शेवटच्या श्‍वासापर्यंत नृत्यसाधनेची इच्छा
महा एमटीबी   03-May-2018
‘माणसं’ लिहिताना माणसाच्या जीवनाचे परिमाण काय असावे ? पंखात बळ नसतानाही उडण्याची उर्मी आणि त्या उर्मीने दिलेले पंखाशिवायचे उडण्याचे बळ ? हे बळ माणसाच्या आत्मिक शक्तीचे प्रतीक असते. ती शक्ती माणूस म्हणून मानसी अत्रेंकडे आहे.

कथ्थक शिकल्यानंतर मानसीचा पहिला स्टेज शो होता. अक्‍कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांना त्या कार्यक्रमाची पत्रिका अर्पण करताना अचानक मानसीच्या डोक्यात कळा येऊ लागल्या. उपचारांंती कळले की, मेंदूजवळच्या रक्‍तवाहिनीमध्ये रक्‍ताची गाठ झाली आहे. शस्त्रक्रिया केली. मानसीच्या दृष्टीवर काही दिवस त्याचा परिणाम झाला. प्रत्येक वस्तू दोन दोन दिसू लागल्या. पण पहिला स्टेज शो करायचाच, ही जिद्द आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद यामुळे मानसी आत्मबळावर त्यातून बाहेर आल्या. त्यांनी पहिला स्टेज शो केला. ही जिद्द कथ्थकच्या प्रेमातूनच निर्माण झाली होती.

विशुद्ध कला माणसाला विशुद्ध जगण्याचे बळ देते. ’हे वेड जिवाला लावी पिसे’ म्हणत जगण्याचा संदर्भ शोधून देणार्‍या कलाजीवनासाठी कला की कलेसाठी जीवन... प्रश्‍न तसा सनातन आणि चिरंजीवी आहे. जागतिकीकरणात आयुष्य कितीही यंत्रवत झाले, निरस झाले तरी आजही प्रत्येकाच्या मनात कोणती ना कोणती कला जिवंत असते तर कधी अनुभवांच्या खोल कप्प्यात लपलेली असते. पण ती अस्तित्वात असते, हे मात्र नक्‍की. त्या कलेच्या अस्तित्वाला समर्पित होऊन जगण्यालाच कला बनवणारे खूप कमी असतात. त्यापैकीच एक मानसी अत्रे. माहेरच्या मंजिरी गोखले.

कथ्थक नृत्य म्हटले की, डोंबिवलीमध्ये मानसी अत्रेंचे नाव लगेच डोळ्यापुढे तरळते. नृत्यकला आपल्यापर्यंत सीमित न ठेवता किंवा ‘आपली आवड आपली सवड’ असा बाणा न राखता मानसीने हातचे न राखता आपल्या शिष्यांना कथ्थक नृत्याचे धडे दिले. डोंबिवली हे तसे सुशिक्षितांचे शहर. पण, कलेचे वारसा जपणार आणि टिकवणार कोण? त्या त्या क्षेत्रातल्या कलाकारांनी आपल्या कलेचे सामर्थ्य जनमनात निर्माण केले तरच ते होणार ना? मानसीने कथ्थक नृत्याचे सामर्थ्य आपल्या परीने जनमानसात फुलवण्याचे ठरवले.

ज्याच्याकडे सर्व काही आहे, जीवन सुरळीत सुरू आहे. कसलीच उणीव नाही, अशा गुडी गुडी वातावरणात कलेची साधना करणारे अनेक असतात. या सर्वांच्या विपरीत मानसीची परिस्थिती राहिली. माहेरी आईने मानसीला नेहमीच नृत्यसाधनेला प्रोत्साहन दिले. मात्र, वडिलांना वाटे की, मानसीने म्हणजे मंजिरीने नृत्य नव्हे तर गायन कला आत्मसात करावी. घरच्या कर्त्या पुरुषाचे म्हणणे कसे टाळणार? त्यामुळे मानसीला लहानपणी नृत्याचे धडे चोरून गिरवावे लागले.

