पुरस्कार्थींची पिरपिर
महा एमटीबी   07-May-2018मागेही काही लोकांनी असहिष्णुता वगैरे म्हणत स्वतःच असहिष्णू होऊन मिळालेले सरकारी पुरस्कार परत केले होते. गंमत म्हणजे त्यानंतर बहुसंख्य लोकांना कळले होते की, यांनाही कशाबद्दल तरी पुरस्कार मिळाला होता बरं का? आता पुरस्काराबद्दल नवीन कहाणी चालू आहे. कहाणी यासाठी की, ”आम्हाला राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार का नाही दिला?,” असे म्हणत ७० कलाकारांनी पुरस्कार घेण्यास नकार दिला म्हणे. त्यांची भूमिका पाहून सखेद आश्‍चर्य वाटले. अर्थात ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे. पण तरीदेखील या नकाराने काही प्रश्‍न उपस्थित राहिले आहेत. ज्यांनी कोणी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाल्यावरच पुरस्कार स्वीकारणार, अशी भूमिका घेतली होती. त्यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळवण्यासाठीच कलानिर्मिती किंवा सर्जनशील निर्मिती केली होती का? आपल्या कलेची प्रतिष्ठा अमुक एक पदावर विराजमान असलेल्या व्यक्‍तीच्या हस्ते पुरस्कार मिळण्यावरच अवलंबून असते का? कितीतरी प्रश्‍न.

खरे कर्मवीर आणि जातीचे कलाकार हे वेडे पीर असतात. आपल्या कलेमध्ये, कर्तृत्वामध्ये ते आकंठ समरस होऊन त्यांना ध्यास असतो फक्‍त सर्जनशीलतेचा. त्यामध्ये मातृभूमीसाठी आयुष्याचा होम करणारे स्वातंत्र्ययोद्धे असू देत की, सर्जनशील सच्चे कलाकार असू देत. या सार्‍यांची कृती, कला ही त्यांच्या आत्म्याचा साक्षात्कार असते. पुरस्काराचाच म्हणाल तर उत्तम उदाहरण म्हणजे कोवळ्या वयात देशाच्या सीमेचे रक्षण करताना मृत्यूमुखी पडणारेा वीर जवान. मरण पत्करताना त्यांच्या मनात असे नसते की ’वा! आता मेलो की मला मेल्यानंतर विरचक्र वगैरे सन्मान प्राप्‍त होईल. त्यांचे मरणे जगणे मातृभूमीसाठीच असते.पूर्वी एक वाद होता, कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला. आता नवाच वाद आहे कुणाच्या हस्ते पुरस्कार? पुरस्कारावरून आकाशपाताळ एक करणार्‍यांबद्दल वाटते की, निर्मितीचा साधन म्हणून वापर करणार्‍यांना आतून जिवंत होणार्‍या कलेची जाणीव तरी असेल का? असेच असेल तर मग त्यांची कला ही कला न ठरता पुरस्कार्थींची पिरपिर आहे.


000000000000000000000
भयंकर गुन्हा..


मुंबई विषयावर संवादात्मक कार्यक्रम होता. मुंबईबाबतचे सगळेच पैलू मांडले गेले, पण त्यातही सगळे छान छान गोड गोड बोलल्यानंतर सगळ्यांनी जे काही कमी शब्दांत मांडले ते ऐकून मुंबईकर म्हणून दुःखच वाटले. त्यांचे म्हणणे काही नवीन नव्हते. आपण सगळ्यांनीच ते अनुभवले होते. सर्वांनुमत होते की मुंबईमधल्या बहुसंख्य लेाकांची वर्गवारी थुंके, शिंके आणि फुंके यामध्ये होऊ शकते. इथे तिथे पचापच थुंकणारे लोक, बिनदिक्‍कतपणे सार्वजनिक ठिकाणी सर्रास सिगारेट-विडीचे झुरके घेणारे लोक आणि या सर्वांच्या त्रासाने आकछी! आकछी! करत शिंकणारे लोक.

अंतर्मुख करणारी वर्गवारी. थुंकणार्‍यांनी तर कहरच केला आहे. गड-किल्‍ले, पर्यटनस्थळे, सरकारी कार्यालये, रस्ते, स्टेशन, बसडेपो, पूल काही काही न सोडता हे थुंके थुंकून थुंकून सगळ्याच गोष्टींची बरबादी करत असतात. मागे समाजमाध्यमांमध्ये बातमी फिरत होती की, सैनिकांनी बांधलेला परळचा नवाकोरा पूलही काही दिवसांतच घाणेरड्या थुंकण्याने बेरंग झाला होता. थुंकणार्‍या लोकांना ना सैनिकांच्या कष्टाचे मोल आहे ना स्वच्छ भारत अभियानांचा मागमूस आहे. तोंडात गुटखा, पान तंबाखू खाऊन थुंंकत राहायचे, अशी तद्दन विकृत मानसिकता त्यांच्यामध्ये वसलेली.

कालच्याच बातम्या, एका बातमीनुसार रिक्षा चालवत असताना तंबाखू खात असतानाच तंबाखूची खाली पडलेली पुडी उचलण्यासाठी रिक्षाचालक खाली वाकला आणि त्याचा रिक्षावरचा ताबा सुटला. त्यात एक प्रवासी जागीच ठार झाला. तर रिक्षाचालकासह तीन जण जबर जखमी झाले. दुसरी घटना विशाखापट्टणम् एक्सप्रेसमधली. अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यान गाडीतला प्रवासी रेडीया पाटलावत हा थुंकण्यासाठी गाडीच्या दरवाजाजवळ गेला. थुंंकत असताना त्याचा तोल गेला आणि मृत पावला. अपवादात्मक घटना आहेत. पण हिमनगाचे टोक आहेत. थुंकण्याचे परिणाम मोजताना क्षयरोगासोबतच इतर संसर्गजन्य रोगांचे वाढते प्रमाण पाहिले तर वाटते की थुंकणे हा देखील भयंकर गुन्हा ठरवला गेला पाहिजे. हे ’स्वच्छ भारता’साठी आवश्यक आहे.


- योगिता साळवी