संजूवर लागलेला 'दहशतवादी' हा टॅग पुसण्याचा हिरानी प्रयत्न करतायत?
महा एमटीबी   30-May-2018


 
संजय दत्त अर्थात संजू बाबा याच्या जीवनावर आधारित असलेल्या 'संजू' या चित्रपटाची अनेक लोकं आतुरतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टिझर आला त्यातून संजय दत्तचे आयुष्य किती 'व्हर्सटाईल' होते हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आज ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर पुन्हा एकदा संजूच्या आयुष्यातील विविध घटना दाखवण्यात आल्या आहेत पण ट्रेलर मध्ये संजय दत्तच्या तोंडी एक संवाद आहे तो असं म्हणतो, ''मैं बेवडा हूं, ठरकी हुं लेकिन टेररिस्ट नहीं हुं!'' पुढच्या एका संवादातही तो पोलिसाला उद्देशून म्हणतो ''आयएम नॉट अ टेररिस्ट'' यावरून एक प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही की चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी यामाध्यमातून संजूवर लागलेला 'दहशतवादी' हा टॅग पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत की काय?
 
 
 
या चित्रपटात रणबीर संजूबाबाची भूमिका साकारत आहे. रणबीरसोबतच सोनम कपूर, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, मनिषा कोईराला, परेश रावल, विकी कौशल, जिम सर्भ अशी कलाकारांची फौजच या चित्रपटात पाहायला मिळते. संजूच्या पहिल्या चित्रपटापासून, त्याने केलेली अफेअर्स, ड्रग्सच्या नादी लागणे, येरवडा जेल मध्ये अनुभवलेले प्रसंग या सगळ्यांवर हा चित्रपट भाष्य करतो. रणबीर संजयच्या व्यक्तिरेखेत इतका चपखल बसला आहे की बऱ्याचदा आपण खरच संजय दत्तलाच पाहत असल्याचा अनुभव येतो. संजयच्या आईची भूमिका मनीषा कोईराला तर वडिलांच्या भूमिकेत परेश रावल दिसतात.
 
येत्या २९ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. चित्रपटातून भरपूर मनोरंजन होईल. रणबीरच्या आयुष्यातला कदाचित हा एक 'माईल स्टोन' चित्रपटही ठरेल पण नक्की हा चित्रपट बनविण्यामागे हिरानी आणि कंपनीचे काय मनसुबे आहेत हे २९ जून रोजीच लक्षात येईल.