शिशिरही चालला सोडून राजाची साथ
महा एमटीबी   11-Jun-2018 

वानखेडे स्टेडियमच्या धावपट्टीवर तेल पसरवून भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने होऊ देणार नाही, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली घोषणा प्रत्यक्षात आणणारे शिशिर शिंदे पुन्हा एकदा शिवसेनेत परतणार आहेत. राज ठाकरे यांच्या मैत्रीला जागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलेल्या शिंदे यांनी भांडुप विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. राज ठाकरे यांच्याशी संबंध दुरावल्याने त्यांनी काही महिन्यांपूर्वी मनसेला 'जय महाराष्ट्र' केला होता. आता हेच शिशिर शिंदे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. त्याचा मनसेला काय फटका बसेल, हा प्रश्न जरी मोठा नसला तरी निष्ठावान आणि राज ठाकरेंच्या निकट असलेले शिंदेही आता स्वगृही परतत असल्याने मनसेच्या सद्यस्थितीवर पुन्हा चर्चा केली जात आहे. दरम्यान, नुकत्याच एका बेसावध क्षणी शिवसेनेने मनसेचे नगरसेवक स्वत:कडे वळवून मुंबई महापालिकेवर ताबा घेऊ पाहणाऱ्या भाजपला धक्का देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर राज ठाकरेंनी नेहमीच्या स्टाईलमध्ये 'आता गालावर टाळी देऊ,'असे वक्तव्य केले. पण मुळात राज यांच्या निष्ठावंतांनी मरेपर्यंत साथ देण्याची शपथ त्यावेळी मोडली असल्याचे स्पष्ट झाले.

 

अशी शपथ घेतलेल्या मनसैनिकांवर साथ सोडण्याची वेळ का आली? हा प्रश्न आहे. एकखांबी आधारावर पक्ष चालत नाही, हे एव्हाना समोर आले आहेच. त्यासाठी जनतेत फिरावे लागते. त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात. सगळ्या आघाड्यांवर खळ्ळ्खट्याक करून हाती काही उरत नाही, हे शिंदे यांच्या स्वगृही परतण्याने आता चांगलेच अधोरेखित झाले आहे. खरं तर राज ठाकरे फुल फॉर्ममध्ये असताना ऑक्टोबर २०१३ मध्येच याची सुरुवात झाली होती. राज ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेतील गटनेतेपदावरून दिलीप लांडेंना हटवलं. त्यांनी तिथे संदीप देशपांडेंची नेमणूक केली. देशपांडे लांडेंपेक्षा निश्चितच अधिक आक्रमक, फोटोजेनिक आणि पत्रकारांना जवळचे होते. त्यामुळे त्यांची निवड कुणालाही चुकीची वाटणारी नव्हती. पण नेत्याला सर्वसामान्यांच्या पलीकडचं पाहावं लागतं. ते न जमल्यामुळे ही निवड मनसेच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. तोवर सतत यश मिळवणारी मनसे या निवडीनंतर उतरणीला लागली. एखाद्याला हा निष्कर्ष अतिशयोक्तीचा वाटू शकेल. उगाच सुतावरून स्वर्ग गाठण्याची धडपड वाटू शकेल. पण असं झालंय खरं.

 

मिमिक्रीच्या पलीकडचे राजकारण कधी?

 

फार जुना नाही, पण एक जमाना होता. राज ठाकरेंच्या भोवती राज्याचं राजकारण फिरायचं. ते ज्यांना हात लावतील, त्यांचं सोनं व्हायचं. ते बोलतील तो चर्चेचा मुद्दा बनायचा. ते जातील तिथे हजारोंची गर्दी जमा व्हायची, पण अचानक राज ठाकरेंचं राजकारण लोकसभा, विधानसभा करत महानगरपालिका निवडणुकीपर्यंत रसातळाला गेलं. त्यातून बाहेर पडण्यासाठी फेसबुकवर विक्रमी धडक आणि चर्चगेटच्या मोर्चांनी केलेली हवा सहा नगरसेवकांच्या पक्षबदलाने काढून घेतली. आणि आता तर निकटवर्तीयांनी सोडलेली साथ पाहता राजाला आगामी काळात कशी साथ मिळेल, या विवंचनेत दिवस ढकलत आहे. याचा पक्षावर आणि राज ठाकरे यांच्यावर वैयक्तिक काय परिणाम होईल, याचे निकष येणारा काळ ठरवेलच. पक्षात अशी कोणतीच फळी दिसत नाही. पक्षाची बांधणी भक्कम नाही, अधिकारांची उतरंड नाही. नवनिर्माणाचे निश्चित धोरण नसल्याने पक्षाचा विस्तार होऊ शकलेला नाही. स्थानिक कार्यकर्त्यांशी थेट संपर्क नाही. नागरिकांशी तर संवादच नाही. अशा अनेक उणिवांमुळे जे व्हायचे तेच झाले.

 

आज पक्षाची अवस्था होत्याचे नव्हते झाल्यासारखीच आहे. राज ठाकरे यांचे भाषण हा एकच मनसेसाठी आधार होता. त्याव्यतिरिक्त पक्षात सगळाच आनंद असल्याने मनसे सर्वसामान्यांमध्ये रुजू शकला नाही. 'विकासाची ब्ल्यू प्रिंट’ सादर करून राज ठाकरे यांनी काही काळ आश्वासकता निर्माण केली, पण भाषणांमधून विरोधकांची टिंगलटवाळी करण्यापलीकडे काहीच होत नसल्याने लोक, कार्यकर्ते दुरावले गेले. त्या-त्या भागातील स्थानिक मंडळी सत्तेच्या लाभामुळे आपापल्या परीने वाटचाल करू लागल्याने वाद वाढत गेले. त्यावरही पक्षनेतृत्वाला नियंत्रण ठेवता आले नाही. हे वाद मिटविण्यासही राज ठाकरे वेळ देऊ शकले नाहीत. त्यामुळे वसंत गिते, प्रवीण दरेकर यांच्यासारख्या मंडळींनी आपापले मार्ग बदलले. एकीकडे पराभवाची मालिका आणि दुसरीकडे पक्षात होणारी गळती दिसत असूनही सुसंवाद, नाराजीची कारणे शोधण्याऐवजी त्यांचे कान उपटण्याचेच धोरण पक्षनेतृत्वाने स्वीकारले. राजकारणातील धरसोड वृत्ती मारक ठरत असल्याचे लक्षात येत असल्याने पक्षाला मोठी गळती लागली. 'नीम का पत्ता कडवा हैं...’च्या घोषणा देणं सोपं आहे. पत्रकार परिषदांमध्ये आरोप करणंही सोपं आहे. पण राजकारणाच्या सारीपाटावरचे फासे एकामागून एक उलट का पडतात, हे शोधणं राज ठाकरेंसाठी कठीण आहे.