जग आता नवे बदल अनुभवेल : किम जोंग उन
महा एमटीबी   12-Jun-2018

अमेरिका-उत्तर कोरिया बैठक यशस्वी
सिंगापूर : 'भूतकाळामध्ये झालेल्या सर्व गोष्टी विसरून उत्तर कोरिया आता नव्याने सुरुवात करत आहे, त्यामुळे जग आता नवे बदल अनुभवेल, असे वक्तव्य उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सिंगापूर येथे झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्याने ही प्रतिक्रिया दिली.

'उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात आज जी बैठक झाली आहे. ती अनेकांना स्वप्नवत वाटेत असेल. परंतु आता उत्तर कोरियाने नवे आत्मसात करायचे ठरवले असून यापुढे भूतकाळातील सर्व गोष्टी विसरून पुढे वाटचाल करणार आहे. यामुळे उत्तर कोरिया अमेरिकेच्या सोबत काम करणार असून यामुळे जगाला आता मोठे बदल अनुभवायला मिळणार आहे' असे किमने म्हटले.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली. 'किम यांच्या भेटीविषयी अनेकांनी जे अंदाज व्यक्त केले होते. त्या अंदाजांपेक्षा कित्येक पटीने ही भेट चांगली आहे' अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली. तसेच पुढे अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात सातत्यने चर्चा होत राहील आणि किम यांना व्हाईट हाऊसमध्ये देखील येण्याचे निमंत्रण दिले जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले. तसेच दोन्ही नेत्यांनी यावेळी एका करारावर देखील स्वाक्षऱ्या केल्या. यामध्ये परस्पर मैत्री आणि सौदार्य याविषयी दोन्ही देशांनी एकमेकांना आश्वासन दिले आहे.

भारताकडून स्वागत ...

अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यांची आज सिंगापूर येथे झालेल्या द्विपक्षीय बैठकीचे भारताकडून स्वागत करण्यात आले आहे. अमेरिका आणि उ.कोरियामध्ये झालेली चर्चा ही स्वागतार्ह असून कोरियन द्विपकल्पात शांतता नांदावी, यासाठी भारत सर्व प्रकारची मदत करेल, असे आश्वासन भारत सरकारने दिले आहे.