‘सागर हूँ और प्यासा हूँ|’
महा एमटीबी   29-May-2018
‘समुद्री चहुकडे पाणी | पिण्याला थेंबही नाही ॥ पं. कुमार गंधर्व यांच्या स्वरातील हे गाणे आज अचानक आठवायलाही एक कारण घडले आहे. रा. स्व. संघाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते स्व. मोरोपंत पिंगळे, एक अनुभव नेहमी सांगत असत. तो आठवला आणि मग हे गाणेही आठवले. एकदा मोरोपंत उत्कल प्रांताच्या दौर्‍यावर होते. पावसाळ्याचे दिवस होते. त्यामुळे महानदी व तिच्या उपनद्यांना पूर आलेला होता. तटबंदी ओलांडून पुराचे पाणी इकडे-तिकडे पसरले होते. सारा परिसर जलमय झालेला होता. मोरोपंत ज्या रेल्वेगाडीने प्रवासाला निघाले होते, ती एका स्थानकावर थांबली तर खाली गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. स्थानकदेखील जलमय झाले होते. गाडी सुरू का होत नाही, हे बघण्यासाठी मोरोपंत स्थानकावर उतरले आणि त्यांनी स्टेशनमास्तरला विचारले. त्याने सांगितले की, मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे गाडी पुढे जाणे शक्य नाही. नंतर मोरोपंतांनी त्या स्टेशनमास्तरला पिण्याचे पाणी कुठे मिळेल का म्हणून विचारले. उत्तर मिळाले- इथे पाणी नाही. आता पाऊस पडत होता, इकडे तिकडे सर्वत्र पावसाचे पाणी साचले होते. चारही बाजूंना पाणीच पाणी होते; परंतु, पिण्यासाठी एकही थेंब नव्हता. पाणी भरपूर असले तरी, पाणी संग्रहित करणे, शुद्ध करणे, त्याला एखाद्या उपकरणाद्वारे जलपात्रात भरणे आणि त्यातील पाणी मग पिण्यासाठी वापरणे, ही व्यवस्था तिथे नव्हती. त्यामुळे खाली, वर, चारही बाजूंना पाणी असूनही मनुष्य तहानलेलाच राहणार. विशाल, अथांग महासागराच्या काठावर गेलेल्या व्यक्तीला तहान लागली की ती व्यक्ती विहीर कुठे आहे का, याची चौकशी करते. कुठलेही विचार हे अमूर्त असतात. त्या विचारांना साकार करणार्‍या माध्यमाची आवश्यकता असते. हा सिद्धांत सहज समजावा म्हणून मोरोपंत त्यांच्या जीवनातील हा अनुभव नेहमी कथन करायचे.
 
 
 
आज भारताच्या वैचारिक जगतात, तसेच समाजात अशीच काहीशी परिस्थिती आढळून येत आहे. एवढ्यातलेच उदाहरण द्यायचे झाले तर, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळचा प्रचार आठवून बघा. जबरदस्त धुमाकूळ झाला. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी प्रत्येक दिशेने सुरू होत्या. परंतु, सर्वसामान्याला मात्र नेमके काय सुरू आहे आणि नेमके काय समजून घ्यायचे, याचा निर्णयच करता येत नव्हता. चारही बाजूला विचारांची आवर्तने सुरू होती; हा मात्र तहानलेलाच होता. आता निवडणुका पार पडल्या आहेत. प्रचाराचा धुराळाही खाली बसला आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि संविधानाचा यथोचित मान ठेवण्यासाठी तिथे आता साप-मुंगसाची जोडी सत्तेत आली आहे. प्रचाराच्या काळात लिंगायत पंथाला हिंदू धर्मापासून वेगळे करून एक नवा धर्म- लिंगायत धर्म तयार करण्याची खेळी कॉंग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी खेळली. प्रचंड चर्चा झाली. डावे-उजवे पक्ष हिरीरीने मांडल्या गेलेत. आता निवडणुका झाल्या आणि सर्व काही शांत झाले. कर्नाटकात भाजपा सत्तेत येत आहे, असे समजताच देशातली लोकशाही धोक्यात आल्याचे काही जणांना दिसले आणि त्यांनी मग जिवाचा आकांत करून लोकशाहीचा हा धोका परतवून लावला. आता सर्व काही व्यवस्थित आहे. परंतु, सर्वसामान्य जनता मात्र तहानलेलीच राहिली. समुद्राच्या काठावर तहानलेला जसा विहीर शोधत फिरतो, तशी कर्नाटकची जनता, या सर्व घुसळणीतून आपल्याला काय मिळाले, आपल्या हातात काय आले, हे बघत फिरत आहे.
 
 
 
