भारत-चीन संबंधाचा नवा अध्याय!
महा एमटीबी   07-May-2018

चीनचे राष्ट्रपती शी जिनिंपग व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-चीन संबंधाचा नवा अध्याय सुरू केला. मोदी यांच्या दोन दिवसांच्या चीन दौर्‍याबाबत कोणतेही प्रसिद्धिपत्रक वा निवेदन जारी करण्यात आले नसले तरी, डोकलाम प्रकरणी दोन्ही देशात 73 दिवस चाललेले शीतयुद्ध आता इतिहासात जमा झाले असे मानण्यास हरकत नाही.
वर्षभरापूर्वी चीनने डोकलाम भागात अचानक तणाव निर्माण केला होता. डोकलाम भागात चीन मोठा रस्ता बांधत असून, दरवर्षी साधारणत: एक किलोमीटर याप्रमाणे चीनचा रस्ताबांधणी कार्यक्रम सुरू होता. मागील वर्षी त्याला भारतीय सैन्याने विरोध केल्यानंतर डोकलाम गतिरोध सुरू झाला व तो 73 दिवस चालला. नंतर दोन्ही देशांनी समोरासमोर उभे ठाकलेले सैन्य मागे घेतले. यानंतर भारत-चीन संबंधातील तणाव कमी झाला तरी, त्यात सहजता आली नव्हती.

वुहान परिषद
मोदी-शी जिनिंपग यांच्यात चीनच्या वुहान शहरात झालेल्या दोन दिवसांच्या परिषदेत डोकलामची पुनरावृत्ती टाळण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सीमेवर तणाव निर्माण होण्याची जी कारणे असतात, त्यातील एक महत्त्वाचे कारण असते, दोन्ही देशांच्या लष्करी तुकड्याकडून घातली जाणारी गस्त. दोन्ही देशांच्या लष्करी तुकड्या कधी कधी याला आक्षेप घेतात व त्यातून संघर्षाची ठिणगी पडते. यावर उपाय म्हणून, दुसर्‍या देशाला एखाद्या भागात गस्त घालावयाची असेल तर दुसरा देश त्याला विरोध न करता, त्याच्यासोबत आपलीही तुकडी पाठवील. म्हणजे चीन व भारत यांच्या लष्करी तुकड्या सीमेवर गस्त घालणार असतील तर काही भागात त्यात दोन्ही देशांच्या तुकड्याही सामील होतील. सीमेवर निर्माण होणारा तणाव यामुळे कमी होईल असे मानले जाते.
साशंकता कायम
मोदी-शी जिनिंपग यांनी सीमेवरील तणाव कमी करण्याचा निर्णय घेतला असला तरी, चीनवर किती आणि कसा विश्वास ठेवायचा असा एक प्रश्न विचारला जातो. चीन-पाकिस्तान यांच्यात घनिष्ठ आर्थिक संबंध व सहकार्य होत आहे. चीन लगेच पाकिस्तानला नाराज करून भारताला सहकार्य करील असे कोणालाही वाटत नाही. उलट भारतावर कायम दबाव ठेवण्यासाठी तो पाकिस्तानचा वापर करीत असल्याचे तज्ज्ञांना वाटते. चीनने भारताशी संबंध सुधारण्याचा निर्णय घेतला असला तरी पाकिस्तानबाबत त्याच्या भूमिकेत बदल झाला असल्याचा कोणताही संकेत नाही. चीनने पाकिस्तानसोबतही मधुर संबंध कायम ठेवल्यास, एकाच वेळी भारत आणि पाकिस्तान यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याची कसरत त्याला करावी लागेल आणि ती फार काळ करता येणार नाही.
चीनला सुबुद्धी?
दक्षिण-उत्तर कोरियातील तणाव कमी करण्यात चीनने मोठी भूमिका बजावली असल्याचे मानले जाते. चीनच्या होकाराशिवाय उत्तर कोरियाने आपल्या आण्विक कार्यक्रमाला बंद करून, दक्षिण कोरियाशी मैत्री करण्याचा निर्णय घेतलेला नाही. अशीच सुबुद्धी चीनला भारत-पाक संबंधाबाबत झाली काय, असा प्रश्न विचारला जात आहे. चीनची अचानक बदललेली भूमिका अनेकांसाठी धक्कादायक ठरत आहे. चीन आजवर धोका देत वागत आला आहे. आपल्या शब्दावर कायम राहण्याचा चीनचा इतिहास नाही. आज त्याने भारतासोबतचे संबंध सुरळीत करण्याचा निर्णय घेतला असला तरी चीन पुन्हा पूर्वपदावर येण्याची शक्यता नाकारली जात नाही. ही सारी स्थिती विचारात घेऊनच भारतीय लष्कर आपली भूमिका ठरवीत असल्याचे समजते. चीनसोबतच्या सीमारेषेवरील गस्त कमी करीत असताना, त्यात जोखीम असणार नाही याची काळजी घेत, भारतीय लष्कर आपला निर्णय घेत असल्याचे समजते. चीनसोबत चांगले संबंध कायम ठेवीत असताना, त्याला डोकलामध्ये रस्ता बांधू न देण्याचा निर्णय भारतीय लष्कराला कायम ठेवावा लागेल.
