पावसाळ्यातील आजार आणि उपाय
महा एमटीबी   11-Jun-2018

 

 
पावसाळा आणि आजार यांचा जवळचा संबंध आहे. पहिल्या पावसात भिजण्याची मजा काही औरच असते, परंतु हे भिजणे काही जणांना बाधतेदेखील. पावसाळा पिकनिक, रेन-डान्स ही नवीन संस्कृती उदयास आली आहे. त्याचबरोबर मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस, स्वाइन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू इत्यादी रोगांची गुंतागुत काही रुग्णांमध्ये प्राणघातक ठरताना दिसते.
 

'सोलोमन ग्रॅण्डी बॉर्न ऑन मंडे' अशी एक कविता आमच्या लहानपाणी होती. 'सोलोमन' चा जन्म सोमवारी होऊन, रविवापर्यंत त्याचा दफनविधी होतो. अशा आशयाचे ते बालगीत होते. प्रसिद्ध फिजिशियन डॉ. राममूर्ती व्याख्यानात मलेरियाबद्दल सांगायचे 'हल्ली फालसिपॅरम मलेरिया' हा वेगाने बळावणारा आजार ठरू पाहत आहे. सकाळी रुग्णाला थंडी भरून ताप येतो, दुपारी आजार बळावतो व संध्याकाळी रुग्ण दगावतो. शनिवारी पाहिलेला तापाचा रुग्ण आपल्याला सोमवारी पुन्हा दिसेल की नाही, अशी शंकेची पाल हल्ली बऱ्याच डॉक्टरांच्या मनात चुकचुकते. याला कारण फालसिपॅरम मलेरिया रोगाची झपाट्याने होणारी गुंतागुंत हे डॉ. राममूर्तींचे शब्द आजही आठवतात. हीच गोष्ट डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू, टायफाईड, कॉलरा, कावीळ, मेनिन जायटीन या इतर साथीच्या रोगांबाबतची लागू आहे.

 

पावसाळ्यात जसे रस्त्यावर खड्डे होणे अपरिहार्य आहे, तसेच साथीच्या रोगाचे प्रमाण वाढणेदेखील अपरिहार्य आहे. शहरी संस्कृतीचा तो अविभाज्य भाग आहे. पाणी उकळून प्या. अशी सूचना आरोग्यविभागातर्फे करण्यात येते. वॉटर प्युरिफायर, झीरो बी इत्यादी, पाणी शुद्धीकरणाचे घरगुती उपाय उपलब्ध आहेत, तरीदेखील कावीळ, उलट्या, जुलाब टायफाईड, कॉलरा यासारखे पाण्यावाटे पसरणारे आजार पावसाळ्यात जास्त आढळतात, रुग्णाची प्रतिकारशक्ती जर चांगली असेल, तर विशेष गुंतागुंत न होता हे आजार औषधाने बरे होतात, परंतु प्रतिकारशक्ती कमी असल्यास त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये या आजाराच्या गुंतागुंतीचे प्रमाण जास्त होते व यातील काही रुग्णांना हॉस्पिटल गाठावे लागते. हल्ली आजाराच्या चाचण्या, औषधे अत्यंत महागडी झाली आहेत. महागडी औषधे व महागडे हॉस्पिटल म्हणजे योग्य उपचारांची खात्री असा गैरसमज समाजात बळावत चालला आहे. आज खरी गरज आहे ती व्यवस्थित रोग निदान करणार्या डॉक्टर्सची.

 

पाण्यावाटे पसरणाऱ्या आजाराबरोबरच मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, स्वाईन फ्ल्यू हेदेखील थैमान घालत असतात. या आजाराची वैशिष्ट्ये म्हणजे निदान करयात येणाऱ्या अडचणी. मलेरिया चाचणी निगेटिव्ह आली, म्हणजे रुग्णाला मलेरिया नाही, असे छातीठोकपणे सांगता येत नाही. डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, स्वाइन फ्ल्यू यांच्या चाचण्या महागड्या आहेत व त्या प्रत्येक तापासाठी करुन घेणे व्यावहारिक नाही यासाठी डॉक्टरांचा अनुभव व अंतर्मनाचा आवाज महत्त्वाचा आहे. 'टॉक्सिक लूक ऑर सिक लूक ऑफ पेशन्ट' हा वाक्यप्रचार वैद्यकीय शास्त्रात बऱ्याच वेळा केला जातो. याचे वर्णन शब्दात करता येत नाही. ते प्रत्येक डॉक्टर आपल्या अनुभवाने शिकतो.

