श्रीकृष्ण कोपले !
महा एमटीबी   31-May-2018
 

पुढल्या दिवशी भीष्मांनी कौरव सैन्याची रचना ’गरुडहात’ केली, ज्यात चोचीच्या जागी स्वत: भीष्म होते आणि गुरु द्रोण व कृतवर्मा हे गरुडाचे दोन डोळे होते. अश्‍वत्थामा व कृप हे गरुडाच्या डोक्यापाशी होते. त्रिगर्त आणि जयद्रथ सैन्यासह मानेत सरसावले होते. मध्यभागी हृदयापाशी दुर्योधन, विंद, अनुविंद होते. तर शेपटीकडे कोसलराजा बृहद्बळ प्रचंड सैन्य घेऊन सज्ज होते.
 
अर्जुनाने धृष्टद्युम्नाचे साहाय्य घेऊन, आपल्या सैन्याची रचना चंद्रकोरीच्या आकारात केली. उजवीकडे भीम, मध्यभागी द्रुपद आणि विराट, त्यांच्यामागे नील, धृष्टकेतू, धृष्टद्युम्न आणि शिखंडी होते. मध्यभागी हत्तींचे सैन्य घेऊन, युधिष्ठिर उभा होता. डाव्या टोकाला सात्यकी आणि द्रौपदीचे पाच पुत्र होते. अगदी शेवटच्या डाव्या टोकाला अर्जुन रथ घेऊन, उभा होता.
 
आज युद्ध धमाक्यात सुरु झाले. इतकी धूळ उसळली होती की, सूर्य पण निस्तेज दिसू लागला. शंभर रथांसह दुर्योधन घटोत्कचावर चाल करून आला. भीष्मांना जयद्रथ, द्रोण, पुरुमित्र, विकर्ण आणि शकुनी साथ करत होते. भीष्म शौर्याची पराकाष्ठा करत होते. भयंकर संहार होत होता. अर्जुनाने ते पाहून त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. शकुनीने सात्यकीचा रथ मोडला. मग सात्यकीने अभिमन्यूच्या रथात उडी घेतली आणि तो तिथून लढू लागला. भीष्म आणि द्रोण यांनी युधिष्ठिराकडे मोर्चा वळविला. तिथे नकुल आणि सहदेव त्याला साहाय्य करत होते. घटोत्कच तर आपल्या पित्याहून सरस लढत होता. त्याने दुर्योधनाच्या सैन्याचा धुव्वा उडविला. भीमाने दुर्योधनावर हल्ला करून, त्याला बेशुद्ध केले. मग द्रोण आणि भीष्म भीमावर चाल करून गेले.
 
काही वेळाने दुर्योधन पुन्हा रणभूमीवर आला. आपले सैन्य खूप मारले गेले आहे, हे पाहून तो घाबरून गेला. भीष्मांकडे येऊन, तो म्हणाला, “तुम्ही इथे असताना हे असे होणे योग्य आहे का? द्रोण आणि अश्वत्थामा हेही आहेत तरी माझ्या सैन्याची ही अवस्था कशी झाली? तुमचा पराभव करण्याइतके पांडव शूर नाहीतच! तरीही हे असे का होत आहे हे न कळण्याइतका मी मूर्ख नाही. पांडुपुत्रांवरचे तुमचे प्रेम तुम्हाला मागे ओढत आहे. तुम्ही सारेच पांडवांचे पक्षपाती आहात! तुम्ही आणि द्रोण, तुम्ही दोघांनी मला सुरुवातीलाच जर हे सांगितले असते की, पांडवांशी लढणे तुम्हाला आवडत नाही, तर मी तुम्हाला सेनापती पद दिलेच नसते! आताही तुम्ही मला सोडून जायचा विचार करू शकता, मी राधेयाला बोलावून युद्ध करेन! जर तुम्ही माझ्यावर खरे प्रेम करत असाल, तर ताकदीने लढून माझ्या शत्रूंचा संहार करा!” दुर्योधनाचे असे तीक्ष्ण बोलणे भीष्मांना सहन झाले नाही, पण ते हसून म्हणाले, ”मुला, गेले कित्येक दिवस नव्हे, तर कित्येक वर्षे मी तुम्हाला सांगत आहे की पांडव अजिंक्य आहेत! खुद्द इंद्रदेवदेखील त्यांच्याबरोबर हरले. तुम्ही ऐकायलाच तयार नाही आहात. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो म्हणूनच तर तुमच्या बाजूने लढायला तयार झालो. मी वृद्ध असून तरुणालाही लाजवेल अशी शर्थ करत आहे, आता तू पहाच मी कसा शत्रूवर तुटून पडतो ते!”
 
आणि भीष्म आवेगाने पांडव सेनेवर तुटून पडले! त्यांच्या धनुष्याला विश्रांतीच नव्हती. क्षणात पूर्वेला तर दुसर्‍या क्षणी ते पश्चिमेला दिसत होते. रक्ताच्या नद्या रणांगणी वाहू लागल्या. कृष्णाने हे सर्व पाहिले आणि तो म्हणाला, ”अर्जुना, आता तुझे शब्द खरे करण्याची वेळ येऊन ठेपली आहे! या कौरव सेनेचा नाश करेन, असे तू सर्व राजांसमोर बोलला होतास. आता दुबळेपणाला अजिबात थारा देऊ नकोस! ते आपले पितामह आहेत म्हणून त्यांची गय करू नकोस!” एकूण स्थिती पाहून अर्जुन म्हणाला, ”कृष्णा, माझा रथ त्यांच्यासमोर घेऊन, चल मी प्राणपणाने लढेन! दोघांची लढाई सुरु झाली.”
 
