'काय आहे बकेट लिस्ट ?', ऐका माधुरीच्या तोंडून
महा एमटीबी   04-May-2018

धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित पहिला मराठी चित्रपट 'बकेट लिस्ट' याचित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. स्वतः माधुरीने तिच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला असून 'बकेट लिस्ट म्हणजे काय ?' या अनेकांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर अत्यंत सुंदर पद्धतीने तिने यामध्ये दिले आहे.

एका सुशिक्षित अशा मराठी कुटुंबातील सुनेच्या भुमिकेमध्ये माधुरी या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरूनचा चित्रपटाची एकूण कथा लक्षात येत असून ट्रेलरवरूनच यामध्ये माधुरीला हृदयाचा आजार असल्याचे समजून येते. यावर उपाय म्हणून सई नावाच्या एका मुलीच्या हृदयाचे माधुरीमध्ये प्रत्यारोपण करण्यात येते. यानंतर या सईचा जीवनाचा शोध घेत आणि तिच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय ती घेते आणि यातूनच सुरु होतो तिचा बकेट लिस्ट पूर्ण करण्याचा प्रवास. परंतु हा प्रवास पूर्ण होतो का ? हे मात्र हा चित्रपट पहिल्यानंतरच लक्षात घेईल.

चित्रपटाच्या ट्रेलरवरूनच माधुरीने यामध्ये अत्यंत सुंदर अभिनय केल्याचे दिसून येत आहे. एक आई, बायको आणि सून अशा वेगवेगळ्या भुमिका अत्यंत उत्तमपणे तिने सादर केल्या असल्याचे यामध्ये दिसते. त्यामुळे ट्रेलर पाहूनच चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण होते. विशेष म्हणजे करण जोहर हा स्वतः या चित्रपटाचा प्रस्तुतकर्ता असून तसेच बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर यामध्ये एका छोट्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे हिंदी चित्रपट सृष्टीतील आणखी काही नावे मराठीशी जोडली जाणार आहेत. तेजस देऊसकर यांची दिग्दर्शित केलेला हा चित्रपट येत्या २५ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.