 

सीबीसी, ईएसआर, एमपी, विडाल, युरीन या प्राथमिक चाचण्यातून बऱ्याचशा रुग्णांच्या तापाचे निदान होऊ शकते. पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स्, तांबड्या पेशी अतिशय कमी झाल्या असल्यास मोठ्या आजारांच्या संशय बळावतो व महागड्या चाचण्या करण्याची गरज पडते.

 

या सर्व आजारांबरोर अस्थमा व न्यूमोनिया या आजारांमध्ये पावसाळ्यात लक्षणीय वाढ होते. थोडा जरी संशय आल्यास छातीचा एक्स-रे काढणे जरुरी आहे. कारण त्याने पुढचे मोठे संकट टाळता येते. नेब्युलायझरची सोय असल्यास अस्थमाच्या अनेक रुग्णांचे हॉस्टिपलमध्ये भरती होणे टाळता येते.

 

पावसाळ्यात रुग्णच फक्त आजारी पडत नाहीत, तर डॉक्टर्सदेखील आजारी पडतात. आमचे एक मित्र कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये १५ दिवस व्हेन्टिलेटरवर होते. मृत्यूशी यशस्वी झुंज देऊन, ते घरी परत आले, परंतु हॉस्पिटलचे बिल बघून त्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली.

 

या सर्वावर उपाय काय?

 

उपाय अगदी सोपा आहे. पावसाळ्यासाठी पूर्वतयारी करा. काही पथ्ये पाळा व पावसाळ्यातील कुठलाही सर्दी, खोकला व तापासारख्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या.

 

पावसाळ्याची पूर्वतयारी

 

१. घरातील लहान मुलांचे लसीकरण झाले आहे की नाही हे तपासून बघणे.

२. घरातील मोठ्या माणसांसाठीदेखील हिपेटायटीस ए,बी, कॉलरा, टायफॉईड, स्वाइन फ्ल्यू इत्यादी लसी घेतल्या गेल्या की नाही ते बघणे.

३. घराभोवती पाण्याचे डबके साचणार नाही, सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा होईल यासाठी लागणारी डागडुजी करणे.

 

पवसाळ्यातील पथ्ये

 

१. पावसाळ्यात पाणी गढूळ येते. पाणी गाळून, उकळून प्यावे, वॉटर प्युरिफायरव्यतिरिक्त पाणी उकळलेले असल्यास सुरक्षा आणखी वाढते.

२. शाळेतल्या मुलांनी पाण्याची बाटली घरून न्यावी. बाहेरचे पाणी शक्यतो टाळावे. उघड्यावरील पदार्थ हॉटेलमधील खाणे शक्यतो टाळावे. अगदी गटारीदेखील घरी साजरी करावी.

३. मांसाहार, मसालेदार पदार्थ, वातजन्य पदार्थ पावसाळ्यात टाळावे.

 

पावसाळ्यातील आजार

 

१. सर्दी, पडसे, खोकला, उलट्या, जुलाब यासारखी लक्षणे पावसाळ्यात स्वत:च्या अनुभवाने बरे करण्याच्या फंदात पडू नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व औषधे घ्यावीत. एका रुग्णासाठी आणलेले औषध आपल्या बुद्धीने दुसऱ्या रुग्णास देऊ नये.

२. हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची वेळ आली तर आरोग्य विम्याचे पाठबळ असल्याशिवाय महागड्या हॉस्पिटलची पायरी चढू नये.

 
 

- डॉ. मिलिंद शेजवळ