यापेक्षा आमचे आर्ची आणि परशा बरे...
महा एमटीबी   11-Jun-2018
 
 
 
 
गेल्या कित्येक दिवसांपासून ‘धडक’ या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट प्रेक्षक पाहत होते. मात्र आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असला तरी आर्ची आणि परशाच्या प्रेमकथेप्रमाणे या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांना भुरळ पाडली नाही असे दिसून येत आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिची मुलगी जान्हवी आणि अभिनेता इशान खट्टर यांची जोडी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. प्रसिद्ध अभिनेता आशुतोष राणा याने या चित्रपटात 'व्हिलन'चे काम केले असून यात तोच जास्त भाव खावून गेला आहे. 
 
 
 
 
 
मराठी चित्रपट सैराटचा ‘हिंदी रिमेक’ धडक हा चित्रपट आहे. मात्र सैराटने प्रेक्षकांना जशी भुरळ पाडली तशी भुरळ धडक हा चित्रपट पाडेल काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राजस्थानी भाषेमधील ही प्रेमकथा असून सैराट चित्रपटाच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटला मराठी गायक अजय आणि अतुल यांनीच संगीत दिले असून दिग्दर्शक करण जोहर याने हा चित्रपट निर्मित केला आहे. 
 
 
 
२० जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सैराटमध्ये असणारे ‘झिंगाट’ गाणे यात देखील दाखवण्यात आले आहे. त्यामुळे मराठी सैराटसारखे वेड हा हिंदी 'धडक' लावतो काय आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.