रायगड होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ : जयकुमार रावल
महा एमटीबी   31-May-2018


नवी दिल्ली : स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ बनविण्यासाठी महाराष्ट्र शासन लवकरच केंद्र सरकारबरोबर भागीदारी करत असून लवकरच किल्ले रायगड हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ बनले, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज केले आहे. केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांची नवी दिल्ली येथे भेट घेतल्यानंतर रावल यांनी ही माहिती दिली.

रायगड किल्ल्याचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ व्हावे, म्हणून रावल यांनी आज शर्मा यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यामध्ये भेटीमध्ये रायगडचा इतिहास आणि त्याच्या विकासाविषयी चर्चा करण्यात आली. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्थळासाठी आवश्यक असलेल्या काही बाबींवर दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली. शर्मा यांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद देत, भारतीय पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र शासन यात सामंजस्य ठेवून रायगड किल्ल्याचा विकास करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी रावल यांना दिले.

'महाराष्ट्रातील जनतेसाठी रायगड किल्ला हा अतिशय महत्त्वाचा आहे. या किल्ल्याने खूप मोठी ऐतिहासिक कामगिरी केली असून याचे ऐतिहासिक महत्त्व जगभर मांडण्यासाठी या किल्ल्याचा विकास पर्यटनाच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत असून आता केंद्र सरकारसोबत मिळून काम करणार असल्याचे रावल यांनी म्हटले व लवकरच रायगड हे एक आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.