नृत्याची मनाला लागणारी ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. पुढे लग्‍न झाले. सुदैवाने पती मात्र कलारसिक मिळाले. त्यामुळे मानसीला नृत्याची आराधना करता आली. पण, कलेसाठी जीवन असले तरी जगण्यासाठी, कुटुंबासाठी हातपाय हलवावेच लागतात. घरचा आर्थिक डोलारा पती समर्थपणे पार पाडत होते, तरीही वाढत्या महागाईत मानसीला अर्थार्जन करणे भाग होते. त्यातूनच मग केटरिंगच्या ऑर्डर्स घेणे, हलव्याचे दागिने बनवणे ते विकणे, नऊवारी साड्या शिवणे, ब्युटीपार्लरच्या ऑर्डर घेणे अशी कामे सुरू केली. जगण्याचा संघर्ष करताना नृत्याला विसरणे शक्यच नव्हते. हे सगळे करत असताना मानसीने कथ्थकचे शिक्षण घेतले. ‘कथ्थक विशारद,’ ‘कथ्थक अलंकार’ व ‘नृत्यप्रभाकर’ या पदव्या प्राप्‍त केल्या.

लहानपणापासून कथ्थक शिकण्याची जी उर्मी होती ती उर्मी मानसीने मरू दिली नाही. हे त्या कलेचे मोठेपण की मानसीच्या जिद्दीचे मोठेपण? आधीच सांगितल्याप्रमाणे आयुष्यात संघर्ष तर होताच. मानसीचा मोठा दीर गतिमंद असल्याने मानसी आणि त्यांच्या पतीने त्यांचा सांभाळ पोटच्या पोरासारखा केला आहे. त्यासोबतच मानसीने स्वतःच्या भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाची जबाबदारीही घेतली आहे. घरचं-दारचं सांभाळणे, अर्थार्जन करणे, नृत्य शिकणे ही सगळी तारेवरची कसरत.

एक आवर्तन संपले होते. मानसीने कथ्थकचे धडे पूर्ण केले. पण, त्या तेवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी डोंबिवलीमध्ये चार ठिकाणी कथ्थकचे क्‍लास सुरू केले, ते ही अत्यंत माफक दरात. त्यामध्येही कुणी खरोखर कथ्थकसाठी मनातून वेडा असेल पण आर्थिक परिस्थिती नसेल तर अशा शिष्यांना मानसी विनामूल्य कथ्थक शिकवतात. कथ्थक नृत्याच्या स्पर्धा किंवा स्टेज शो असतील, ज्यामुळे शिष्यांना संधी मिळू शकते. मानसी अशा कार्यक्रमांना शिष्यांना घेऊन जातात. हेतू हाच की, शिष्यांना चांगली संधी मिळावी. कथ्थक नृत्याबाबतचा त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट व्हावा.

तसेच नृत्यकलेचा सामाजिक उपक्रमात काही उपयोग होत असेल तर मानसी आवर्जून त्या उपक्रमात सहभागी होतात. समाजकार्य करणार्‍या विविध संस्थांमध्ये सामाजिक योगदान मानसी देत असतात. एक गृहिणी म्हणून मानसीचे स्थान जितके महत्त्वाचे आहे, तितकेच एक नृत्यसाधिका, एक नृत्यशिक्षिका म्हणूनही मानसीने जनमानसात आपले स्थान निर्माण केले आहे. घरातच नव्हे, तर आजूबाजूला कुठेही नृत्याची पार्श्‍वभूमी नसताना, कष्ट एके कष्ट असे जीवनाचे स्वरूप असताना, लहानपणापासून एखाद्या कलेचे स्वप्न पाहणे आणि ती साध्य करणे हे खरे तर अपवादात्मकच आहे. अशी वैशिष्ट्यपूर्ण अपवादात्मकता मानसीच्या जीवनात आहे. आजही मानसीच्या जीवनक्रमात काहीच बदल नाही. त्याबरोबरच तिच्या नृत्यसाधनेत आणि नृत्यप्रेमातही काहीच बदल नाही. मानसी म्हणतात, ”माझी नृत्यसाधना माझ्या शेवटच्या श्‍वासापर्यंत अशीच अविरत सुरू राहावी, हीच इच्छा आहे.”


- योगिता साळवी