अजय, करण नंतर आता अक्षय कुमारचे मराठीतून प्रेक्षकांना आवाहन
महा एमटीबी   11-Jun-2018

 
 
मुंबई :  अक्षय कुमार त्याच्या वेगळ्या धटणीच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत राहीला आहे. मात्र यावेळी तो स्वत:च्या नाही तर एका वेगळ्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आजच अक्षयने त्याच्या ट्विटर खात्यावरुन एक व्हिडियो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मराठीत बोलतोय. त्याचे कारण म्हणजे २७ जुलै रोजी अक्षय कुमार घेऊन येत आहे एक मराठी चित्रपट, "चुंबक". अक्षय या चित्रपटाला प्रत्सुत करणार आहे, असे त्याने या व्हिडियोच्या माध्यमातून सांगितले आहे.
 
 
 
"मी आता पर्यंत खूप चित्रपट बघितले मात्र मनात घर करून राहणारा एक चित्रपट म्हणजे चुंबक. दिवसातून कित्येकदा माझ्या मनात याच चित्रपटाचा विषय घोळत राहतो. आता देखील मी कार मध्ये आहे, मात्र माझ्या मनात हाच विषय सुरु आहे. म्हणूनच मी या व्हिडियोच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतोय." असे अक्षय या व्हिडियोतून म्हणाला.
प्रसिद्ध गीतकार आणि अभिनेते स्वानंद किरकिरे यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावली आहे. मामी चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवण्यात आला आहे. नेमके या चित्रपटात काय आहे, ज्यामुळे अक्षयला हा चित्रपट प्रस्तुत करावासा वाटला याबद्दल आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.