दगड डोक्याचे काश्मिरी
महा एमटीबी   04-May-2018


काश्मीर... भारताचं शापित नंदनवन. इथे स्वातंत्र्योत्तर काळात शांतता ही क्वचितच नांदली. इथे शांतता प्रस्थापित होऊ नये, तसेच हा प्रदेश सतत धुमसत राहावा यासाठी पाकिस्तानने सर्वतोपरी प्रयत्न केले आणि आजही करत आहे. एवढे प्रयत्न जर पाकिस्तानने त्यांच्या विकासासाठी केले असते, तर त्यांच्या देशाची परिस्थिती कदाचित वेगळी असती. दहशतवादाने ग्रस्त असलेला हा अस्थीर देश काश्मीरलाही दहशतवादाच्या माध्यमातून पोखरत आहे. दगडफेक ही तशी काश्मीरमध्ये नित्याचीच. या दगडफेकीत तरुणांसह तिथल्या तरुणीही रस्त्यावर उतरलेल्या दिसतात. नुकतंच राज्यातील कानीपोरा या भागात दंगलखोरांनी एका शाळेच्या बसला लक्ष्य करत त्यावर दगडफेक केली. सहा वर्षांचा एक विद्यार्थी त्यात जखमी झाला. जवळच्या इस्पितळात दाखल केल्यावर त्याची प्रकृती स्थिर झाली. त्या आधी काही हल्लेखोरांनी पर्यटकांवरही दगडफेक केली. त्यात चार पर्यटक जखमी झाले. सोमवारी हिजबुल कमांडर समीर टायगर आणि त्याचा सहकारी अकीब द्रबगामा या दोघांचा चकमकीत खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. या समीर टायगरने तर सुरक्षारक्षकांना खुले आव्हान दिले होते की, आईचे दूध प्यायला असाल, तर समोर या आणि दुसर्‍याच दिवशी राहुल शुक्‍ला या बहादुर सैनिकाने त्याचा अंत केला. काश्मीरची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर आधारलेली आहे. या पर्यटकांवरच अनेकांची पोटं भरली जातात. पण, याचा अजिबात विचार न करता या दंगलखोरांनी पर्यटकांवर हल्ला केला. या घटनेचा माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी निषेध केला खरा, पण जेव्हा ते जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी खोर्‍यात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी किती प्रयत्न केले? फुटीरतावादी नेत्यांनी इथल्या तरुणांची माथी भडकवू नये यासाठी विशेष प्रयत्न अब्दुलांनी केल्याचे स्मरणात नाही. त्यामुळे काश्मीरच्या तरुणांनीच आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. त्यांना दहशतवादी पाकिस्तानची साथ द्यायची आहे की भारतीय विकासप्रवाहात सामील व्हायचे आहे, याचा विचार करावाच लागेल. ”आपली सांस्कृतिक, अस्मिता ही आत्मशोधातून आंतरिक समृद्धी आणण्यात असते. इतरांचे अस्तित्व नष्ट करण्याकरिता नाही, याचे भान सुटले की सांंस्कृतिक अराजकता निर्माण होते व त्यातून सामाजिक व राजकीय अराजकतेचा जन्म होतो,” असे दिलीप करंबेळकर यांचे ’जागतिकीकरण आणि स्थानिकीकरण’ या लेखातील प्रतिपादन येथेही अतिशय समर्पक ठरते. त्यामुळे काश्मिरी तरुणांनी हा आत्मशोध घेण्याची वेळ आली आहे, असे वाटते.


000000000


कुमार ’विश्‍वास’घात

केजरीवाल यांनी खंडीभर लोकांवर आरोपांची तोफ डागली. हे आरोप अर्थात राजकीय हेतूने प्रेरित होते आणि ते अपेक्षेप्रमाणे सिद्धही झाले नाही आणि न्यायालयाने केजरीवालांना धारेवर धरले. पुढे हे प्रकरण हाताबाहेर जात आहे, असे लक्षात आल्यावर त्यांनी माफीचा सपाटाच लावला. कपिल सिब्बल आणि अरुण जेटलींनी त्यांना माफही केले. पण, आता यामध्ये अडकले आहेत ’आप’चे गर्दी जमवणारे दर्दी कवी आणि नेते कुमार विश्‍वास. विश्‍वास म्हणजे ‘आप’चे राज ठाकरेच शोभतात. दोघांनाही छान गर्दी जमवता येत असली तरी जनता त्यांना गांभीर्याने घेत नाही, हे दोघांमधले साधर्म्य. तर या कुमार विश्‍वासांनी जेटलींविरोधात केलेले वक्तव्य हे केजरीवाल यांच्या माहितीवर आधारित होते. तशी त्यांनी न्यायालयात कबुलीही दिली. ’यशाचे हजार बाप असतात आणि अपयशाचा एकही बाप नसतो,’ या उक्तीप्रमाणे विश्‍वास यांना जेव्हा कळले की, या वक्तव्यामुळे फायदा नाही, उलट नुकसान आहे, तेव्हा त्यांनी लगेच केजरीवालांकडे अंगुलीनिर्देश केला. खरं तर विश्‍वास आणि केजरीवालांमध्ये राज्यसभा निवडणुकीपासून धुसफूस सुरू झाली. या घटनेचीही किनार या विश्‍वास यांच्या भूमिकेला असावी. राज्यसभेचे तिकीट केजरीवाल यांनी विश्‍वास यांना दिले नाही आणि ”मुझे शहीद तो कर दिया, लेकिन मेरे शव की विटंबना मत करना,” अशी आपल्या कवीमनाला अनुसरून त्यांनी प्रतिक्रिया दिली. पुढे अहमदनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी उपहासात्मक पद्धतीने आपली व्यथाही मांडली. पण प्रश्‍न असा आहे की, केजरीवाल यांच्या माहितीवर विश्‍वास ठेवून विश्‍वासांनी जेटलींवर टीका करण्याची मुळी गरजच काय? केजरीवाल हे त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते असले तरी त्यांची विश्‍वासार्हता माहिती नसण्याइतपत विश्‍वास दुधखुळे तर नक्कीच नाही. या अशा वाचाळवीरांमुळे राजकारणी अधिकच नाहक बदनाम होतात. केजरीवालांनी असेच बेछूट आरोप केल्याने गडकरींनी त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकला. त्यामुळे एकूणच राजकारणी मंडळींनी आरोप-प्रत्यारोप करतानाही जरा जबाबदारीने वागण्याची अपेक्षा असते. पण ’आप’चे केजरीवाल असो वा कुमार विश्‍वास यांना त्याचे कदापि भान नाही. जनतेने आंदोलन करू नये म्हणूनच मतदारांनी त्यांना निवडून दिले, तर हेच आंदोलन करत सुटले. त्यामुळे अशांवर ‘विश्‍वास’ ठेवायचा की नाही, हे मतदारांनीच ठरवावे.


- तुषार ओव्हाळ