‘राझी’मधील दोन संघर्ष...
महा एमटीबी   01-Jun-2018


 
एखाद्या संवेदनशील व्यक्तीच्या जीवनात किती संघर्षशील तणाव उत्पन्न होऊ शकतात, याचे उत्तम चित्रणराझीया चित्रपटात केले गेले आहे. ज्यांचा वास्तविक पाहता काहीही दोष नसतो, अशांचेही बळी अशा संघर्षात जात असतात. अशा प्रश्नांना कोणतेही निश्चित देण्याइतके उत्तर आपणापाशी नसते.
 
 

मेघना गुलझार यांनी दिग्दर्शित केलेल्या राझीया चित्रपटाने प्रेक्षकांची वाहवा मिळवलेली आहे. वास्तविक पाहता, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट येऊन गेले. अशा चित्रपटांमध्ये पाकिस्तामधील व्यक्तिमत्त्वांना खलनायक दाखवित असताना ते भडकपणे रंगविले जातात. पण, तो मोह मेघना गुलझार यांनी टाळला आहे. एरवी जीवनामध्ये सभ्यता आणि सुसंस्कृतता मानणार्‍या व्यक्ती या राष्ट्राच्या संदर्भात विचार करू लागल्या की, आपल्या शत्रूराष्ट्राचा पराभव करण्यासाठी त्या कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. ही व्यावहारिक जीवनातील अपरिहार्यता आहे. याचे कारण, अशा व्यक्तींच्या मनावर आपल्यावर आपल्या देशाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे, असे भान बाळगून व्यवहार करावा लागतो. असा व्यवहार करीत असताना अशा स्वभावाशी सुसंगत नसलेली व्यक्ती जेव्हा अपघाताने त्यात सापडते, तेव्हा तिची काय स्थिती होते, याचे दर्शन या चित्रपटात घडविले आहे.

बांगलादेश युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आहे. आपला मृत्यू समोर दिसत असताना भारताच्या विरोधातील पाकिस्तानची योजना कळण्याकरिता आपल्या मुलीचा उपयोग करू देण्याची कल्पना हीच सामान्यांच्या दृष्टीने हृदय पिळवटून टाकणारी आहे. परंतु, एकाच कुटुंबातील अनेक जणांना हौतात्म्य पत्करावे लागलेले असतानाही त्याच कुटुंबातील पुढची पिढीही तेवढ्याच राष्ट्रभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन सैन्यात प्रवेश घेते, तेव्हा अशा मानसिकता या असाधारण व्यक्तिमत्त्वातून निर्माण होतात, याची प्रचिती येते. देशाचे संरक्षण हे केवळ पगार किंवा मानमरातब यासाठी नसते, तर त्यामागे खूप मोठी भावनिक गुंतवणूक करावी लागते. दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताला स्वातंत्र्य मिळाले ते अहिंसात्मक मार्गाने, अशी त्यावेळच्या राज्यकर्त्यांची समजूत होती. त्यामुळे लष्कराचे महत्त्व आणि आवश्यकतांकडे तुच्छतेने पाहण्याची एक मानसिकताही निर्माण झाली होती. सैन्यावर होणारा खर्च हा अनुत्पादक असतो, अशी भावनाही राज्यकर्त्यांमध्ये रूजली. वस्तुतः संरक्षण दले हा राष्ट्राच्या अस्तित्वाचा महत्त्वाचा घटक असतो. केवळ युद्ध लढणारी सुरक्षा दलेच महत्त्वाची नसतात, तर राष्ट्रहिताच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या गुप्तचर विभागाच्या काही यंत्रणांमध्येही काम करीत असताना, व्यक्तीला स्वतःचा किंवा व्यक्तिगत भावनांचा विचार करता येत नाही. त्याला आपल्या समोरच्या कठोर कर्तव्यालाच प्राधान्य द्यावे लागते.

