रक्तदान यह श्रेष्ठ साधना
महा एमटीबी   04-May-2018
मागील वर्षी म्हणजे सन २०१७ मध्ये रक्तदान प्रबोधनासाठी जनकल्याण रक्तपेढीव्दारा निर्मित ’रक्तदान प्रेरणागीत’ हे हिंदी गीत ध्वनिमुद्रित झालं. पुणे आकाशवाणीवर ते प्रसारितही झालं. शाळा, महाविद्यालये, रक्तदान शिबिरे इ. विविध ठिकाणी रक्तदान प्रबोधनासाठी ते आता वापरलं जाऊ लागलं आहे. एखाद्या रक्तपेढीने अशा प्रकारच्या गीताची निर्मिती करणे असे कदाचित प्रथमच झाले असावे. ’रक्तदानाच्या कृतीमागचा भारतीय विचार’ अशी या गीताची मध्यवर्ती कल्पना आहे. असा विचार जेव्हा गीत-संगीताच्या माध्यमातून मांडला जातो, तेव्हा त्याचा प्रभाव काही पटींनी वाढतो. प्रेरणागीत ऐकताना तर हे नक्कीच जाणवते. पं. जितेंद्र अभिषेकींचे शिष्य असलेले संगीतकार जीवन धर्माधिकारी यांचं संगीत आणि सुप्रसिद्ध गायक जितेंद्र अभ्यंकर यांचा सुरेल स्वर या गीतास लाभला. या गीताचे शब्द लिहिण्याचे सौभाग्य मला मिळाले. तसं खास ठरवून तयार झालेलं हे गीत नाही, मात्र ही निर्मितीप्रक्रिया मोठी रंजक आहे.

त्याचं झालं असं - रक्तपेढीचा वार्षिक वृत्तांत ’समर्पण – २०१७’ चे काम चालले होते. ’समर्पण’मधील सर्व प्रकारच्या साहित्याविषयी रक्तपेढीचा अधिकारी वर्ग सातत्याने चर्चा करतो. या चर्चेतच ’समर्पण’च्या मलपृष्ठावर ’सीमेअंतर्गत / सीमेवर हुतात्मा होणाऱ्या जवानांना श्रद्धांजली’ अशी थीम घेऊन चित्र व संदेश द्यावा असे ठरले. डिजाईन तयारही झाले, फ़क्त त्यावर लिहिलेल्या गद्य संदेशात कुठे श्रद्धांजलीचा भाव येत नव्हता, म्हणून नव्याने संदेश तयार करावा अशी चर्चा आमच्या समुहात चाललेली होती. अचानक तदनुरूप काही ओळी सुचल्या. त्या अशा –


असो आक्रमण परक्यांचे वा, स्वकियांकडूनी होवो घात
लढती जे निज रक्त सांडुनी, मारित अथवा मरुनी जात
सादर श्रद्धासुमने अर्पित, मृत्यूंजय त्या वीरांप्रति
रक्ताचे त्या मोल चुकविण्या, रक्तदान ही श्रेष्ठ कृती


याच ओळींचा पुढे समर्पणच्या मलपृष्ठावर वापर करण्यात आला. माझ्यापुरता विषय संपलेला होता. पण काही दिवसांनीच संगीतकार जीवन धर्माधिकारी – जे रक्तपेढी परिवाराचेच घटक असल्यासारखे आहेत - यांनी या ओळी पाहिल्या आणि ’रक्तदान ही श्रेष्ठ कृती’ हे धृपद घेऊन या कवितेचा विस्तार करण्याबाबत त्यांनी खूपच आग्रह धरला. यानंतरच खऱ्या अर्थाने ’रक्तदानाच्या कृतीमागील आदर्श भारतीय विचार काय असु शकतो’ यावर चिंतन चालु झाले. उत्तर मिळाले – कृतज्ञता ! शिवाय ’स्वेच्छा रक्तदान’ हा तर जनकल्याण रक्तपेढीच्या कार्याचा मूलभूत आधार आहे आणि कृतज्ञतेचा शुद्ध भाव हीच स्वेच्छा रक्तदानामागची प्रेरणा असते हेही नक्की. तोच भाव फ़क्त गीताव्दारे प्रकट करायचा होता, इतकेच. पहिली ओळ सहज होऊन गेली –


