चमचमणाऱ्या ताऱ्यामागचा आधार
महा एमटीबी   12-Jun-2018


 
 
 बालकामगार म्हटले की हॉटेल, खाण, घरकाम किंवा तत्सम ठिकाणी उपाशीतापाशी अंगतोड मेहनत करणार्‍या अश्राप मुलांचा चेहरा डोळ्यासमोर येतो,
 

१२ जून म्हणजे बालमजूर कामगारांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवणारा दिवस. निष्पाप बालकांचे बालपण निर्दयपणे कुस्करून त्यांच्याकडून मजुरी करून घेणे यासारखे क्रूर कृत्य नाही. आज बालकामगारांचा प्रश्‍न गंभीर आहे. जगभरात या प्रश्‍नांवर काम होत आहे. तरीही या समस्येचे समाधान होत नाही.  पण यापलीकडे जाऊनही बालकामगारांच्या वेदनेची दिसणारी व्याप्‍ती म्हणजे हिमनगाचे टोक असते. काही काही क्षेत्रांत तर बालकामगारांचे अस्तित्व इतके सर्वमान्य झाले आहे की, ते बालकामगार आहेत हेही आपल्या लक्षात येत नाही. आपण पाहत असलेले चित्रपट, दूरदर्शन मालिका यामध्ये लहान मुलांची भूमिका करणारे कलाकार हे वयाने बालच असतात. लहान वय हे खेळण्याचे बागडण्याचे असते. या वयात ही लहान मुले चित्रपट किंवा दूरदर्शन मालिकांमध्ये काम करताना दिसतात.

चित्रपटांमध्ये किंवा मालिकांमध्ये काम करतात म्हणून त्यांना पैसेही मिळतात. या सगळ्याचा लहान मुलांच्या आयुष्यावर काय ताण येत असेल याचाही विचार होणे गरजेचे आहे. चित्रपटाचे वातावरण हे लहान मुलांसाठी योग्य की अयोग्य, हा प्रश्‍न अलहिदा, पण चित्रपटांमधील सवंग दृश्ये, हाणामारी यांचा मुलांवर काय परिणाम होत असेल, याचा विचार केला तरी पुरे. रात्रंदिवस चालणारे शूटिंग, त्यानुसार केला जाणारा प्रवास यामध्ये या मुलांचे जीवन कसे जात असेल? भारतीय घटनेनुसार प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार आहे, पण चित्रपट किंवा दूरदर्शन मालिकांच्या कामाच्या तासांमुळे त्यामध्ये काम करणारे बालक बालिका शिक्षण घेणे या त्यांच्या अधिकाराला योग्य तो न्याय देऊ शकतात का? खरे पाहिले तर अकालीच त्यांचे बालपण हिरावले गेलेले असते.

पैसा प्रसिद्धी यांची ओळख या बालकांना लहानपणीच होते. घरचे संस्कार, शिस्त, कुटुंब आणि त्याद्वारे नातेसंबंधाची ओढ याबाबत या लहान बालकांच्या मनावर काय किंवा किती रेखले जात असेल याबाबत प्रश्‍नच आहे? काही वेळा असेही आढळून आले आहे की, आपले लहान मूल पैसे कमावते आहे ना? म्हणून त्यांना चित्रपटसृष्टीत अक्षरशः यंत्रवत कामाला जुंपणारे लोकही आहेत. असेही आढळून आले आहे की, आपली मुले लवकर मोठी दिसावीत म्हणून त्यांना औषधही दिले जाते. त्यामुळे ही बालके वयात येण्याआधीच तरुण दिसू लागतात. याचा परिणाम या बालकांच्या शरीरावर आणि मनावरही होतोच होतो. बालक असले म्हणून काय झाले, शेवटी त्यांनाही मन असतेच, भावना असते. ज्यावेळी त्यांच्या मनभावनांचा विचार न करता त्यांना केवळ पैसा कमवून आणणारी सोन्याची कोंबडी असे गृहित धरले जाते, पैशासाठीच केवळ त्यांची काळजी घेतली जाते त्यावेळी त्यांनाही वाईट वाटतच असेल ना? रात्री-बेरात्री किंवा पहाटे शूटिंग करण्याऐवजी आपणही आपल्या आईबाबांच्या कुशीत निजावे, अशी निसर्गदत्त भावना या बालकांच्या मनातही उमटत असेलच ना? पण छे, या सगळ्या भावना शब्दांत व्यक्‍त होत ओठावर उतरण्याआधीच त्यांना शूटिंगला जाणे गरजेचे असते.

