गुरू आत्माराम
महा एमटीबी   03-May-2018

’सावधान’ शब्द ऐकताच नारायण सावध झाला आणि त्याने लग्नमंडपातून पलायन केले. नारायण कोठे सापडेना, हे पाहून त्या नियोजित वधूचे तेथेच दुसर्‍या वराशी लग्न लावून देण्यात आले. काय योगायोग पाहा, ज्या मुहूर्तावर वर आणि वधू यांनी आपल्या भावी आयुष्याची सुरुवात करायची, त्याच मुहूर्तावर रामदासांना देव व देशकार्यासाठी घर सोडून पलायन करावे लागले. आजही मुहूर्त पाहूनच लग्ने लावली जातात. मुहूर्तावरून सहज आठवले, प्रभू रामचंद्रांसाठी युवराज्याभिषेकाचा मुहूर्त राजपुरोहित वसिष्ठांनी काढला होता. त्यामुळे त्यात चूक संभवत नाही. तरीही त्या मुहूर्तावर रामाला चौदा वर्षांच्या वनवासात जाण्यासाठी घर सोडावे लागले. त्यामुळे असे वाटते की, वसिष्ठांनी काढलेला मुहूर्त हा युवराज्याभिषेकाच्या विचाराबरोबर रावणवधाचाही विचार करून काढलेला असावा! रामदासांचेही तसेच झाले. तो मुहूर्त लग्नापेक्षा रामदासांना परमार्थ साधनेत यश देणारा आणि देशकार्यासाठी सुरुवात करणारा असावा! रामदास स्वतः मुहूर्त मानणारे अथवा ज्योतिषावर विश्‍वास ठेवणारे होते की नाही ते माहीत नाही. पण, बहुधा असल्या गोष्टींवर विश्‍वास ठेवणारे नसावेत. ‘जन स्वभाव गोसावी’ या त्यांनी लिहिलेल्या प्रकरणात त्यांनी भोंदू साधूंवर टीका केली आहे. ‘यत्न तो देव जाणावा’ ही त्यांची उक्ती प्रसिद्ध आहे. तसेच ते सांगतात -

रेखा तितुकी पुसोन जाते ।
प्रत्यक्ष प्रत्यया येते ।
डोळेझांकणी करावी ते । काये निमित्य ॥ (दा. 15.6.9)
येथे त्यांच्या मनात रेखा म्हणजे हस्तरेखा असेल तर हातावरील रेषा या बदलत असतात. तसेच अदृष्टाचीही रेषा पुसता येते. त्या आधारे केलेल्या भविष्यकथनावर माणसाने कसा विश्‍वास ठेवावा? हातावरच्या रेषांपेक्षा मनगटाच्या शक्तीवर विश्‍वास ठेवणे रामदासांना मान्य होते.

