मनगाभारा
महा एमटीबी   31-May-2018
 

मानवाला भगवंतानं ‘मन’ दिल्यामुळे तो इतर योनींपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. मनामध्ये विचारांचा अखंड प्रवाह चालू राहतो. मन एका जागी थांबत नाही. मन वार्‍यापेक्षाही चपळ आहे. एका क्षणात हजारो मैलांचा प्रवास करून परत येतं. या मनाचा थांग लागत नाही. या मनाला सुयोग्य वळण लागण्यासाठी संस्कारांची आवश्यकता असते. संस्कार बालमनावर झाले म्हणजे त्याचा ठसा चांगला उमटतो. जन्मभर संस्कार कामाला येतात. संस्कारांमुळे मनाचं तारु भरकटण्याची भीती नसते.
 
संस्कार स्वकृतीमधून सहजपणानं होतात. माता, पिता, गुरु या तिघांच्या संगतीमध्ये राहिलं की, संस्काराचं सुंदर संगीत कानामधून मनात जातं. वडिलधार्‍या मंडळींच्या आचरणामधून ते होत जातात. संस्कार वागण्यामधून, बोलण्यामधून, जगण्यामधून होतात. घरातल्या वातावरणाचा परिणाम मनावर होतो. वातावरण उत्तम असेल, तर उत्तम संस्कार चटकन होतात. सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्येक घटनेमधून ते कळत-नकळत होत असतात. प्रत्येक प्रसंगाद्वारे ते होतातच. खरंतर वेगळ्या संस्कार वर्गांची आवश्यकता अजिबात नसते. हल्ली मोठ्या माणसांऐवजी संस्कार वर्गाला घालून संस्कार करण्याचा प्रकार वाढला आहे.
 
कोणाच्या संगतीमध्ये जास्त वेळ राहतो त्यावर संस्कार अवलंबून असतात. सज्जन-सात्विक लोकांच्या संगतीमध्ये राहिल्यास सात्विकता प्राप्त होते. चोर-बदमाश लोकांच्या संगतीमध्ये माणूस अवगुणी तयार होतो. म्हणून ‘संगत’ अत्यंत महत्त्वाची! संतांचा सहवास लाभणं यासारखं भाग्य नाही. संत सात्विकतेचा, विवेकाचा सुंदर अलंकार धारण करून वावरत असतात.
 
संत उदार अंतःकरणाचे असतात. त्यांच्या मनगाभार्‍यात भगवंत असतो. त्यामुळे भक्तीचा सुगंध सदैव दरवळत असतो. समस्त जीवांप्रती प्रेम नांदत असतं. दया-क्षमा-शांती या तिघीजणी गुण्यागोविंदानं वावरत असतात. प्रत्येकाला संतसहवास लाभला, तर सुसंस्कारांचे मोती जीवन ओंजळीत यायला वेळ लागत नाही. संस्कार आणि संगत यांच्यामध्ये अतूट स्नेह असतो. सुसंगती लाभली की सुसंस्कारांचा ठेवा प्राप्‍त होणारच!
 
तसं म्हटलं तर सुसंस्कार एका जन्माचे नसतात. माणसाच्या मनावर अनेक जन्माचे संस्कार असतात. हे संस्कार त्याच्या जीवनाच्या प्रत्येक कृतीमधून लक्षात येतात. स्वराचा चढउतार मृदूता, कोमलता आणि शब्दांची निवड-वापर यांमधून ते व्यक्‍त होत असतात. प्रत्येक घटनेकडे, प्रसंगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावरून संस्कार कसे आहेत हे कळतं. एखाद्या माणसाला भक्तीची आवड बालवयातच निर्माण होते, तर दुसरा वयानं साठी ओलांडली तरी देवाला स्मरत नाही. एखादा तामसी असतो. त्याला तापटपणा आवरण्यासाठी सांगितलं, तरी तो मनाला आवरू शकत नाही.b
परिस्थितीनुसार माणसांचं मन तयार होतं. अनुकूल परिस्थिती असेल, तर अस्वस्थ मन असतं. मनावर नैसर्गिक, सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक वातावरणाचा परिणाम होत असतो. तरीदेखील मनाला स्थिर, शांत करण्याची कला आत्मसात करणं गरजेचं असतं. समर्थ रामदास स्वामींनी समाजातल्या विविध लोकांना मनाच्या श्लोकांद्वारे सुयोग्य मार्ग दाखवलेला आहे. रजोगुण-तमोगुण टाकून देऊन, सत्वगुणाचा सद्‍गुणाचा अंगीकार करण्याचा प्रेमळ आग्रह केला आहे.
 
