भगवद्‍गीता भाग - ३
महा एमटीबी   03-May-2018

 
आपले खरे विराट दर्शन अर्जुनाला व्हावे म्हणून कृष्ण मुद्दाम म्हणाला, ”अर्जुना, मी तुला हे गुपित सांगतोय की, मी विवस्वनाला, विवस्वनाने इक्ष्वांकूला आणि इक्ष्वांकूने मनुला योग शिकवला.” यावरती अर्जुन म्हणाला, ”कृष्णा, तुझा जन्म तर अगदी अलीकडचा आहे. मग तू विवस्वनाला कसा बरे शिकवू शकशील? विवस्वान तर तुझा जन्म होण्यापूर्वी अनेक युगे आधी होऊन गेला. मग तू त्याला कसे शिकविले हेच मला कळत नाही.”

कृष्णाने स्मितहास्य केले आणि म्हणाला, ”अर्जुना, मी आणि तू पण अनेक जन्म घेतले आहेत. मला ते सर्व आठवत आहेत, तू मात्र विसरलास. मी अजन्मा आणि शाश्वत आहे. या जगात जेव्हा जेव्हा धर्माचा लोप होतो आणि पाप वृद्धिंगत होते, सदाचरणाचा र्‍हास होतो तेव्हा मी पुन्हा अवतार घेतो. जे जे चांगले आहे त्याचे संरक्षण करण्यासाठी जे पाप आहे ते नष्ट करण्यासाठी. धर्माची संस्थापना आणि त्याचा प्रचार करण्यासाठी मी असा युगानुयुगे जन्म घेत आलो आहे. माझ्या या दिव्य रूपाचे दर्शन प्रत्येकाला होणे शक्य नाही. काही निवडक लोकांनाच ते घडू शकते, जे पुन्हा जन्म घेणार नाहीत आणि माझ्यात विलीन होतील. त्यांच्यात भय, क्रोध आणि आसक्ती उरणार नाही. ते माझा आसरा घेऊन माझ्यात विलीन पावतील. ज्ञानाग्नीने शुद्ध होऊन ते मला येऊन मिळतील.”

कृष्ण पुढे म्हणाला, “अर्जुना, तुला कर्म योगासंबंधी अधिक सांगतो. कोणतेही कर्म करताना ते फळाच्या आशेपासून मुक्त असले पाहिजे. असा माणूस सदा सुखी होईल. नि:स्वार्थ कर्म ज्ञान यामुळे मानवाचे सर्व संशय नाहीसे होतात व तो माझ्याशी एकरूप होतो. कर्माची फलं जेव्हा मला अर्पण केली जातात, तेव्हा तुमच्या मनाला शांती मिळते, शिस्त प्राप्त होते आणि ती कर्मे तुम्हाला बाधत नाहीत. पण जो माणूस स्वार्थापोटी कर्म करतो, आसक्तीच्या आधीन होऊन कर्म करतो त्याचे मन कर्म फळात गुंतून पडते आणि तो कर्माच्या बंधनात अडकतो. नि:स्वार्थ कर्म म्हणजेच संन्यास. खरा संन्यास हा आसक्तीपासून तुम्हाला दूर नेतो. संन्यासयोगाचे कर्म हेच एक साधन आहे. जो नियत कर्म करत राहतो आणि फलाची आशा धरत नाही, तोच खरा संन्यासी. असा हा संन्यास साधला की शांती आपोआप मिळते आणि आसक्तीतून मात्र अखेर वेदनाच मिळते.

ज्या गोष्टीला आरंभ आणि अंत असतो, त्या गोष्टीतून कधीच शाश्वतसा आनंद मिळत नाही. म्हणून अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. उष्ण आणि शीत, सुख आणि दु:ख, मान आणि अपमान यांच्याकडे जो समान दृष्टीने पाहातो, त्याचे मन निश्चल असते. अशा माणसाला मातीचे ढेकूळ, दगड आणि सोन्याचा तुकडा सर्व समान असतात. मित्र आणि शत्रू, आपला आणि परका, पापी आणि पुण्यवान यांच्याकडे तोच समान दृष्टीने पाहू शकतो. असा माणूस सर्वश्रेष्ठ असतो. अर्जुना ऐक, मी एक गुह्य सांगतो आहे, मी मानवी आकार धारण केल्याने मीच सर्व प्राण्यांचा स्वामी आहे, ही गोष्ट कुणालाच कळली नाहीय. मी एकमेव आहे, सर्वश्रेष्ठ आहे. सर्वांहून वेगळा आहे. माझी पूजा करणारा श्रेष्ठ अवस्थेला पोहोचतो. मीच या विश्वाचा जनक आणि पिता आहे. पूजा आणि ध्यान यांचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे मी. जे जे माझे ध्यान आणि पूजा करतात ते मला येऊन मिळतात. माझ्या कृपेला प्राप्त होणे ही तर खूप सोप्पी गोष्ट आहे. तू जे जे करतोस ते मला अर्पण कर. म्हणजे तू त्या कर्माच्या बंधनातून मोकळा होऊन मला येऊन मिळशील.”

