समान वेतनाचा तिढा...
महा एमटीबी   05-May-2018


आज कायद्याने पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना अनेक हक्‍क, अधिकार मिळवून दिले आहेत. स्त्रियांचे सक्षमीकरण झाले आहे. ही बाब खरी असली तरी अजूनही स्त्री-पुरुषांमधला भेदभाव पूर्णपणे नष्ट झाला, असं मुळीच म्हणता येणार नाही. स्त्री-पुरुष समानता पूर्णतः नष्ट झाली, असं तुमचं मत असेल तर थोडं थांबा. केवळ भारतामध्येच नाही, तर देश-विदेशामध्येही स्त्री-पुरुष भेदभाव केला जात असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. भारतामध्ये महिलांची कमाई पुरुषांपेक्षा १६.१ टक्के कमी आहे. अर्थात, भारतात महिलांना पुरुषांपेक्षा जवळपास १६.१ टक्के वेतन कमी दिले जाते. केवळ भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये नोकरीच्या ठिकाणी लिंगभेद आजच्या काळातही सुरूच आहे. ’कॉर्न फेरी जेंडर पे इंडेक्स’च्या अहवालातून यासंदर्भातील माहिती समोर आली आहे.


जागतिक स्तराचा विचार केला असता, तेथेही महिलांची स्थिती सारखीच आहे. जागतिक स्तरावरही पुरुषांपेक्षा जवळपास १६.१ टक्के वेतन महिलांना कमी दिले जाते. एकाच कंपनीमध्ये समकक्ष काम करणार्‍या पुरुष आणि महिलेच्या वेतनामध्ये जवळपास दीड टक्क्यांची तफावत पाहायला मिळते, तर सारखेच काम करणार्‍यांमध्ये हे अंतर केवळ ०.५ टक्क्यांनी कमी आहे. भारतामध्ये एकाच पातळीवर काम करणार्‍या महिला व पुरुषांच्या वेतनामधील अंतर चार टक्के आहे, तर एकसारखेच काम, जबाबदारी हाताळणार्‍या कंपन्यांमध्ये हेच अंतर ०.४ टक्क्यांनी कमी आहे. ’कॉर्न फेरी जेंडर पे इंडेक्स’तर्फे ५३ देशांतील १४ हजार कंपन्यांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये जवळपास १२.३ दशलक्ष कर्मचार्‍यांच्या वेतनाचा समावेश आहे. काही कंपन्यांमध्ये महिलांना सरासरीपेक्षाही कमी वेतन दिले जाते. एकाच पदावरील कर्मचार्‍यांचा अभ्यास केल्यास हा आकडा कमी होत असल्याचे ‘कॉर्न फेरी’चे मुख्य अधिकारी बॉब वेस्सलकॅम्पर यांनी सांगितले. भारतातील वेतन लिंगभेद हा शेजारच्या चीनपेक्षाही जास्त आहे. चीनचा १२.१ टक्के आहे, तर ब्राझीलसारख्या देशांमध्ये हाच आकडा २६.२ म्हणजेच सर्वाधिक आहे. फ्रान्समध्ये १४.१, जर्मनी १६८, यूकेमध्ये २३.८ आणि अमेरिकेमध्ये १७.६ आहे. गेल्यावर्षी देशातील माहिती-तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्रामध्ये नोकरी करणार्‍या महिलांचे वेतन पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. एकाच श्रेणीत काम करणार्‍या पुरुषांपेक्षा महिलांना मिळणारे वेतन कमी असल्याचे दिसून आले होते. ’मॉन्स्टर डॉट कॉम’ या संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली होती.


‘मास्टर सॅलरी इंडेक्स-आयटी सेक्टर रिपोर्ट’च्या अहवालानुसार देशात आयटी क्षेत्रामध्ये काम करणार्‍या महिलांची संख्या एकूण संख्येच्या तुलनेत केवळ ३० टक्के इतकीच आहे. त्याचबरोबर वेतनातही मोठा फरक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून, पुरुषांच्या तुलनेत महिलांना २९ टक्के वेतन कमी मिळते, असे म्हटले आहे. या क्षेत्रातील एका पुरुष कर्मचार्‍याचे वेतन ३५९ रुपये २५ पैसे प्रती तास आहे, तर महिला कर्मचार्‍यांचे हेच वेतन २५४ रुपये ४ पैसे एवढे आहे. वरिष्ठ पदावर महिलांच्या तुलनेत पुरुषांना अधिक संधी मिळत असल्याने हा फरक असल्याचेही अहवालात म्हटले आहे. असे असले तरी आईसलँड हा देश मात्र याला अपवाद ठरला आहे. आईसलँड देशातील महिला आणि पुरुषांना समान वेतन दिले जात आहे. यासोबतच नोकरी देणार्‍या संस्थांनी जातीयता, राष्ट्रीयता यांच्याबद्दल कोणताही भेदभाव न करता कर्मचार्‍यांना समान वेतन द्यावे, यासाठी आईसलँड सरकारकडून पुढाकार घेण्यात आला. २५ पेक्षा अधिक कर्मचारी संख्या असलेल्या कंपन्यांना आणि संस्थांना त्यांच्याकडे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना महिला आणि पुरुष कर्मचार्‍यांना समान वेतन द्यावे लागत आहे. यासोबतच कंपन्यांना याबद्दलचा पुरावा सरकारला देऊन प्रमाणपत्रदेखील मिळवावे लागत आहे. महिला आणि पुरुष कर्मचार्‍यांना सारख्या श्रमांसाठी सारखे वेतन देणारा आईसलँड हा पहिला देश ठरला आहे. तेव्हा, भारतातही कमाईच्या बाबतीत ही समानता साधली जाईल का, ते पाहायचे.


- सोनाली रासकर