मना वासना दुष्ट कामा नये रे ।
मना सर्वथा पापदृष्टी नको रे ।
मना धर्मता नीती सोडूं नको हो ।
मना अंतरी सार विचार राहो ॥
ज्या सुखासी नाही अंत।
ते सुख स्वरुपें झाले प्राप्त।
ते देहीं वर्ततां देहातीत।
चिंताआवर्त त्यां नाही॥
 
 
भगवंताचं चिंतन केलं की, चिंता उरतच नाही. मनाची अस्वस्थता कणभरही न उरता, मन स्वस्थ होऊन जातं. मन हेच बंध आणि मोक्षाला कारण ठरतं आणि जर मन भगवंतामध्ये रमवलं, तर सांसारिक मन लुप्त होऊन, भगवंतमय मन प्रकट होतं. त्या मनाला अविनाशी आनंदाची..अंतहीन सुखाची प्राप्ती होते. प्रपंचानं हैराण झालेलं मन परमार्थामध्ये स्थिर होऊन, परमशांतीचा अनुभव घेतं. सामान्य माणसाच्या मनोवृत्तीमध्ये पालट घडवून आणण्याचं अवघड काम संत मोठ्या कौशल्यानं करतात. लौकिकाच्या लाभ-हानीनं त्रस्त झालेलं मन अलौकिक अशा भगवंताच्या भक्तीनं शांत होऊन जातं. बघता बघता विश्वमनाशी जोडलं जातं. स्थूलातून सूक्ष्माकडे, लौकिकाकडून पारलौकिकाकडे प्रगतिपथावर मनाला, समाजमनाला घेऊन जाणार्‍या संतांची स्तुती व कौतुक जितकं करावं तितकं कमीच आहे. ‘मनगाभारा’ भक्तीच्या सुगंधानं भारून टाकणारे संत महान आहेत.
 
सकल संत समाजमनाला सुसंस्कृत करण्यासाठी झटले, झिजले. समाजमनाला सकारात्मक दिशेकडे घेऊन जाण्यासाठी भगवंताची भक्ती करण्यास प्रवृत्त केलं. कुसंस्कार पुसून टाकण्यासाठी मनाला भगवंताकडे वळविलं. त्याच्या नामामध्ये, कीर्तनामध्ये रंगून जाणारं मन आपोआप शुद्ध, स्वच्छ होत जातं. संतांनी मंदिरामधून पूजनाचा, उत्सवाचा थाट करून, आंतरिक उत्साह जागवला. षड्रिपूंचा पराभव भगवंताच्या भावपूर्ण भक्तीने करण्याची कला शिकविली. भगवंताच्या संगतीमध्ये रममाण झालेलं ‘समाजमन’ सृजनाच्या, सकारात्मकतेच्या सुंदर सरोवरात सचैल स्नानाचा आनंद घेऊ शकतं. जसजशी भक्ती वर्धित होते, तसतसा ‘मनगाभारा’ परमानंदाच्या नंदादीपानं उजळून जातो. स्वानंद, आनंद, परमानंद या तीन आनंदांची प्राप्ती झाली, की मनामनात अतीव सुखसमाधान भरून जातं. संत एकनाथ महाराज सांगतात-
 
 
ज्या सुखासी नाही अंत।
ते सुख स्वरुपें झाले प्राप्त।
ते देहीं वर्ततां देहातीत।
चिंताआवर्त त्यां नाही॥
 
 
भगवंताचं चिंतन केलं की, चिंता उरतच नाही. मनाची अस्वस्थता कणभरही न उरता, मन स्वस्थ होऊन जातं. मन हेच बंध आणि मोक्षाला कारण ठरतं आणि जर मन भगवंतामध्ये रमवलं, तर सांसारिक मन लुप्त होऊन, भगवंतमय मन प्रकट होतं. त्या मनाला अविनाशी आनंदाची..अंतहीन सुखाची प्राप्ती होते. प्रपंचानं हैराण झालेलं मन परमार्थामध्ये स्थिर होऊन, परमशांतीचा अनुभव घेतं. सामान्य माणसाच्या मनोवृत्तीमध्ये पालट घडवून आणण्याचं अवघड काम संत मोठ्या कौशल्यानं करतात. लौकिकाच्या लाभ-हानीनं त्रस्त झालेलं मन अलौकिक अशा भगवंताच्या भक्तीनं शांत होऊन जातं. बघता बघता विश्वमनाशी जोडलं जातं. स्थूलातून सूक्ष्माकडे, लौकिकाकडून पारलौकिकाकडे प्रगतिपथावर मनाला, समाजमनाला घेऊन जाणार्‍या संतांची स्तुती व कौतुक जितकं करावं तितकं कमीच आहे. ‘मनगाभारा’ भक्तीच्या सुगंधानं भारून टाकणारे संत महान आहेत.
 
 
 
- कौमुदी गोडबोले