चिह्न निमित्त – निमित्त चिह्न भाग ५
महा एमटीबी   08-May-2018
“शाळा, माझी शाळा. हो..., मला आठवतंय अजून सगळं शाळेतलं.” कधीही – कुठेही रंगणारा हा संवाद. शाळकरी मित्र - मैत्रिणी, आई - वडील, भावंडे किंवा पती-पत्नी, ऐसपैस गप्पांसाठी अशा बालपणीच्या आठवणी सांगत मंडळी जमली की आवडीने होणारे स्मरणरंजन. मस्ती, अभ्यास, खेळ, शिक्षक ह्या सगळ्या आठवणी, त्या त्या गटानुसार वेगवेगळ्या असतील. मात्र देवी सरस्वती – देवी शारदा वंदन आणि दसऱ्याच्या दिवशीचे पाटीपूजन, त्यावर काढलेली आकड्यांची चित्रमय देवी सरस्वतीची प्रतिमा यात मात्र काहीच फरक नसतो. हा एक अनुभव, मराठी शाळेत – मराठी माध्यमात शिक्षण घेतलेल्या प्रत्यकाने निश्चित घेतलेला असतो.

आज लक्षात येते की, आपल्या शाळेतली देवी सरस्वतीची ती मूर्ती आणि दिसणाऱ्या तिच्या रंगीत प्रतिमा यात खूप वैविध्य आहे. शाळेच्या दर्शनी भागात आपण रोज पाहिलेली, अनेक पाकळ्यांच्या फुललेल्या कमळावर आसनस्थ झालेली आणि पुढच्या दोन हातात वीणा धारण केलेली देवी सरस्वती अथवा देवी शारदेची मूर्ती आपल्या सर्वांच्या स्मरणात असतेच. आपण जेव्हा तिचे चित्र अथवा छापील प्रतिमा पहातो तेव्हा त्यातील मोर, हंस, पोपट असे पक्षी आणि मेंढा, सिंह असे प्राणी अंकित झालेले आपल्या लक्षात येते. देवी सरस्वतीसह असे पक्षी आणि प्राणी असलेल्या विविध संयुक्त प्रतिमा (Composite icon) आपल्याला निरखून पहायच्या असतात. अशा संयुक्त प्रतिमांच्या चिह्नसंकेतांचा अभ्यास नेहमीच आनंदमयी असतो.

Taxonomy म्हणजेच वर्गीकरण शास्त्र या एका विज्ञानशाखेच्या माध्यमातून प्रत्येक चिह्नाचा वेगळा अभ्यास करताना, देवीच्या चित्रात दिसणारा एक सजीव पक्षी मोर, प्रथम आपले लक्ष वेधून घेतो. या मोराला देवी सरस्वतीचे वाहन असा सन्मान, पारंपारिक हिंदू धर्मीय चिह्नसंकेतात दिला गेला आहे. इथे एक गोष्ट समजून घ्यायला हवी की, कुठल्याही देव-देवतेचे ‘वाहन’ ही संकल्पना सांकेतिक आहे. आपण जसे सायकल वर अथवा घोड्यावर बसतो तशी देवी सरस्वती, या वाहनांवर बसत नाही. या चिह्नसंकेतांचा संदर्भ विस्तार याआणि पुढील लेखात पुढे केला आहे.

पारंपारिक भारतीय शिल्पकला अथवा चित्रशैली, धार्मिक विषयाची, श्रद्धा आणि भक्तीरसपूर्ण मांडणी करताना intuitive अर्थात अंत:प्रेरणेवर अथवा सहजज्ञान प्रवृत्तीवर आधारित असते. देवी सरस्वतीच्या विविध प्रतिमांमधे, देवी प्रत्यक्ष मोरावर अथवा हंसावर स्वार झालेली किंवा बसलेली आपण जरी पहात असलो तरी ती एक चित्रशैली आहे, ते चित्रकर्त्याने घेतलेले स्वातंत्र्य आहे हे प्रेक्षकाने समजून-जाणून घ्यायला हवे. याचे कारण असे कि अशा सजीव पक्षी-प्राण्यांची अथवा निर्जीव वस्तूंची संयुक्त चित्रातील मांडणी, देवी-देवतांशी त्यांचे सानिध्य आणि सुसंगती सुचवत असते आणि अनेक चिह्नसंकेतांचा संदर्भ देत असते...!!मोर


