्री करावी अशी मागणी केली असल्याचे खडसे यांनी या प्रसंगी सांगितले तसेच कल्पना इनामदार यांची साक्ष कलम १६४ नुसार काही दिवसांपूर्वी दंडाधिकार्‍यासमोर झाली आहे.