कृतज्ञतेचे करण्या प्रकटन, रक्तदान ही श्रेष्ठ कृती

कृतज्ञता सर्वांबद्दलच असायला हवी आणि याच भावनेने रक्तदान केल्यास ती श्रेष्ठ कृती ठरणारच. सैनिकांबद्दलची कृतज्ञता तर पहिल्या ओळींच्या निमित्ताने आलीच होती. त्याबरोबरच अन्नदाता शेतकरी आणि मानवी जीवन सुखकर करण्यासाठी झटणारा वैज्ञानिक हेदेखील समाजातील अत्यंत महत्वाचे घटक आहेत. त्यांच्याबद्दलचा आदर ही रक्तदानामागील एक प्रेरणा नक्कीच असु शकते, असा विचार करत  –
शेतकरी दिनरात राबती, अन्न मिळाया जगतासी
अविरत चाले दानयज्ञ हा, नित्य लढुनिया दैवाशी
कृषीवलांचे ऋण सर्वांवरी, चुकवावे ते कसे, किती ?
अल्पांशे होण्या उतराई, रक्तदान ही श्रेष्ठ कृती


आणि


सुखकर होण्या सकल जीवने, कार्यमग्न जे अनुसंधानी
वैज्ञानिक ते श्रेष्ठ ऋषीवर, ज्ञान बुद्धिचे असति धनी
नित्य असावे कृतज्ञ ऐशा, समर्पित ज्ञानियांप्रति
शुद्ध भाव हा प्रकट कराया, रक्तदान ही श्रेष्ठ कृती

या ओळी तयार झाल्या. ’जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ चे वर्तुळ पूर्ण झाले. पण विचार थांबेना. आपले व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने घडते ते समाजामुळेच. या संपूर्ण समाजाचेही ऋण आपल्या सर्वांवर आहेच की. मग रक्तदानामागे सामाजिक ऋणांचीही जाण ठेवून समाजहित हेच ध्येय असायला हवे, हा विचार पुढील ओळींतून प्रकटला –

धन्य समष्टी जिच्या कारणे, व्यक्तित्वा आकार मिळे
सुहृद लाभती जीवनपथि या, आणि संस्कृती फ़ुले फ़ळे
समष्टीचे उपकार स्मरावे, व्हावे जीवन ध्येयव्रती
एकसूत्री हा समाज करण्या, रक्तदान ही श्रेष्ठ कृती


विचार आणखी विस्तारला. समाजाबरोबरच निसर्गदेखील आपल्याला कितीतरी जीवनावश्यक गोष्टी भरभरुन देत असतो. हवा, पाणी, अन्न, पशुधन अशा कितीतरी गोष्टी निसर्गातून सहजपणे सर्वांना मिळतात. निसर्गाप्रति कृतज्ञतेचा भाव हाही आपल्या संस्कृतीतूनच आलेला आहे. हा भावही दर्शविण्यासाठी रक्तदान करता येईलच की –


झाडे, वेली, पशु-पक्षी अन, सागर सरिता सृष्टी चराचर
दो हाते भरभरून देई, समृद्धीचे दान निरंतर
या दानातून घेत प्रेरणा, जनकल्याणा देऊ गती
सृष्टीचे ऋण स्मरुनि करावी,रक्तदान ही श्रेष्ठ कृती

ज्या देशाने सर्व जगाला सभ्यता आणि संस्कृती शिकवली त्या भारतात आपण जन्माला आलो, हे आपले केवढे भाग्य. ’दम निकले इस देश की खातिर, बस इतना अरमान है’ असा विचार प्रत्यक्ष जगुन दाखविणाऱ्या हजारो देशभक्तांची परंपरा भारताला लाभली आहे. मग ’मनातील राष्ट्रभक्तीचे प्रकटीकरण म्हणून जर रक्तदान केले गेले तर ती कृती श्रेष्ठ ठरेल की नाही ? –

भरतभूमी ही माय आपुली, जिच्या कुशीने जन्म दिला
पांग फ़ेडण्या मायभूमीचे, जीवन अवघे वाहु चला
राष्ट्राचे उपकार स्मरित हो, तयाकारणी लीन मती
राष्ट्रभक्ती नित मनी जागण्या, रक्तदान ही श्रेष्ठ कृती