त्यामुळेराझीची कथा ही दोन पातळ्यांवर चालते. पहिली पातळी ही सहमत खानच्या भावभावनांशी निगडित आहे. प्राण्यांच्याही वेदनेने दु:खी होणार्‍या सहमत खानला तिचे वडील पाकिस्तानमधल्या एका लष्करी घरात लग्न करून जायला सांगतात व गुप्तहेर म्हणून काम करण्याची जबाबदारी टाकतात. त्यावेळी तिच्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत अशी ती जबाबदारी असते. आपल्या वडिलांच्या आणि देशाच्या प्रेमापोटी ती जबाबदारी स्वीकारते आणि त्याचे प्रशिक्षणही घेते. परंतु, त्या जबाबदारीचे पालन करीत असताना त्यांचे कर्तव्य करणार्‍या लोकांच्या हत्या कराव्या लागतात आणि शेवटी तिची सुटका करण्यासाठी आलेल्या दलाच्या प्रमुखाला, तिच्या सुटकेची शक्यता संपल्यानंतर तिच्या हत्येचा निर्णय घेण्याची स्थिती ती आपल्या डोळ्यासमोर पाहते.

तिच्या मनात निर्माण होणारा संघर्ष हा मन हेलावून टाकणारा आहे. असे असले तरी, गुप्तचर विभागाच्या प्रमुखांना ती घटना नेहमीची वाटते. त्याचे कारण, त्यांच्या कर्तव्यापुढे व्यक्तीचे महत्त्व शून्य असते. असा विचार ते केवळ दुसर्‍याबद्दलच करतात, असे नाही, जर वेळ पडली तर स्वत:बद्दलही तसाच विचार करतात.

सामूहिक हिताचे रक्षण आणि व्यक्तिगत भावभावना, नैतिकता, विवेकबुद्धी यांच्यातील संघर्ष हा नवा नाही. अर्जुनाच्या विषादयोगातही तीच बिजे आढळतात. आयुष्यभर कौरवांनी पांडवांचा केलेला द्वेष, त्यांना संपविण्यासाठी केलेली कटकारस्थाने अनुभवलेली असतानाही जेव्हा प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग येतो आणि आपलेच नातेवाईक, गुरू यांच्यावर हत्यार चालविण्याची पाळी येते, त्यावेळी आपल्या जीवनाचे खरे साध्य काय, असा प्रश्न कोणत्याही अर्जुनासारख्या विवेकी माणसाला पडत असतो. ही गोष्ट केवळ युद्धापुरतीच मर्यादित नसते, तर जीवनामध्ये घडोघडी असे अनेक प्रसंग उद्भवत असतात आणि त्यावेळी व्यक्तिगत मूल्यांना प्राधान्य द्यायचे की सामूहिक हिताला महत्त्व द्यायचे, असा प्रश्न निर्माण होतो. दुसर्‍या महायुद्धानंतर रशियाने अमेरिकन आणि युरोपियन अधिकार्यांच्या विवेकबुद्धीला आवाहन देऊन, कामगारांचे आणि समाजाचे शोषण करणार्‍या भांडवलशाही राष्ट्रांची राष्ट्रप्रेमाच्या नावाखाली संरक्षण करणार की कामगार हितासाठी उभ्या असलेल्या रशियाला मदत करणार, असा प्रश्न उभा केला होता व त्याला अनेक अधिकारी बळी पडले होते. त्यातून केजीबीला अनेक जणांनी माहिती पुरवली.