यावर अर्जुनाने विचारले, ”सतत ध्यान करून तुझा साक्षात्कार मला कसा होईल ते मला सांग. मला तुझी भव्यता आणि शक्ती जाणून घ्यायची असेल तर ती कशी? तुझे वास्तव्य कोठे असते? तू मला कुठे आढळशील?”

मी प्रत्येकाच्या हृदयात राहणारा आत्मा आहे. मीच आरंभ, मीच मध्य आणि मीच अंत आहे. मी आदित्यातील विष्णू, प्रकाशातला सूर्य, नक्षत्रांतील चंद्र आहे. वेदांतील मी सामवेद आहे. इंद्रियांमधला राजा मी मन आहे. जिवंतातली मी बुद्धी आहे. रुद्रांमधला मी शंकर आहे. पर्वतांमध्ये मी मेरू पर्वत आहे. शब्दांतला मी ओम आहे. शस्त्रांतला मी विद्युत आहे. जे मोजले जाते त्यातला मी काळ आहे. सर्वांचा विनाश करणारा मृत्यू मीच आहे. जे जे जन्माला येणार आहे, त्यांचे मी मूळ आहे. सर्व जीवसृष्टीतील जीव मीच आहे. जे जे चल आणि अचल आहे ते ते सर्व मी आहे. जे भव्य सुंदर आणि शक्तिमान आहे ते सर्व माझ्या तेजाच्या एका ठिणगीतून उत्पन्न झाले आहे. मीच हे सारे विश्व व्यापून टाकले आहे.”

अर्जुन म्हणाला, ”तुझे विश्वव्यापी रूप पाहण्याची मला प्रबळ इच्छा होते आहे, हे योग्यांच्या स्वामी जर तू मला त्याकरिता लायक समजत असशील तर मला तुझे हे विश्वरूप दर्शन घडव.”

कृष्णाने अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन त्याचे विश्वरूप दर्शन घडविले. सहस्त्र सूर्यांच्या तेजाप्रमाणे विश्वाच्या स्वामीचे ते तेजोमय रूप अर्जुनाने पाहिले. संपूर्ण विश्वाचे दर्शन त्या एका रूपात अर्जुनाला झाले. सर्व देव आणि प्राणीमात्रांचे दर्शन त्याला त्या रूपात दिसले. त्याला ब्रह्मा आणि सर्व ऋषी दिसले. ते रूप अनंत होते. ज्याला आदि नाही, अंत नाही आणि मध्यही नाही! चंद्र आणि सूर्य त्याचे जणू नेत्र होते. अग्नीच्या तेजाने त्याचा चेहरा उजळलेला होता. स्वर्ग, पृथ्वी आणि आकाश त्यात सामावले होते. धृतराष्ट्राचे सर्व पुत्र, अनेक योद्धे, भीष्म, द्रोण, राधेय हे वीर, तसेच पांडवांकडील अनेक वीर त्याच्या अग्निमय मुखात प्रवेश करताना दिसत होते. जसे ज्योतीवर पतंग झेप घेतात आणि नष्ट पावतात तसे हे सर्व नष्ट होत होते. हे पाहून भयकंपित होऊन अर्जुन म्हणाला, ”कृष्णा, माझ्यावर दया कर, तू कोण आहेस ते मला सांग. हे भयप्रद विनाशाचे रूप मला का बरे दाखवत आहेस? तुझा हेतू काय?”