भारतीय विचार केवळ ऐहिकापाशी थांबत नाही तर ’मी जन्माला का आलो, माझ्या जन्माचे प्रयोजन काय आहे’ याचाही शोध भारतीय तत्वज्ञान घेत आलेले आहे. संपूर्ण विश्वाच्या निर्मितीचं कारण असलेली ईश्वरी शक्ती हीच आपल्याही जीवनाचे निमित्त आहे, ही श्रद्धा येथे जपली गेली आहे. मिळालेले जीवन सुंदर आहे हे तर खरेच पण ज्या परमशक्तीमुळे ते लाभले त्याविषयीची कृतज्ञता सर्वांच्या मनात असतेच. कधी ती भजन-पूजनाव्दारे प्रकट होते तर कधी दानधर्मांतून. रक्तदानासारख्या परोपकारी कृतीतूनही ही श्रद्धा निश्चितच प्रकट होऊ शकते. कारण ’पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा’ असे अध्यात्माचे नेमके सार या संस्कृतीनेच सांगितले आहे –
सादर वंदन परम शक्तीला, जन्म मानवी आम्हा दिला
नरदेहाचे सार्थक करण्या, दिली बुद्धि निर्मिल्या कला
ऋण फ़ेडाया परमेशाचे, परोपकारी जडो मती
परहित ऐसे नित्य साधण्या, रक्तदान ही श्रेष्ठ कृती

अशा प्रकारे जीवनातील सर्व घटकांबद्दलची कृतज्ञता रक्तदानासारख्या कृतीतून व्यक्त व्हावी असा विचार मांडणारं हे गीत तयार झालं. ’हेच गीत हिंदी भाषेत झालं तर ते अधिक व्यापक स्तरावर घेऊन जाता येईल’ असा विचार आमच्यापैकीच काही अधिकाऱ्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाला आणि मग पुढचा टप्पा सुरु झाला. ’कृती’ हा शब्द हिंदी काव्यात ठीक वाटणार नाही असे वाटुन काही दिवस तो विषय तसाच राहुन गेला आणि एके दिवशी अचानक ’रक्तदान यह श्रेष्ठ साधना’ ही ओळ सुचली. मग मात्र एकाच दिवसात ही संपूर्ण कविता भावानुवाद बनुन हिंदीमध्ये रुपांतरित झाली.

कृतज्ञता को रखती जागृत, रक्तदान यह श्रेष्ठ साधना

असे शब्द घेऊन हीच कविता नव्याने अवतरली. मग मात्र जीवन धर्माधिकारी यांनी तातडीने या हिंदी गीताची सुंदर चाल बांधली आणि यथावकाश ती ध्वनिमुद्रितही करुन घेतली. श्री. धर्माधिकारी यांच्यासह संगीत संयोजक आनंद कुर्हेकर आणि गायक जितेंद्र अभ्यंकर यांनीही या गीतात आपले प्राण ओतले आणि त्याचे अक्षरश: सोने केले. सप्टेंबर महिन्यात या गीताचे ध्वनिमुद्रण पूर्ण झाले आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या ’रक्तदाता मेळाव्या’मध्ये या गीताचे रितसर लोकार्पणही करण्यात आले. मराठी गीत आधी तयार झाले असले तरी प्रथम ध्वनिमुद्रित झाले ते हिंदी गीत. अलिकडेच या मूळ मराठी गीताचेही ध्वनिमुद्रण याच टीमने पूर्ण केले असून तेही अत्यंत श्रवणीय व दर्जेदार बनले आहे. शाळा, महाविद्यालये, रक्तदान शिबिरे इ. मधून प्रबोधनासाठी प्रेरणागीताचे प्रसारण चालु झाले आहे. श्राव्य माध्यमाबरोबरच दृक माध्यमातूनही हे गीत लवकरच पुढे येईलच.

संगीत हे एक माध्यम आहे, सद्भावनेने रक्तदान करणाऱ्या तरुणांची संख्या वाढली पाहिजे आणि अर्थातच सद्भावही वाढला पाहिजे, हा या उपक्रमाचा मूळ गाभा आहे. भावरहित दान हे बऱ्याचदा कर्मकांड बनुन राहते, पण त्यात शुद्ध भाव प्रकटला की तेच कर्म साधनेमध्ये परिवर्तित होते.

रक्तदानाचंही असंच आहे !


- महेंद्र वाघ