सध्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. प्रणब मुखर्जी वर्तमानपत्र आणि सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आमंत्रणाला मान देऊन ७ जून रोजी नागपूर येथे रेशीम बागेत एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. तेथे तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून प्रणबदा संघ कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. नागपूर येथे दरवर्षी २५ दिवसीय तृतीय वर्षाचा वर्ग संपन्न होतो, त्यात देशभरातील सर्व राज्यांतून स्वयंसेवक प्रशिक्षण घेण्यासाठी सहभागी होत असतात. यावर्षी देखील हा वर्ग १४ मे पासून सुरु झाला आहे, ज्याचा समारोप ७ जून रोजी होणार आहे, यात देशभरातील सर्व राज्यांतून एकूण ७०९ स्वयंसेवक सहभगी झाले आहेत.
ज्या लोकांना संघाचा पुरेसा परिचय आहे, त्यांच्यासाठी ही घटना नक्कीच नवीन नाही, अथवा आश्चर्यकारक देखील नाही. त्या सर्वांच्या दृष्टीने ही एक सामान्य घटना आहे. कारण संघात नेहमीच समाज सेवेसाठी अग्रणी मान्यवरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाते. यावेळी संघाने ते आमंत्रण माजी राष्ट्रपती डॉ. प्रणब मुखर्जी यांना दिले, एवढेच! त्या आमंत्रणाचा स्वीकार प्रणबदा यांनी केला हा नक्कीच त्यांचा मोठेपणा...!
थोडे इतिहासात डोकावून पहिले तर लक्षात येईल की, संघाच्या विविध कार्यक्रमात येऊन गेलेल्या अशा अनेक विभूती आहेत. १९३४ साली स्वत: महात्मा गांधी संघाच्या वर्धा येथे संपन्न झालेल्या शिबिराला भेट देऊन गेले होते. दुसऱ्या दिवशी संघ संस्थापक डॉ. हेडगेवार हे महात्मा गांधींच्या भेटीला जवळ असलेल्या त्यांच्या निवासस्थानी गेले होते, त्या दोघांमध्ये संघाविषयी एक विस्तृत चर्चा झाली होती. या घटनेचा उल्लेख महात्मा गांधी यांनी १६ सप्टेंबर १९४७ रोजी दिल्ली येथे संघ स्वयंसेवकांना संबोधित करताना केलेला आहे. त्यात त्यांनी संघाची शिस्त, साधेपणा आणि समरसता यांची प्रशंसा केली होती. गांधीजी म्हणाले की, "अनेक वर्षांपूर्वी मी वर्धा येथे संघाच्या शिबिरात गेलो होतो. तेव्हा संघ संस्थापक डॉ. हेडगेवार हयात होते, स्व. जमनालाल बजाज यांनी मला तिथे नेले होते. तिथे संघाची शिस्तबद्ध कार्यपद्धती, साधेपणा आणि अस्पृश्यतेचा त्याग पाहून मी अत्यंत प्रभावित झालो होतो. " ते पुढे म्हणाले की, "संघ एक सुसंघटीत, आणि अनुशासित संघटना आहे." याचा संदर्भ 'संपूर्ण गांधी वाङमय' खंड ८९, पृष्ठ क्रमांक २१५-२१७ यात आढळतो.
जवळपास १९३० च्या दशकापासून समाज जीवनात काम करणाऱ्या विविध महानुभावांना संघाच्या कार्यक्रमात आमंत्रित केले जाते, आणि हे सर्व महानुभाव संघाच्या आमंत्रणाला मान देऊन उपस्थित देखील राहिले आहेत. भारताचे माजी उपराष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन, लोकनायक जयप्रकाश नारायण देखील संघाच्या आमंत्रणावर उपस्थित राहिले आहेत, तसेच त्यांनी संघाच्या कामाची प्रशंसा देखील केली आहे. जनरल करिअप्पा १९५९ साली बंगळूर येथील संघ शाखेत गेले होते. त्या भेटीत ते म्हणाले होते की, "संघ काम मला मनापासून आवडणाऱ्या कार्यापैकी एक आहे. एखादा मुस्लीम इस्लामची स्तुती करत असेल तर संघाने हिंदुत्वाप्रती बाळगलेला अभिमानात काय चूक आहे? माझ्या युवक बांधवांनी कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता जोमाने संघ काम करत राहावे. डॉ. हेडगेवारांनी तुमच्या समक्ष स्वार्थरहित कामाचा पवित्र आदर्श घालून दिला आहे. त्यावर पुढे मार्गक्रमण करा. देशाला तुमच्या सारख्या सेवाभावी कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे."
उडूपी धर्मसंसद : द्वितीय सरसंघचालक श्री. गोळवलकर गुरुजी आणि जनरल करिअप्पा
१९६२ च्या चीन आक्रमणात संघ स्वयंसेवकांनी केलेल्या सेवा कार्यापासून प्रभावित होऊन तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी १९६३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये संघाला आमंत्रित केले होते. त्यात ३ हजार स्वयंसेवकांनी संपूर्ण गणवेशात सहभाग नोंदवला होता. 'राष्ट्र सर्वप्रथम' या संघ भावनेमुळेच १९६५ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत तत्कालीन पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना आमंत्रित केले गेले होते, गुरुजी त्या बैठकीला उपस्थित राहिले होते.
१९६३ साली संपन्न झालेली प्रजासत्ताक दिनाची परेड
१९६३ साली स्वामी विवेकानंद यांच्या जन्मशताब्दी निमित्त कन्याकुमारी येथील 'विवेकानंद शीला स्मारक' निर्माणाच्या कामात संघाला संपूर्ण समाजाकडून सहकार्य लाभले होते. स्मारक निर्माण करण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या ३०० खासदारांच्या स्वाक्षर्या एकनाथजी रानडे यांना मिळू शकल्या होत्या.
इंदिरा गांधी आणि एकनाथजी रानडे, विवेकानंद शीला स्मारकाच्या उद्घाटनावेळी
१९७७ साली आंध्रप्रदेशमध्ये आलेल्या चक्री वादळात संघाच्या स्वयंसेवकांनी केलेल्या सेवा कार्यामुळे तेथील लोक नेते प्रभाकर राव यांनी संघाचे नवीन नामकरण केले होते, त्यांनी संघाला Ready for Selfless Service (RSS) असे संबोधले होते.
संघ भेदाभावमुक्त आणि समरसतायुक्त समाजाच्या निर्मितीसाठी गेल्या ९२ वर्षांपासून काम करत आहे. यासाठीचे यश संघाला मिळत देखील आहेच! या विचारांशी जे सहमत आहेत, ते संघाच्या कार्यक्रमात सहभागी होत असतात, आणि त्यासाठी सहकार्य करायला देखील नेहमीच तत्पर असतात.
- नरेंद्र कुमार
(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह-प्रचार प्रमुख आहेत.
मूळ हिंदी लेखाचा अनुवाद)