आशिया महिला चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत
महा एमटीबी   10-Jun-2018क्वालालंपूर : भारत आणि बांगलादेश यांच्यात क्वालालंपूर येथे झालेल्या आशिया महिला टी-२० चषक स्पर्धेच्या आजच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पहिल्यांदाच' पराभव झाला आहे. अंतिम सामन्यात विजयासाठी भारतीय संघाने दिलेल्या ९ बाद ११२ धावांचे आव्हान बांगलादेश संघाने तीन गडी राखून पार केले असून अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात शेवटच्या चेंडूवर बंगलादेश संघाने दोन धावा काढून देशाला विजय मिळवून दिला. या विजयासह बांगलादेश संघाने प्रथमच आशिया टी-२० चषकावर आपले नाव कोरले आहे असून सलग पाच वेळा या स्पर्धेत विजयी ठरलेल्या भारतीय संघाला यंदा पराभूत केले आहे.

क्वालालंपूर येथील किनरारा अकादमीच्या मैदानावर हा सामना खेळवला गेला होता. सामन्याच्या सुरुवातील बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले होते. यानंतर मैदानात आलेल्या भारतीय संघाने कर्णधार हरमनप्रित कौर हिच्या ५६ धावांच्या बळावर २० षटकांमध्ये ९ बाद ११२ धावांची मजल मारली होती. याबदल्यात बांगलादेश संघाकडून रूमाना अहमद आणि खादिजा तुलकुब्रा या दोघींनी प्रत्येकी दोन-दोन तर सलमा खातून आणि जहनारा आल्म या दोघींनी प्रत्येकी एक-एक बळी घेतले होते.यानंतर मैदानात आलेल्या बांगलादेश संघाने रुमाना अहमद (२३), निगार सुलतान (२७), आयशा रहमान (१७) आणि शामिमा सुलतान हिच्या १६ धावांच्या बळावर भारतीय संघाने दिलेले आवाहन ३ गडी राखून पार केले. तसेच आशिया चषकावर पहिल्यांदाच आपले नाव कोरले. दरम्यान या बदल्यात भारताकडून पूनम यादव हिने एकटीने ४ षटकांमध्ये अवघ्या ९ धावांच्या बदल्यात बांगलादेशाचे ४ बळी घेण्याची कामगिरी केली. तिच्या पाठोपाठ कर्णधार हरमनप्रित कौर हिने दोन बळी घेतले.