वेळीच जागे व्हा...
महा एमटीबी   03-May-2018

मानवासाठी त्याचे ’आरोग्य’ ही अत्यंत महत्त्वाची अशी बाब. आपण यशाची कितीही शिखरे गाठली, आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो तरी जर आरोग्य साथ देत नसेल, तर पुढची सगळी गणितं अवघड होऊन बसतात. आज अनेक आरोग्य संघटनांचे सादर केले जाणारे अहवाल हे आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक ठरत असल्याचे वारंवार दिसून येते. परंतु, तरीदेखील या अहवालाविषयी फारसे गांभीर्य नसल्याचे अहवालातून सादर होणार्‍या आकडेवारीवरून दिसून येते. ’जागतिक आरोग्य संघटने’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वाधिक २० प्रदूषित शहरांच्या यादीत सर्वाधिक भारतीय शहरांचा समावेश आहे. या यादीतील २० पैकी १४ प्रदूषित शहरे ही केवळ भारतातील आहेत. यात दिल्ली, मुंबई आणि वाराणसी व इतर शहरांचाही समावेश आहे. या शहरात प्रदूषणाची पातळी ही दिवसेंदिवस खालावत चालली आहे. विशेष म्हणजे, प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई ही चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईतलं प्रदूषण हे बीजिंगपेक्षाही अधिक आहे, अशी धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे. दरवर्षी वेगवेगळ्या संघटनांकडून सादर होणार्‍या अहवालांतून धोकादायक, गंभीर अशी माहिती उघडकीस येत असते. संघटनेकडून विविध विषयांसाठी केल्या जाणार्‍या सर्व्हेतून एकीकडे विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीचा आलेख मनुष्यप्राणी गाठत असताना नकळतपणे का होईना, काही चुका आपल्या हातून होत आहेत, याचं भान आपल्याला राहिलेलं नाही. या प्रदूषणाचा परिणाम मानवी आरोग्यावर होतच असतो. परंतु, त्याचा प्रभाव आता भारतातील पुरातन इमारतींवरदेखील होत चालला आहे. याचं ताजं उदाहरण द्यायचं झालं तर ते ताजमहलचं देता येईल. ऐतिहासिक वारसा असलेल्या ताजमहालाच्या रंगात झालेल्या बदलाविषयी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. यापूर्वी या वास्तूचा रंग पिवळसर झाला होता. मात्र, आता त्यावर हिरव्या आणि करड्या रंगाच्या छटा उमटू लागल्या आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. दुर्दैवाने, सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतीय शहरांची नाव येण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून चीनमधल्या बीजिंगनंतर सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत राजधानी दिल्लीचं नाव घेतलं जातं होतं. पण, वाढत्या प्रदूषणामुळे दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. प्रदूषित शहरांच्या यादीत वाढत चाललेली भारतीय शहरांची नावं ही एकप्रकारे धोक्याची घंटाच आहे. ज्या देशांतील माणसांचं सरासरी आर्थिक उत्पन्न कमी आहे, ज्यांच्याकडे प्रदूषण नियंत्रणाच्या योग्य उपाययोजना नाहीत, अशा देशांना प्रदूषणाचा विळखा बसतोय ही बाब खूपच गंभीर आहे. आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य खरंच अंधारात आहे.


0000000000000

आदर्श बाळगा... पण ?

मनोरंजन क्षेत्राचं विश्‍व काहीसं वेगळं असतं. या क्षेत्रामध्ये काम करणार्‍यांची जीवनशैली आणि सर्वसामान्यांच्या जीवनशैलीमध्ये खूपच तफावत पाहायला मिळते. त्यांच्या लाईफस्टाईलशी संबंधित असणार्‍या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचं त्यांच्या चाहत्यांना खूप कौतुक वाटतं. त्यांचे काही फॅन त्यांच्या आवडत्या अभिनेता-अभिनेत्रींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत असतात. अर्थात, प्रत्येकाने कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, हा जयाचा-त्याचा वैयक्‍तिक प्रश्‍न. पण, असं असले तरी काय चूक आणि काय बरोबर, हे ओळखण्यामध्ये काहीजण गफलत करतात. सिनेसृष्टीत काम करणारी मंडळी पडद्यावर झळकताना त्यांच्या दिसण्यावर खूप मेहनत घेत असतात. पूर्वी चांगलं दिसण्यासाठी मेकअपवर जास्त भर दिला जायचा, परंतु अलीकडच्या काळात मेकअपबरोबरच फिटनेसवर जास्त भर दिला जातो. विशेष म्हणजे, यामध्ये अभिनेतेदेखील आघाडीवर आहेत. आज दिवसेंदिवस तरुणांमध्ये सलमान खान, हृतिक रोशन, टायगर श्रॉफ यांच्यासारखी ’सिक्स पॅक’ बॉडी बनविण्याचे क्रेझ वाढत आहे. या वेडापायीच ही मुलं जीममध्ये जाऊ लागली आहेत. सिक्स पॅक बनविण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय हाय प्रोटीन डाएट, स्टिरॉईड व हार्मोन्सची इंजेक्शनही तरुण घेताना दिसतात. पण, या सर्व सप्लिमेंट्सचा परिणाम तरुणांच्या मूत्रपिंडावर होत असल्याची धक्कादायक माहिती एका सर्व्हेतून समोर आली आहे. देशभरात मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले. यामुळे यामागचे नेमके कारण शोधताना ’सिक्स पॅक’चे वेड समोर आले. आजची तरुणाई आरोग्य आणि आहाराच्यासंदर्भात जागरुक झाली आहे. यासाठी नियमित जिमला जाणे, पुशअप्स मारणे यासारखे व्यायाम ते करतात. जीममधले प्रशिक्षक त्यांना डाएट व कोणत्या कसरती कधी करायच्या, याचे वेळापत्रक ठरवून देतात. पण, एवढे करूनही बॉलिवूड हिरोंसारखी बॉडी बनत नसल्याने तरुण आता सप्लिमेंट्सचा आधार घेऊ लागले आहेत. यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय तसेच गुगलची मदत घेत हे तरुण हायप्रोटीन डाएट, स्टिरॉईड व हार्मोन्सची इंजेक्शनही सर्रास घेताना दिसतात. त्यामुळे निदान हा अहवाल डोळ्यासमोर ठेवून आपण काय करायला हवं, याचंं भान तरुणांनी ठेवलं पाहिजे.


- सोनाली रासकर