उदारमतवाद्यांच्या मते, राष्ट्रभावनेला आवाहन करणे म्हणजे सामूहिक हिंसात्मकतेला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. त्यामुळे कोणी राष्ट्रप्रेमाची भावना बोलू लागला की, त्यात त्यांना असहिष्णुतेचा आणि हिंसात्मकतेचा प्रचार दिसून येतो. परंतु, जोपर्यंत आंतरराष्ट्रीय शांततेचे सर्वमान्य तोडगे निघत नाहीत आणि त्यांचे काटेकोरपणे पालन होत नाही, तोपर्यंत राष्ट्रीय सुरक्षेला महत्त्व देणे अपरिहार्य आहे. आजही पाकिस्तान भारताशी कोणत्याही अटीवर शांततेने वागेल, असा विचार करणे ही कवीकल्पना आहे. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना कठुआ येथील पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मिती केंद्रावर हल्ला करण्याचा निर्णय झाला होता. परंतु, त्यांनी तो निर्णय रद्द करायला लावला होता. इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना रॉया गुप्तहेर खात्याची पाकिस्तानमधील सर्व यंत्रणा त्यांनी नष्ट करायला लावली होती. या दोन्हीचे परिणाम आज आपण भोगत आहोत. चीनच्या विस्तारवादी धोरणाचाही इतिहासात आपल्याला फटका बसला आहे आणि भविष्यातही तो बसणार नाही, याची खात्री नाही.

त्यामुळे जगामध्ये जोवर राष्ट्रीय संघर्ष घडत राहणार, तोवर व्यक्तीच्या भावभावना, व्यक्तीचे स्वातंत्र्य यांच्या पलीकडे जाऊन देशाचा आणि देशहिताचा विचार करणे अपरिहार्य ठरते. असा विचार करीत असताना एखाद्या संवेदनशील व्यक्तीच्या जीवनात किती संघर्षशील तणाव उत्पन्न होऊ शकतात, याचे उत्तम चित्रण राझीया चित्रपटात केले गेले आहे. ज्यांचा वास्तविक पाहता काहीही दोष नसतो, अशांचेही बळी अशा संघर्षात जात असतात. अशा प्रश्नांना कोणतेही निश्चित देण्याइतके उत्तर आपणापाशी नसते.

सर्वसामान्य माणसाला काळे-पांढरे, खरे-खोटे, आपला-परका याच चष्म्यातून जगाकडे पाहण्याची सवय लागलेली असते. पण, आयुष्यातील गुंतागुंत एवढी सोपी नसते. ती समजण्याकरिता मनाचा विस्तार करावा लागतो आणि बुद्धीत प्रगल्बता असावी लागते. अशाप्रकारच्या कलाकृती जीवनासंबंधीची समजशक्ती अधिक वाढवितात आणि समोरच्या प्रश्नाकडे व्यापक मानवतावादी दृष्टिकोनातून पाहायला मदत करतात. वास्तविक पाहता, ज्याची मानसिकता गुन्हेगारीची आहे, अशीच व्यक्ती चांगल्या आणि परिणामकारक पोलीस अधिकारी बनू शकतात, असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. कारण, ते गुन्हेगाराची मनोरचना अधिक चांगल्याप्रकारे जाणू शकतात. फक्त ते आपले गुण समाजविघातक कृत्यासाठी न वापरता सामाजिक हितासाठी वापरतात. त्यामुळे व्यक्तीच्या मूलभूत प्रेरणा किंवा भावना समान असतात. त्यांचा आविष्कार सुसंस्कृतपणे होतो की असंस्कृतपणे, यावर समाजाची सांस्कृतिक पातळी अवलंबून असते. निर्माण होणारी व्यक्तिगत सद्सद्विवेकबुद्धी ही समाजाला पाशवी सामूहिकतेकडे जाऊ देत नाही.

राझीया चित्रपटात अनेक प्रसंगांतून हा संघर्ष अधोरेखित केला आहे. ही केवळ भारत आणि पाकिस्तानातील एकमेकात लढणार्‍या दोन गुप्तचर संस्थांची कथा नाही, तर संघर्षात अपरिहार्यपणे ओढल्या गेलेल्या एका संवेदनशील व्यक्तीची कथा आहे. यात कोणीही चुकीचे नाही आणि त्याचबरोबर यातून घडणारे सगळेच बरोबर होते, असेही नाही. आजवरच्या राजकीय घडामोडी पाहिल्या तर देशाच्या आणि जगातील राजकारणात अशा कितीतरी प्रकारच्या सहमतखानांची उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. अशा कथा ज्याला अंतिम उत्तरे नाहीत, असे प्रश्न निर्माण करीत राहतात.