देवी सरस्वतीच्या या प्रतिमेतील मयूर किंवा मोर या पक्षाच्या चिह्नसंकेतांचे संदर्भ विलक्षण आहेत. ज्ञान, कला आणि विद्येची देवता देवी सरस्वती ही संकल्पना आणि तिचे शिल्प अथवा चित्र हि जशी मूळ प्राचीन भारतातील वैदिक काळातील आहे तसाच हा मोर सुद्धा मूळ या भारत भूमीतला पक्षी आहे. सौंदर्य आणि बुद्धिमत्ता या नर मोराच्या व्यक्तिमत्वातील प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या बाह्य सौंदर्याविषयी नव्याने काही लिहिण्याची गरज नाही मात्र या सौंदर्यामुळेच तो सजीवांच्या गर्वभावनेचे प्रतीक मानला गेला. अनेक राज्यकर्त्यांच्या अभिमानाचा मानदंड झाला. त्याची तल्लख बुद्धी आणि जागरूकता अशी कि जंगलातील उंच झाडावर बसलेल्या मोराला एखादा शिकारी प्राणी भक्ष शोधण्यासाठी झुडुपातून बाहेर पडलेला दिसला की सावधगिरीचा पहिला इशारा मोर देतो. तो राहतो त्या वातावरणात थोडासा जरी बदल झाला तरी या मोराच्या वागणुकीत पटकन फरक होतो कारण तो संवेदनशील असूनही फार संशयी वृत्तीचा आहे. याबरोबरच तो फार चंचल स्वभावाचा आहे. हिरवळीवर दाणे टिपणाऱ्या मोराचे चंचल विभ्रम आपण अनेकदा पहिले असतीलच. असा चंचल स्वभावधर्म, वागणूक आणि त्याचे तळपते रंग यामुळे तो अग्नीचे प्रतीक सुद्धा मानला जातो.

देवी सरस्वतीचे दुसरे वाहन मानला गेलेला पक्षी हंस याचे व्यक्तिमत्व असेच विलक्षण प्रभावी. देवी सरस्वतीच्या शुभ्र वस्त्राशी स्पर्धा करणारा हंसाचा शुभ्र रंग हे त्याचे प्रथम वैशिष्ट्य. मोरासारखीच बाकदार आणि लवचिक मान आणि शुभ्र वर्ण यामुळे देवी सरस्वतीचा हंस सुद्धा तितकाच सुंदर दिसतो. पाण्यात आणि जमिनीवर, दोन्हीकडे हंस तितक्याच डौलाने वावरताना दिसतो. हंसाला चोचीच्या आतल्या वरच्या - खालच्या बाजूला हलक्याशा दातेरी कडा असतात. केवड्याच्या पानाला हलक्या काटेरी कडा असतात, अगदी तशाच. चोचीच्या अशा नैसर्गिक अंतर्गत रचनेमुळे तो अर्धी मान पाण्याखाली घालून पाणवनस्पतीची मुळे, कंद, देठ, तंतू असे खाद्य चोचीने पाण्यातून ओढून बाहेर काढून खाऊ शकतो.
हंस


हंसाच्या या चोचीचे दुसरे वैशिष्ट्य असे की, पाण्याखालच्या कमळाच्या देठाला छेद करून त्या पाण्याने भरलेल्या देठातील पांढऱ्या रंगाचे एक प्रकारचे तंतू, ज्याला ‘मृणाल’ असे सुंदर संबोधन आहे, किंवा दुधी रंगाचा चीक, तो सहजपणे पाण्यातून वेगळे काढून खाऊ शकतो. आपल्या अभ्यासू, विद्वान आणि चतूर पूर्वजांनी, या देठातील पांढरे तंतू पाण्यापासून वेगळे काढण्याच्या हंसाच्या खास नैसर्गिक गुणवत्तेला, नीर-क्षीर विवेकाचे प्रतीक (पाण्यातून दूध वेगळे करण्याची क्षमता) मानून जणू त्याचा सन्मान केला. हंस कुळातील या पक्षांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील नर हंसाचे एकपत्नीत्व. तरुण वयात जमलेली हंसाची नर-मादीची जोडी, सहसा मृत्युपर्यंत अविभक्त रहाते.

कमळाचे फूल आणि देवी सरस्वतीचे पद्मासन हा या संयुक्त प्रतिमेतील महत्वाचा दुवा. जसा मोर या भारतभूमीतला पक्षी तसेच कमळाचे फूल सुद्धा या भारतभूमीतलेच. या कमळाच्या फुलाचे चिह्नसंकेत असेच फार अर्थवाही. प्राचीन भारतीय साहित्य आणि संस्कृतीमधे या कमळाच्या फुलाला फार महत्वाचे मंगलचिह्न मानले गेले. गोड्या पाण्याच्या तळ्यातल्या तीन-चार हात खाली दडलेल्या चिखलातून नैसर्गिक बीजारोपण आणि बीजधारणा होऊन या कमळाचा जन्म होतो. गावातल्या तळ्यात छत्राकृती दोन पानाच्या मधे उगवलेले, पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाचे कमळाचे फूल फार सुंदर दिसते. हेच ते देवी सरस्वतीचे आसन. आठ पाकळ्या असलेले शुभ्रकमलासन अर्थात शाळेत मुखोद्गत केलेल्या श्लोकातील श्वेतपद्मासन.!

श्वेतपद्म

अज्ञानरूपी चिखलातून वर येऊन ज्ञानाच्या प्रकाशाची दिशा दाखवणारे श्वेतपद्म. या कमळाच्या चिह्नसंकेत वैशिष्ट्यामुळेच विद्या, कला आणि ज्ञानाची देवी सरस्वती या शुभ्रकमळावर आसनस्थ झाली आहे.

संयुक्त प्रतिमेतील मोर, हंस आणि कमळ या चिह्नांची स्वाभाविक नैसर्गिक व्यष्टी (फक्त त्यांची) वैशिष्ठ्ये आणि देवीबरोबर त्यांचे सानिध्य आणि सुसंगती याचे चिह्नसंकेत आणि चिह्नार्थ याचा परिचय फारच रंजक आहे.!


- अरुण फडके