दूरदर्शनच्या गायन, अभिनय, नृत्य स्पर्धा तर सगळ्यांच्या आवडीच्याच. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातली बालके उत्साही असतात. त्यापेक्षाही उत्साही असतात त्यांचे पालक. जसे काही या स्पर्धांमध्ये त्यांच्या पाल्याने प्रवेश मिळवला तर त्यांना सात जन्माचा स्वर्ग मिळणार आहे, असाच आविर्भाव असतो. तुम्ही पाहिले असेल की, एखाद्या स्पर्धेत सहभागी बालकाला प्रवेश मिळाला नाही किंवा स्पर्धेदरम्यान त्याने चांगली कामगिरी केली नाही म्हणून बाल स्पर्धक बाहेर आला तर, त्या बालकाने काही दुःख अभिव्यक्‍त करण्याआधीच त्याचे पालक असे काही धुमसून रडतात की, वाटते आता सगळे संपले. गायनाच्या, अभिनयाच्या, नृत्याच्या क्षुल्‍लक स्पर्धेत मिळालेले यश-अपयश हे त्या बालकाचे आयुष्यभराचे संचित ठरवणे हे पापच आहेे. पण या बाल स्पर्धकांबाबत हे कोणी विचारात घेत नाही. बिचारा बाल स्पर्धक अहोरात्र घाण्याच्या बैलासारखा या स्पर्धांसाठी तयारी करत राहतो, करत राहतो. कोणतीही स्पर्धा कोणीतरी एक जणच जिंकणार? मग बाकीचे बाल स्पर्धक काय करणार? त्यांच्या मनस्थितीचे काय हो? अर्थात यासाठी स्पर्धाच घेऊ नये असे म्हणायचे नाही. पण दूरदर्शनद्वारे सुरू असलेल्या या मालिकांमध्ये इतके नाटकी वातावरण निर्माण केले जाते की, या बालकलाकारांची कीव आल्याशिवाय राहत नाही.

बाललैंगिक शोषण हाही ऐरणीवर आलेला मुद्दा. काही महिन्यांपूर्वी कोणे एकेकाळी बालकलाकार असलेल्या डेझी इराणीच्या कटू स्मृती याबाबत खूप काही सांगून जातात. डेझी लहान असताना शूटिंगदरम्यान तिची काळजी घेणार्‍या व्यक्‍तीकडून बाल डेझी इराणीचे लैंगिक शोषण झाले होते. त्यावेळी डेझी केवळ सात आठ वर्षांची असेल. ५० -६० वर्षांपूर्वीचा डेझीचा अनुभव आताच्या काळात काय भयानक संदर्भ घेऊन येत असेल याची कल्पनाही न केलेली बरी. या बालकलाकारांचे याबाबत काय होत असेल, या सर्व गोष्टींचा विचार करून डोक्याला मुंग्या येेतात.

या सर्वांचा वेध घेत युनिसेफ, क्राय आणि राज्य बाल हक्‍क संरक्षण आयोगाने आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये या विषयाचा सांगोपांग ऊहापोह केला गेला. या चर्चासत्राचा निष्कर्ष सांगताना आयोगाचे सदस्य संतोष शिंदे म्हणाले, ”या बालकलाकारांबाबत सर्वसामान्यांना इतकेच वाटते, व्वा! काय नशीब आहे या मुला-मुलींचे, इतक्या लहान वयात यांना पैसा प्रसिद्धी सगळे मिळाले. पण या चर्चासत्रातून असा निष्कर्ष निघाला की, या बालकलाकारांची काम करताना काळजी घेतली जावी. त्यांचे संरक्षण व्हावे. तसेच बालक म्हणून त्यांच्या कोणत्याही मूलभूत हक्‍कांवर, अधिकारांवर गदा येऊ नये, असे वातावरण हवे. त्यासाठी बाल हक्‍क संरक्षण आयोगाने कामगार विभागाला आदेश दिलेत की, याबाबत राज्याचे नियम लवकरात लवकर तयार करावेत आणि बालकलाकारांच्या संदर्भात लवकरात लवकरात कृती दल तयार करून मार्गदर्शिका तयार करण्यात यावी.

राज्य बाल हक्‍क संरक्षण आयोग, क्राय आणि युनिसेफच्या चर्चासत्रातून बालकलाकारांच्या जीवनाला मानवी परिमाण देण्याच्या प्रयत्नाला मनापासून शुभेच्छा! कारण बालकलाकार की बालमजूर या सीमारेषेवर तळ्यात मळ्यात असणार्‍या या बालकांचे जीवन सुरक्षित ठेवणे, हे सगळ्यांचेच कर्तव्य आहे. 'नन्हे मुन्हे बच्चे, तेरे मुठ्ठी मे क्या है?’ अशी विचारणा केली असता कोणत्याही बालकाने, ’मुठ्ठी मे है उज्ज्वल भविष्य हमारा,’ असे म्हणावे, हेच अभिप्रेत आहे. मग ते बालक, तुमच्या आमच्या घरातले असो, दुर्दैवाने बालमजूर असो की तार्‍यांप्रमाणे चमकणारा बालकलाकार असो..

सिनेमा आणि दूरदर्शनच्या मालिकांमध्ये काम करणार्‍या बालकलाकारांचेही एक वेगळे जग आहे. त्यांच्या जगामध्ये त्यांचे भावविश्‍व आणि त्यांना होणारा त्रास हा एक शब्दातीत दुखरा कोपरा आहे. ते दुःख कोण जाणणार? या दुःखांचा, वेदनेचा वेध घेत युनिसेफ, क्राय आणि राज्य बाल हक्‍क संरक्षण आयोगाने प्रोटेक्टिंग अवर चाईल्ड आर्टिस्ट या विषयावर १२ जून रोज दुपारी ३ ते ५, हॉटेल मरिन प्लाझा, मरिन ड्राईव्ह चर्चगेट येथे चर्चासत्र आयोजित केले होते. चर्चासत्रामध्ये अभिनेता आणि चित्रपट निर्माता अमोल गुप्‍ते, अभिनेत्री दिव्या दत्ता, मानसोपचारतज्ज्ञ सीमा हिंगोरानी, युनिसेफच्या राजेश्‍वरी चंद्रशेखर, क्रायच्या पूजा मारवा, राज्य बाल हक्‍क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे आणि सर्व सदस्य सहभागी झाले होते.