अर्जुनाच्या एका बाणाने भीष्माच्या ध्वजाचे दोन तुकडे झाले. वृद्ध भीष्मांना त्याच्या कौशल्याचे कौतुकच वाटत होते. ते म्हणाले, “शाब्बास अर्जुना, शाब्बास, इतके देखणे युद्ध तूच खेळू शकतोस! मी प्रसन्न आहे, ये आपण युद्ध खेळू!” त्यांचा भयंकर क्रोध कृष्णाने पाहिला आणि कृष्णाने हेदेखील जाणले की, जेवढा केला पाहिजे तेवढा जोर मात्र अर्जुन करत नव्हता! तो स्वत:शीच म्हणाला, ”भीष्म आपले पितामह आहेत हे विसरायला अर्जुन बहुतेक तयार नाही! ‘मी युद्धात लढणार नाही’ ही माझी शपथ आता मला मोडावी लागणार असे दिसते. जर भीष्मांचा मारा असाच चालू राहिला, तर पांडवांची खैर नाही असे वाटते. या पांडवांसाठी मला भीष्मांना मारावे लागेल. मी पुन्हा पुन्हा सांगूनदेखील अर्जुन असे का करतो आहे? तो आपले कर्तव्य विसरला आहे. आता मलाच काहीतरी केले पाहिजे.” हे विचार करत असताना कृष्ण भीष्मांच्या एका बाणाने जखमी झाला. अर्जुन नीट लढत नाही आहे हे सात्यकीलासुद्धा कळले. सात्यकीने अर्जुनाच्या मदतीस धाव घेतली. भीष्म, द्रोण, विकर्ण, जयद्रथ, भूरिश्रवा आणि इतर अनेक वीर अर्जुनावर हल्ला करीत होते. कृष्णाने सात्यकीकडे पाहून म्हटले, ”सात्यकी, आता पाहा मी भीष्म, द्रोण आणि त्यांचे वीर यांना कसे यमसदनास पाठवतो! या युद्धात प्रत्यक्ष भाग घेऊन, त्यांना आता मलाच मारले पाहिजे. अर्जुन आपले शब्द विसरलेला दिसतो! युधिष्ठिराला राज्य मिळवून देईन असे वचन मी दिले आहे. त्या द्रौपदीलाही मीच वचन दिले आहे की, या पापी कौरवांच्या रक्ताने ही भूमी शुद्ध करेन!”
 
असे म्हणून कृष्णाने आपले मानवी शरीर टाकले आणि दिव्य विराटरूप धारण केले. आता तो पापी लोकांचा विनाश करणारा नारायण झाला होता. त्याने सुदर्शनचक्र धारण केले. एका हातात गदा होती. तो मृत्यूदेवासारखा दिसू लागला. चक्र फिरवीत क्रुद्ध होऊन, तो भीष्मांसमोर उभा राहिला. भीष्मांनी त्याला प्रणाम केला. ते म्हणाले, ”हे स्वामी, मी तुला अभिवादन करतो. आज तुझ्या या रूपाचे दर्शन मला झाले आणि मी कृतार्थ झालो. हा तर माझा सन्मान आहे. कृपा करून मला या मानवी बंधनातून मोकळे कर. मला मुक्ती दे. ठार मार. तुझ्या हातून मला मरण यावे यापेक्षा दुसरा सन्मान नाही!” एवढे बोलून त्यांनी युद्धाचा पवित्रा घेतला.
 
कृष्ण लढायला तयार झाला हे पाहून, अर्जुनाने रथातून खाली उडी मारली आणि कृष्णाचा हात हाती घेतला. कृष्ण रागाने बेभान झाला होता. अर्जुनाचा हात त्याने झिडकारला. पण, अर्जुनाने कृष्णाचा हात आपल्या हाती घट्ट धरला. तो त्याच्या पायांवर लोळण घेत साश्रू नयनांनी म्हणाला, ”नाही कृष्णा! तू रागावता कामा नये. तू हे करू नकोस. मी चुकलो, मला क्षमा कर. तुझा राग आवर. तू तुझी शपथ मोडू नकोस. माझ्यावरच्या रागाने तू बेभान झाला आहेस. मी वचन दिल्याप्रमाणे सर्व कौरवांशी लढेन. सर्व शक्ती एकवटून, मी भीष्मांशी लढेन! तू तुझी प्रतिज्ञा मोडू नकोस! ” अर्जुनाने खरोखर प्राणपणाने पुन्हा भीष्मांवर चढाई केली. त्याने आपली दिव्यास्त्रे वापरली. ऐन्द्रास्त्र सोडले आणि कौरवांच्या सेनेचा संहार सुरु केला. बरेच सैन्य ठार झाले. पश्चिम दिशा लालेलाल झाली, सूर्य मावळतीला आला आणि भीष्मांनी सैन्य मागे घ्यायचे ठरविले.
 
 
 
 
 
- सुरेश कुळकर्णी