‘फॅशन’चा बळी...
महा एमटीबी   08-May-2018


लग्न सोहळा किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये अनेकदा महिला हाय हिल्सचे सॅण्डल घालून वावरताना दिसतात. हाय हिल्सचे सॅण्डल घातल्यानंतर तोल सावरता येणे आवश्यक असते. काहीवेळा तोल सावरता न आल्यामुळे इजा होण्याची शक्यताही असते. रविवारी संध्याकाळी कल्याणमध्ये एका विवाहसोहळ्यात हाय हिल्सच्या सॅण्डलमुळे असाच एक दुर्देवी अपघात घडला. ज्यामध्ये एका सहा महिन्याच्या लहान मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. फॅशनचा तो नाहक बळी ठरला, असे म्हटले तरी वावगे ठरु नये.

मोहम्मद शेख असे मृत बाळाचे नाव आहे. लग्नाला आलेल्या फेमिदा शेखने (23) हाय हिल्सचे सॅण्डल घातले होते व तिचे सहा महिन्यांचे मूल तिच्या अंगावर होते. मुलाला घेऊन चालत असताना हाय हिल्सच्या सॅण्डलमुळे एका टप्प्यावर फेमिदाचा तोल डळमळला व अंगावर असलेला मोहम्मद पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून खाली पडला. मोहम्मदला लगेचच नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शेख कुटुंब उल्हासनगर धोबीघाट येथे राहायला आहे. रविवारी ते कल्याणच्या रामबाग परिसरातील मातोश्री हॉल येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी आले होते. लग्न सोहळा आटोपून हे कुटुंब घरी निघालेले असताना हा अपघात घडला. महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.

त्यामुळे लग्नात स्वतःची हौस भागवण्यासाठी घालण्यात येणारी आभुषणे, ड्रेस, चपला याची निवड करताना प्रत्येकाने विचार करायला हवा. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. फॅशनच्या दुनियेत दररोज नवनवे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात येतात. त्यात अधिकाधिक ट्रेण्डी दिसण्यासाठी प्रत्येकजण फॅशनची परिसिमा गाठतो. पण, हीच फॅशन जीवावर बेतते आणि क्षणांत होत्याचं नव्हतं होतं. त्यामुळे आपण लग्नसमारंभात फॅशन म्हणून घालणार असलेल्या चपला, दागिने, कपडे हे वावरताना सुरक्षित आहेत ना किंवा त्यामुळे कोणता अपघात, घातपात तर होणार नाही ना, याची काळजी घेणे आणि याबाबत विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.


000000000
‘सोशल’ धोका वाढतोय...

फेसबुक डेटा चोरी प्रकरणानंतर सर्वच युझर्सचे सोशल लाईफ मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे. त्यानंतर नुकतेच ट्विटर या अ‍ॅपने आपल्या सर्व युझर्सना पासवर्ड बदलण्याच्या सूचना देखील केल्या होत्या. त्यामागे एक व्हायरसचे कारण कंपनीमार्फत देण्यात आले होते. त्यानंतर मात्र सर्वांनाच ट्विटरने आपले पासवर्ड सुरक्षेच्या कारणास्तव बदलण्याचे आवाहन केले होते.

फेसबुक, ट्विटर नाट्य संपत नाही, तोच आता व्हॉट्सअ‍ॅप देखील ‘सोशल’ धोक्याखाली आले आहे. व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपमधले मेसेज हे ’end-to-end encryption' प्रणालीमुळे सुरक्षित असतात. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप हे सुरक्षित मानलं जातं. पण, सध्या काही फॉरवर्ड मेसेजमुळे अनेकांचं व्हॉट्सअ‍ॅप किंवा फोनच बंद पडत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हे मेसेज उघडून न बघण्याचे किंवा ते इतरांना फॉरवर्ड न करण्याचं आवाहन केलं जात आहे.

'This is very interesting... Read more...' असे लिहिलेला हा मेसेज उघडून पाहिल्यावर व्हॉट्सअ‍ॅप क्रॅश होत असल्याचे किंवा फोनच हँग होत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. या मेसेजसोबत ’Read More' इतकंच लिहिलेला आणखी एक मेसेज व्हायरल होत आहे. उत्सुकतेपोटी हा मेसेज उघडून पाहिला की फोन रिस्टार्ट करावा लागत असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहे. रेडिटवर याची पोस्टही व्हायरल होत आहे.

अ‍ॅण्ड्रॉईड आणि आयफोन वापरणार्‍या अनेक ग्राहकांनी अशाप्रकारचे मेसेज उघडून पाहिल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप बंद होत असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवरून येणारे हे मेसेज उत्सुकतेपोटी उघडून न पाहाण्याचे किंवा इतरांना ते फॉरवर्ड न करण्याचे आवाहन युझर्सना करण्यात आले आहे. या ‘बग्स मेसेज’मुळे व्हॉट्सअ‍ॅपला मोठा धोका नसला तरी ते उघडून न पाहण्याचं आवाहन युझर्सना सुरक्षेसाठी करण्यात आले आहे.

तेव्हा, संगणकावर असो वा मोबाईलवर इंटरनेट वापरताना प्रत्येकाने आपल्या माहितीची, इतर संवदेनशील तपशीलांची माहिती सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. कारण, हल्ली सायबर हल्ल्यांचे, हॅकिंगसारखे सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, आपली सायबर सुरक्षा ही आपल्याच हाती आहे.- तन्मय टिल्लू