कैलास यात्रा
कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी कर्नाटक निवडणुकीनंतर कैलास मानसरोवराच्या यात्रेवर जाणार आहेत. कर्नाटक दौर्‍यावर जाताना त्यांचे विमान हेलकावे खावू लागले. ‘आता संपले’ असा भाव त्यांच्या मनात आला. मात्र ते बचावले आणि त्यांनी कैलास मानसरोवर यात्रेवर जाण्याचा निर्णय घेतला. भारतीय राजकारण, भारताचा स्वातंत्र्यलढा याचा धर्माशी फार जवळचा संबंध आहे. कन्हैयालाल मुन्शी हे स्वातंत्र्यलढ्यातील एक मोठे नाव. त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास लिहिला. त्याचे शीर्षकच मुळी होते, ‘पिलग्रीमेज टू फ्रीडम’ -स्वातंत्र्याची तीर्थयात्रा. कॉंग्रेसने प्रारंभीच्या काळात हिंदूविरोधी राजकारण केले नव्हते. नंतर कॉंग्रेसला धर्मनिरपेक्षतेचा आजार जडला. आणिबाणी काळात घटनादुरुस्ती करून राज्यघटनेत समाजवाद, धर्मनिरपेक्ष असे शब्द नव्याने जोडण्यात आलेत. मात्र, कॉंग्रेसचा रंग बदलला तो मागील काही वर्षांत. सोनिया गांधींना भारताची संस्कृती, भारतीय जनमानस याची पार कल्पना नव्हती. त्याचा फायदा दिग्विजयिंसगसारख्या नेत्यांनी उचलला. त्यातून भगवा दहशतवाद जन्मास आला. या सार्‍याचा फटका कॉंग्रेसला 2014 च्या निवडणुकीत बसला. त्या पराभवाचा विचार, विश्लेषण करण्यासाठी कॉंग्रेसने एक एंटोनी समिती नेमली. या समितीने कॉंग्रेस पक्ष बहुसंख्य हिंदू समाजापासून दुरावला असल्याचे निदान केले. सोनिया गांधींचा एंटोनी यांच्यावर विश्वास असल्याने, पक्षाने एंटोनी समिती स्वीकारण्याचा निर्णय घेतला. कॉंग्रेसने पुन्हा आपला रंग बदलण्याचा निर्णय घेतला. त्याचा प्रयोग गुजरात निवडणुकीत केला. त्याचा पक्षाला फायदा झाल्याने, कर्नाटकात राहुल गांधींनी मठ-मंदिरात जाण्याचा सपाटा चालू ठेवला. या सार्‍या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा कैलास मानसरोवर यात्रा करण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जाईल. याचा त्यांना व त्यांच्या पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे. भारताचे राजकारण, बहुसंख्य समाजाला डावलून, दुखावून करता येणार नाही हे सत्य, कॉंग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी ओळखले आहे असे दिसते. विशेष म्हणजे, कॉंग्रेसला हिंदू दहशतवादाची दीक्षा देणारे दिग्विजयिंसग सध्या नर्मदा परिक्रमा यात्रेवर आहेत. त्यांनाही आपल्या चुकीची जाणीव झालेली दिसते.
हिंदू प्रतिमा?
राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सांभाळल्यापासून, कॉंग्रेसची मुस्लिम प्रतिमा काहीशी सौम्य झाली आहे. कॉंग्रेसने सौम्य हिंदुत्वाचा पुरस्कार केला असल्याचे दिसून येते. ते हिंदुत्व अधिक वाढविण्याचा प्रयत्न येणार्‍या काळात पक्षाकडून केला जाण्याची शक्यता आहे. पक्षाचे नेते तसा संकेत देत आहेत. त्याचाच एक टप्पा म्हणून राहुल गांधींच्या कैलास मानसरोवर यात्रेकडे पाहिले जात आहे.