इ. स. १६१९-२० च्या दरम्यान लग्नसमारंभातून पळालेले रामदास गोदावरीच्या काठाकाठाने प्रवास करीत चैत्री पाडव्याच्या दिवशी नाशिकला येऊन पोहोचले. त्या दिवशी राम मंदिरात गर्दी झाली होती. आपले आराध्य दैवत प्रभू रामचंद्राला रामदासांनी डोळे भरून पाहिले. त्यावेळी रामायणातील कथा त्यांना आठवल्या असतील. याच रामाने आपल्या पराक्रमाने सज्जनांचे रक्षण आणि राक्षसांचा नायनाट केला होता. राक्षसी वृत्ती मोडून काढल्या होत्या. अनेक संकटांशी सामना करीत केवळ वानरसेनेच्या साहाय्याने मस्तवाल रावणाचा अंत केला होता. तत्कालीन परिस्थिती तशीच होती, असे नारायणाच्या लक्षात आले. म्लेंच्छांच्या जुलमी सत्तेला टक्कर देण्यासाठी या रामाकडूनच त्यांना प्रेरणा हवी होती. त्यासाठी रामाची आराधना आवश्यक होती.
रामाच्या वास्तव्याने पावन झालेल्या नाशिकच्या भूमीत राहून रामदासांनी परमार्थ साधनेस सुरुवात केली. गोदावरी व नंदिनी या नद्यांच्या संगमावर टाकळीजवळील एका गुहेत ते राहू लागले. रोज सकाळी ब्राह्म मुहूर्तावर उठून स्नानसंध्या झाल्यावर त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप आणि गायत्री पुरश्‍चरण ही साधना सुरू झाली. त्यावेळी नाशकात विद्यासंपन्न पंडितांचे वास्तव्य होते. दुपारी काही वेळ पारमार्थिक, धार्मिक ग्रंथांचे अध्ययन, सायंकाळी विद्वान पंडितांची व्याख्याने, प्रवचने, कीर्तने ऐकणे असा एकंदरीत रामदासांचा कार्यक्रम होता. ती त्यांची साधना होती. रामदासांना ग्रंथ वाचनाची व ग्रंथ लिहून काढण्याची आवड होती. दासबोधाच्या पहिल्या दशकातील पहिल्या समासात त्यांनी आधार घेतलेल्या काही ग्रंथांचा उल्लेख केला आहे. तसेच गिरिधरस्वामींनी लिहिलेल्या ’समर्थप्रताप’ या समर्थचरित्रात आद्य शंकराचार्यांपासून अनेक ग्रंथकारांच्या ग्रंथांचा उल्लेख आला आहे. ते ग्रंथ रामदासांनी नक्कीच वाचले असतील. पैकी काहींचा सखोल अभ्यास केला असेल. रामदासांना ग्रंथलेखनाची आवड होती. असं म्हणतात की, नाशिक मुक्कामी त्यांनी संपूर्ण वाल्मिकी रामायण स्वहस्ते लिहून काढले होते. पुढे त्यातील दोन कांडे त्यांनी मराठीतून लिहिली. तत्कालीन राजकीय परिस्थितीत रामदासांना रामायणातील कथांचे स्मरण होत होते. तथापि चांगल्या ग्रंथांचे लिखाण हे त्यांच्या शिष्यांनाही करावे लागे. तसा दंडकच होता. नंतरच्या काळात रामदासांनी महंतांसाठी नियम घालून दिला होता -


दिसामाजि काही तरी ते लिहावे ।
प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ॥
शिष्यांना उपदेश करण्यापूर्वी रामदासांनी ते आचरिलेले असायचे.  ‘आधी केले, मग सांगितले।’ ही त्यांची वागण्याची पद्धत होती.

परमार्थाच्या भारतीय परंपरेत गुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘गुरुवीण ज्ञान नाही’ हे सर्वमान्य वचन होते. संत ज्ञानेश्‍वरांनी त्यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ यांना गुरू केले, तर निवृत्तीनाथांचे गुरू नाथसंप्रदायी गहिनीनाथ होते. संत एकनाथांचे गुरू जनार्दनस्वामी होते. हठयोगी चांगदेवांनी परमार्थ साधनेसाठी संत मुक्ताबाईंना गुरू केले होते. संत तुकारामांचे गुरू बाबाजी चैतन्य होते. त्यांनी स्वप्नदृष्टांतात तुकाराम महाराजांना दीक्षा दिली होती, अनुग्रह दिला होता. या सर्वांनी गुरुमहिमा वर्णन केला आहे. रामदासांनीही गुरुचे माहात्म्य सांगितले आहे. परंतु, रामदासांनी मानवी देहधारी गुरू शोधला नाही. आराध्य दैवत रामालाच त्यांनी गुरू मानून अंतरात्म्याच्या साक्षीने परमार्थ वाटचाल केली, यशस्वीरित्या केली. रामदास म्हणतात -

साह्य आम्हा हनुमंत ।
आराध्य दैवत श्री रघुनाथ ।
गुरु श्रीराम समर्थ । काय उणे दासासी ॥

संत साहित्याचे थोर अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे म्हणतात की, ”समर्थांनी अंतरात्म्याला साक्षी ठेवून सारी साधना केली. आत्माराम हाच त्यांचा गुरू.”


- सुरेख जाखडी