कृष्ण म्हणाला, ”तू मला ओळखले नाहीस काय? मी महाविनाशक काळ आहे. मीच या प्रचंड जगाचा नाश करतो. अनेक वीरांचा नाश करायला मी सुरुवात केली आहे. ते सारे मरणार आहेत. प्रत्येकजण नाश पावणार आहे. अर्जुना, तू उठ आणि कीर्ती मिळवून घे. तू केवळ साधन मात्र आहेस, या सर्वांना मी आधीच मारले आहे. तू एक निमित्तमात्र आहेस! तेव्हा भीष्म, द्रोण, राधेय, जयद्रथ आणि इतर हे नाश झाल्यातच जमा आहेत. तू त्यांना मार आणि कीर्ती मिळव. हे युद्ध तू जिंकून घे.”

अर्जुनाचा गळा दाटून आला. शब्द अडखळू लागले. त्याने आपले हात जोडले आणि तो म्हणाला, ”हे अनंता, स्वामींच्या स्वामी, जगन्नियन्त्या, तू अविनाशी आहेस. तू आहेस आणि नाहीसही! तूच ज्ञाता आणि ज्ञान आहेस. तूच सर्वव्यापी आहेस. मी तुला ’मित्रा’ अशी हाक मारतो. या माझ्या अज्ञानाला क्षमा कर, मला तुझे हे अक्राळविक्राळ रूप आता सहन होत नाही, जसा बाप आपल्या मुलास, मित्र मित्रास किंवा प्रियकर प्रेयसीला सांभाळून घेतो तसे तू मला सांभाळून घे आणि तुझ्या नेहमीच्या रूपात मला भेट.” मग कृष्णाने त्याची दिव्य दृष्टी काढून घेतली. नेहमीच्या रूपात तो अर्जुनासमोर प्रकट झाला.


अर्जुन म्हणाला, ”काही भक्त तुझी पूजा करतात तर काही त्या परमतत्त्वाची मग या दोघांपैकी कोणता योगी अधिक चांगला?”


कृष्ण म्हणाला,”ते दोघेही समान आहेत. दोघेही माझ्याकडे येऊन पोहोचतात. ज्यांनी आपली इंद्रिये जिंकली आहेत ते त्या परमतत्त्वाची पूजा करतात, पण तो मार्ग खूप बिकट असतो. दुसरा मार्ग जरा सोपा आहे, तो भक्तीचा मार्ग आहे. जे जे कराल ते मला अर्पण करा, एकाग्र चित्ताने माझी भक्ती करा म्हणजे तुम्ही मला मिळाल. अशा भक्ताला मी मृत्यूपासून वाचवितो.”


अर्जुन म्हणाला, ”संन्यास म्हणजे खर्‍या अर्थाने काय ते मला सांगशील का?” कृष्ण म्हणाला, ”ऋषी सांगतात की, आसक्तीतून निर्माण झालेल्या सर्व कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास! सर्वच कर्मांचा ‘पाप’ असे समजून त्याग केला पाहिजे. परंतु, काही जण असेही सांगतात की, यज्ञ, दान आणि तप यांचा त्याग करता कामा नये. यातले खरे काय ते मी आता तुला सांगतो.”


कुठलेही कर्म असो, त्याचा त्याग करता कामा नये. कर्म हे तर करतच राहावे. पण, कर्म करताना फळाचा त्याग केला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की, आपल्या कर्तव्याचा त्याग करायचा! कर्तव्य तर करतच राहिले पाहिजे. पण, फळाची अपेक्षा न ठेवता ते केले पाहिजे. असा माणूस समदृष्टीने सर्व पाहतो आणि तोच माझा खरा भक्त असतो! तो सर्व प्रकारचे कर्म करत राहिला तरी माझ्या आश्रयाला आल्यामुळे शाश्वत आणि अविनाशी पदाला पोहोचतो.


अर्जुन म्हणाला, ”कृष्णा, आता माझा भ्रमनिरास झाला आहे. कोणताही संदेह आता माझ्या मनी उरला नाहीय. मी तुझ्याच आज्ञेत राहीन.” अर्जुनाचा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. मग अर्जुनाच्या रथाच्या पांढर्‍याशुभ्र अश्वांचे लगाम आपल्या हाती घेऊन श्रीकृष्णाने त्याचा रथ भीष्मांच्या रथाकडे वळविला.
 
 
 
- सुरेश कुळकर्णी