हवाई बेटावर ज्वालामुखीचा विस्फोट
महा एमटीबी   05-May-2018

नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे सरकारचे आदेशहवाई : प्रशांत महासागरामध्ये वसलेल्या हवाई बेटाला आज भूकंपाचा तीव्र झटका बसला असून यामुळे बेटावर असलेच्या ज्वालामुखीचा देखील स्फोट झाला आहे. त्यामुळे ज्वालामुखीमधील लावा बाहेर येऊ लागला आहे. तसेच वातावरणामध्ये देखील विषारी वायू पसरू लागला आहे. त्यामुळे नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश येथील स्थानिक प्रशासनाने दिले आहेत.

शुक्रवारी हवाई बेटाला ६.९ रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला होता. या तीव्र झटक्यामुळे बेटावर असलेल्या ज्वालामुखी थोड्याच वेळात सक्रीय झाला व त्यातून लावा बाहेर पडू लागला. हा लावा आपल्या आसपासची झाडे जाळत थेट रस्त्यावर उतराला त्यामुळे रस्त्यांच्या कडेला असलेल्या काही घरांना देखील याची झळ पोहोचली. यानंतर याठिकाणी असलेल्या आपत्कालीन व्यवस्थेने तातडीने नागरिकांच्या मदतीसाठी धाव घेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवले. तसेच लावा अधिक पसरू नये म्हणून रस्त्यावर काही ठिकाणी माती आणि इतर भर टाकून लावा अडवून धरण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला. परंतु लाव्याबरोबरच ज्वालामुखीमधून मोठ्या प्रमाणात राख आणि विषारी वायू देखील बाहेर पडत असल्यामुळे ज्वालामुखी जवळील सर्व वातावरण हे दुषित आणि विषारी होऊ लागले, त्यामुळे नागरिकांना ज्वालामुखीपासून सुरक्षित अंतरावर आदेश देण्यात आले आहेत.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्यामुळे हवाई बेटांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. अशावेळी ही घटना घडल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा दृष्टीने देखील विशेस प्रयत्न करण्यात येत आहे. दरम्यान आतापर्यंत यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. त्यामुळे सर्व नागरिक सुखरूप असल्याची अटकळी बांधली जात आहे.