भीम, रूपे आणि युपीआय अॅप आता आंतरराष्ट्रीय स्तरावर
महा एमटीबी   01-Jun-2018


पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिंगापूरमध्ये उद्घाटननवी दिल्ली : 'डिजिटल भारत' आणि 'कॅशलेस भारत' या केंद्र सरकारच्या दोन महत्त्वकांक्षी मोहिमांमध्ये भारत सरकारने आता आणखी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. देशांतर्गत ऑनलाईन व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रूपे कार्ड, भीम आणि यूपीआय अॅपला भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले असून नुकतेच या भारतीय व्यवहार पद्धतींचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर येथे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे आता रूपे, भीम आणि यूपीआयच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील व्यवहार करता येणार आहेत.

दोन दिवसीय सिंगापूर दौऱ्यावर असलेल्या भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सिंगापूरमधील मरीना बे सँड्स कन्वेंशन सेंटर येथे आयोजित 'बिझनेस आणि इनोव्हेश' या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावली. याठिकाणी त्यांनी सिंगापूरमधील व्यापारी वर्गाशी चर्चा केली व त्यांना संबोधित केले. याच कार्यक्रमामध्ये त्यांनी या तिन्हीही भारतीय व्यवहार पद्धतींचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी भारतामध्ये गुंतवणूक आणि व्यापारासाठी असलेल्या नवनवीन संधीची माहिती उपस्थितांना दिली व भीम, युपीआय आणि रूपे कार्डच्या माध्यमातून व्यवहार केल्यास त्याचे भविष्यात होणाऱ्या फायद्याविषयी त्यांनी देखील त्यांनी उपस्थितांना यावेळी सांगितले.

दरम्यान केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता भीम, युपीआय आणि रूपे कार्ड या भारतीय व्यवहार पद्धतींचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवेश झाला आहे. सध्या तरी यांचे स्वरूप अत्यंत व्यापक नसले तरी लवकरच या तिन्ही पद्धतींनी तुम्ही जगातील कोणत्याही कोपऱ्यातून आर्थिक देवाणघेवाण करू शकणार आहात, यासाठी म्हणून केंद्र सरकार आणखी प्रयत्न करत असून लवकरच या पद्धतीचा जगभरात स्वीकार केला जाईल, असा विश्वास सरकारकडून व्यक्त केला जात आहे.