जो जे वांछिल तो ते लाहो
महा एमटीबी   11-Jun-2018मुळचे नांदेडचे डॉ. मधुकर गायकवाड सध्या मुंबईच्या सेंट जॉर्ज इस्पितळात अधिक्षक आहेत. डॉक्टरी पेशाला सेवामार्गाची संधी समजून अविरत रुग्णसेवा करणे हे त्यांचे वैशिष्ट्य.

 

दूरदर्शन, आकाशवाणी ते विविध समाजमाध्यमांद्वारे आरोग्यविषयक किंवा वैद्यकीय चर्चासत्रांमध्ये एक तरुण डॉक्टर नेहमी अत्यंत संयत आणि नम्र स्वरात वैद्यकीय विश्वाच्या नीतिमत्तेला स्मरून, आरोग्याबाबत मार्गदर्शन करत असतो. हा तरुण डॉक्टर कोण? या तरुण डॉक्टरला वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट सेवा प्रदान केल्याबद्दल सन २०१५ साली सर्वोत्कृष्ट डॉक्टर म्हणून ग्रॅण्ट शासकीय महाविद्यालय व 'सर ज. जी समूह रुग्णालय, मुंबई’चे तत्कालीन अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी सन्मानित केले होते. याच डॉक्टरांना २०१६ साली विविध सामाजिक उपक्रमांमध्ये व ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये घेण्यात आलेल्या विविध वैद्यकीय आरोग्ययविषयक शिबिरामध्ये आपले उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, पंकजा मुंडे बालकल्याण विकास मंत्री यांच्या प्रमुख उपस्थित सत्कार केेला गेला. आरोग्य सेवा क्षेत्रात आदराने नाव घेतले जाणाऱ्या या डॉक्टरांची ओळख काय? हे आहेत डॉ. मधुकर गायकवाड, मुंबईच्या नामांकित सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे अधीक्षक. सर्वात कमी वयाचा अधीक्षक म्हणूनही डॉ. मधुकर गायकवाडांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनदंन होत असते. यापलीकडे जाऊन, सध्या डॉ. मधुकर गायकवाड अवयवदानाच्या चळवळीत सक्रिय भरीव योगदान देत आहेत.

 

डॉ. मधुकर गायकवाडांना तरुणपणीच लोकाश्रय आणि समाजप्रेम लाभले. हे भाग्य सगळ्यांनाच मिळते असे नाही. या सर्व यशामागे आणि समाजस्नेहामागे डॉ. मधुकर गायकवाडांचा जीवनसंघर्षही मोठा आहे. नांदेडच्या खेड्यामधल्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये मधुकर गायकवाडांचा जन्म झाला. वडील गंगाराम मोलमजुरी करत. आई गृहिणी. खेड्यातल्या समस्त सामान्यातल्या सामान्य कुटुंबासारखेच आर्थिक स्तरावरचे हलाखीचे जगणे. पैशाची चणचण आणि गरिबीचे चटके हे पाचवीला पूजलेले. या सर्व गोष्टींमध्ये गायकवाड कुटुंबाचे असामान्यत्व इतकेच, की मधुकरांचे वडील गंगाराम हे अत्यंत सेवाभावी वृत्तीचे वारकरी होते. दिवसभर काबाडकष्ट करायचे. राबराब राबायचे. दिवसभराच्या जमलेल्या पुंजीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह तर करायचाच, पण पोटाला चिमटा काढून, गरजूंना आर्थिक मदतही करायची. हा त्यांचा शिरस्ता. आपण कोण करणारे? देवाला सगळ्यांचीच काळजी म्हणत, कोणत्याही गरजूला पडेल ती मदत करत. हा संस्कार मधुकर यांच्यावरही होत होता. चौथी शिकलेल्या वडिलांचे मत होते की मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे. गावखेड्यात आजार झाले की यक्षप्रश्न समोर उभा राही. डॉक्टर म्हणजे दुसरा देवच. समाजाची सेवा करायची, तर डॉक्टरच्या रूपासारखे दुसरे रूप नाही, हे गावाच्या अनुभवातून मधुकरांच्या मनात पक्के ठसलेले. पाचवीपर्यंत मधुकर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले. पुढे जवाहर नवोदय विद्यायलयामध्ये मधुकरांची शिक्षणासाठी निवड झाली. जवाहार नवोदय विद्यायल हे सरकारी योजनेनुसार खेड्यातील हुशार विद्यार्थ्यांना निवडून, त्यांना शिक्षणाची सर्व संधी उपलब्ध करून देते. या शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मधुकरांचा शिक्षणाचा खर्च वाचला. एक नवे दालन उघडले गेले.

 

पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेताना डॉक्टर व्हावे हे तर ठरलेच होते. त्याप्रमाणे त्यांनी चांगले गुणही प्राप्त केले. वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांना जे. जे. इस्पितळामध्ये प्रवेश घ्यायचा होता. त्यांचे नामांकनही झाले होते. मात्र जे. जे. इस्पितळात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जायचे, म्हणजे मुंबईला जावे लागेल. नांदेडच्या बाहेर मुंबई म्हणजे मायानगरी. तिथला खर्च कसा झेपेल? घरची तर आर्थिक तंगी. पैशाचा मेळ जमणे शक्यच नव्हते. मधुकरांना त्यामुळे सेंट जॉर्ज इस्पितळात वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी टाळावी लागली. आपल्या मनाला आणि स्वप्नांना आवर घालत मधुकरांनी औरंगाबादच्या घाटी इस्पितळात वैद्यकीय शिक्षण घेतले.

 

शिक्षण संपले, एक दोन वर्षे त्यांनी खाजगी सराव केला. त्यानंतर त्यांना खाजगी स्तरावर फिजिशियन म्हणून चांगल्या पगाराच्या अनेक संधी आल्या, पण लहाणपणापासून डॉक्टर होणे म्हणजे सेवेचे लाभलेला उत्तम मार्ग या विचाराने त्यांनी संधी स्वीकारल्या नाहीत. खाजगी क्षेत्रात भरपूर वेतनाच्या संधी खुणावत असताना मधुकर यांनी सरकारी इस्पितळामध्ये नोकरी स्वीकारली. याचे कारण सांगताना मधुकर म्हणतात, सरकारी इस्पितळात बहुधा हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेले लोकच येतात. त्यांना वेळेवर आरोग्य सेवा, विश्वास आणि प्रेम मिळणे गरजेचे असते. तसेच या सरकारी इस्पितळामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉक्टर म्हणून आरोग्य सेवेबरोबरच मानवी शाश्वत मूल्यांचे अधिष्ठान शिकणेही गरजेचे आहे. हे मला सातत्याने वाटत होते. सामान्य गरीब समाजाची सेवा आणि त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत मानवी मूल्यांविषयी संवाद साधण्यासाठीची उत्कृष्ट संधी म्हणजे सरकारी इस्पितळात काम करणे ही होती. सेंट जॉर्ज इस्पितळामध्ये मला अधीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मी समाज आणि देशाच्या आरोग्यहितासाठी आणि एकंदरच समाजशिल मूल्यांसाठी या संधीचं सोनं करणार आहे. डॉ. मधुकर कोणे एके काळी आर्थिक परिस्थितीमुळे जे. जे. मध्ये शिक्षण घेऊ शकले नाहीत, आज त्याच जे. जे. इस्पितळाच्या अंतर्गत असलेल्या सेंट जॉर्ज इस्पितळाचे ते अधीक्षक आहेत. इस्पितळामध्ये औषध वैद्यक शास्त्राचे ते पथकप्रमुख आहेत.