विचारांना साकार करण्याचा प्रयत्न होणार नाही, तोपर्यंत हे विचार कितीही सर्वमान्य, तर्कशुद्ध, सत्यान्वेषी असले तरी, त्याचा काहीएक उपयोग होत नाही. याचा अनुभव कर्नाटकातीलच नव्हे तर, भारतातील जनताही घेत आहे. जे काही विचार असतील, मग ते कुणाला मान्य असतील तर कुणाला अमान्य, ते जर साकार करण्याचा प्रयत्न झाला नाही, तर त्या विचारांना प्रसृत करण्याचा खटाटोपही का म्हणून करावा, असा प्रश्‍न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो. हा विचारांचा पराभव नसतो, तर ते विचार मांडणार्‍यांचा पराभव असतो. असे पराभूत वैचारिक लोक भारतात फार मोठ्या संख्येने वाढत आहेत. ही संख्या जितकी वाढत जाईल, तितकी समाजात अस्थिरता निर्माण होत राहील. केवळ विचार, जे अमूर्त असतात, ते कुणालाही मार्गदर्शन करू शकत नाही. त्याच्या समस्येचे समाधान ठरू शकत नाही. या सत्याला अनुसरूनच आपल्या भारतात ऋषिमुनींनी मूर्तीची संकल्पना रूढ केली, असे म्हटले तर ते चूक ठरणार नाही. सर्वसामान्यांना अमूर्ताचे, निगुर्ण-निराकाराचे आकलन होऊच शकत नाही. त्याला डोळ्यांना दिसणारे, गोचर असे काही तरी रूप समोर असले तरच त्याच्या कामाचे. हे असे रूप साकार करणे सोपे नाही. विचारांना साकार करण्यासाठी शक्ती हवी आणि शक्ती संघटनेतून येते. या कलियुगात तर संघटनेची शक्तीच विचारांना साकार करू शकते, असे म्हटले आहे. ‘संघे शक्ति कलियुगे|’ म्हणजे, ज्याच्या जवळ संघटनेची शक्ती आहे, तोच विचारांना साकार करू शकतो आणि मग त्या साकाराचे लोक अनुसरण करतात.
 
 
 
कर्नाटकात हिंदू धर्मापासून लिंगायत पंथाला वेगळे करण्याचा विचार, त्या लोकांजवळ संघटनेची शक्ती नसल्याने कधीही साकार होणार नाही. उलट, लिंगायत पंथ हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे, हा विचार प्रतिपादन करणार्‍यांकडे संघटनेची शक्ती असल्यामुळे लोक त्याचे साकार रूप बघू शकतात आणि त्यावर विश्‍वास ठेवतात. कर्नाटकातच काय पण, संपूर्ण भारतभर आपल्याला हेच दृश्य दिसून येते. १९२५ साली डॉ. हेडगेवारांनी जो प्राचीन, अनुभवसिद्ध विचार पुन:प्रतिपादित केला, त्या विचाराच्या मागे गेल्या ९० वर्षांत जी अजेय अशी शक्ती उभी झाली, त्याचे सगुण-साकार रूप लोकांना आकळू लागले आहे. त्यामुळे लोकांना मार्गदर्शन मिळू लागले आहे. आतापर्यंत आपण जो मार्ग क्रमित होतो, तो चुकीचा होता, हे समजू लागले आहे. ते आपल्या चुकीची दुरुस्ती करू लागले आहेत. हे परिवर्तन किंवा हा सामाजिक बदल इतक्या वेगाने होत आहे की, संघ-प्रतिपादित विचारांचे घोर विरोधकही स्तंभित झाले आहेत. त्यांना काय करावे अन् काय करू नये, हेच समजेनासे झाले आहे. ज्यांना निवडणुकीच्या राजकारणापलीकडे काहीच दिसत व सुचत नाही, त्यांना सामाजिक बदल निवडणुकीच्या राजकारणामुळेच आणि विशेषत: सत्ता हाताशी असल्यावरच करता येतात, हेच माहीत आहे. याला ‘टॉप टू बॉटम मॉडेल’ असे म्हणतात. पण हा बदल समाजाच्या सर्वात शेवटच्या घटकापासून सुरू होत असेल, तरच तो शिखरावर पोहोचेपर्यंत चिरस्थायी होत जातो, हे सत्य आहे आणि हेच सत्य आहे. आज भारतातील सामाजिक बदलाचे प्रकटीकरण समाजाच्या विविध क्षेत्रात होत आहे, त्याचे कारण हा बदल मुळातून होत आलेला आहे, हे आहे.
 
 
 
हे कुणी समजून घ्यायलाच तयार नाही. प्रत्येकाला वाटते की, हवेच्या झोतानेच, एखाद्या नेत्याच्या झंझावाती प्रचार-दौर्‍यानेच हा सर्व बदल होत असतो. परंतु, वस्तुस्थिती फार वेगळी आहे. हे सत्य जो जाणतो आणि मनात धारण करतो, त्याला मग कशाचीही भीती राहात नाही. येणारा भविष्याकाळ कसा असेल, या कल्पनेने तो गांगरून जात नाही. कुठे जायचे आहे आणि किती जायचे आहे, याचे चित्र स्पष्टपणे त्याच्या डोळ्यांसमोर असते. त्यामुळे वेळोवेळी येणार्‍या वादळांमुळे तो किंचितकाल हादरत असेलही; पण उन्मळून पडत नाही. समुद्राच्या काठावर असला तरी, किंवा खाली, वर, चहुबाजूंना पाणीच पाणी असले तरी, तो पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व ते सतत मिळत राहील याची यंत्रणा सिद्ध ठेवत असतो. त्यामुळे तो तहानलेला राहात नाही. उलट, तहानलेल्या अनेकांची तहान भागविण्यास सक्षम असतो. असे अनेक जण संघटनेच्या आत्मीय सूत्राने परस्परांशी बांधले असले की, त्या समाजाचे भविष्यही उज्ज्वल असते. स्व. मोरोपंत त्यांच्या जीवनातील वर उल्लेखलेला जो अनुभव वारंवार सांगत असत, त्यातून त्यांना हाच संदेश द्यायचा असावा, असे वाटते. अशा लोकोत्तर पुरुषांचे साधे साधे अनुभवही येणार्‍या पिढ्यान्‌पिढ्यांना मार्गदर्शक असतात.