चिह्न निमित्त – निमित्त चिह्न भाग ८
महा एमटीबी   29-May-2018


देवी-देवतांच्या मूर्ती आणि शिल्प हे नेहमीच परंपरांची प्रतीके असतात आणि परंपरा अशाच निर्माण होत नसतात. त्यांच्या मागे अनेक पिढ्यांचे, सामाजिक आणि वैयक्तिक जीवनशैलीचे निश्चित अनुभव असतात. असे निश्चित अनुभव सर्जनशील शिल्पकार आणि चित्रकारांच्या अद्भुत कालाविष्कारातून मूर्त स्वरूप धारण करतात. समाजाची अनेक पिढ्यांची निश्चित जीवनशैली संस्कृतीचे रूप घेते. अशी जीवनशैली आणि संस्कृतीची अभिव्यक्ती शिल्प-चित्र-मूर्ती या वास्तव माध्यमातून व्यक्त होते. नवव्या-दहाव्या शतकांत राजा भोज यांची मावळ प्रांतातील चंद्रनगरी धारा (आजचे धार शहर) हे दिगंबर जैन धर्मियांचे प्रमुख केंद्र होते. म्हणूनच राजा भोज परमार याने अनेक जैन मंदिरे आणि उपासना केंद्रांची निर्मिती केली होती. राजा भोज याच्या धारा नगरीतील भोजशाला या मोठ्या जैन धर्म संकुलात, सूत्रधार हिरसुत मणथल याने वाग्देवीच्या अद्भुत शिल्पाची जैन शिल्पशैली माध्यमात निर्माण केली.


जैन धर्म प्रणालीमधे आणि जैन साहित्यामधे देवी सरस्वतीच्या प्रतिमेचे विवेचन खूप विस्ताराने केले गेले. द्वादशांगवाणी, जिनवाणी, जयदु सुद देवदा वाग्देवी किंवा श्रुतदेवी आणि जैन सरस्वती अशा संबोधनाने अनेक विद्वान जैन साधकांनी, संस्कृत, ब्राम्ही, पाली अशा प्राचीन भारतीय भाषांमधे अनेक शतकांपासून असे देवी सरस्वतीस्तुती संदर्भातील साहित्य निर्माण केले आहे.

जैनमुनी आचार्य नेमिचंद्र यांनी देवीच्या श्रुतदेवी या विग्रह मूर्तीचे आणि त्यातिल अलंकार, आयुधे आणि रुपके यांचे फार विस्ताराने वर्णन केले आहे. आज अस्तंगत झालेल्या ब्राम्ही-पाली अशा भाषांतील ही स्तुतीवचने आणि रूपके समजायला काहीशी क्लिष्ट असू शकतात. देवीच्या कपाळावरील कुंकवाचे वर्णन सम्यग्दर्शन चा सौभाग्य तिलक असे तर वस्त्र-परीधानाचे वर्णन सम्यव्चारित्र आदि रत्नत्रय रूपी वस्त्र धारण केलेली देवी असे केले आहे. सम्यग्दर्शन आणि सम्यव्चारित्र या दोन जैन धर्म संकल्पनेतील सर्वोत्तन-सर्वोच्च नितीमत्तादर्शक तत्व सिद्धांत आहेत. जैन धर्म संकल्पनेतील अन्य तत्व सिद्धांताची रूपके श्रुतदेवीच्या सर्वांगाचे वर्णन करताना आचार्य नेमिचन्द्र यांनी वापरली आहेत. देवीचे आचारांग मस्तक, सूत्रकृतांग मुख मण्डल, स्थानांग सुन्दर कण्ठ, समवायां आणि व्याख्या प्रज्ञप्ति अशा रूपकाचे दोन सुन्दर हात, ज्ञातृकथांग तथा उपासकाध्ययनांग अशाने अलंकृत दोन स्तन युगुलं, अंत:कृतदशांग और अनुत्तरोपपादिकांग अशा रुपकांनी अलंकृत सुन्दर नाभिकमल, प्रश्नव्याकरणांग याने अलंकृत दोन सुन्दर नितम्ब आणि जांघ आणि दृष्टिवाद तत्व सिद्धांताने तिचे दोन्ही पाय अलंकृत आहेत. भगवान जिनेन्द्रांची ती साक्षात वाणी आहे अशी देवी सरस्वतीची सुंदर स्तुती जैन धर्म संकल्पना साहित्यात केली गेली आहे. दहा बारा शतकांपूर्वीच्या या काळातील अध्ययन-अध्यापन-आवर्तन-ज्ञानोपासना-कलोपासना अशी विद्यावर्धिनी संस्कृती कळसाला गेली होती याचाच परिणाम उत्तम शिपल-चित्र-मूर्तिकला संवर्धनात झाला असावा.

देवी सरस्वतीची अन्य विग्रह मूर्ती आहे देवी गायत्रीची प्रतिमा. ही परब्रम्हस्वरूपिणी देवी, ज्ञान आणि विज्ञानाची संकेत मूर्ती असून, बहुआयामी चिह्नसंकेतांची रूपके धारण करते. आदिशक्ती प्रकृतीची पांच रूपे देवीच्या या एका प्रतिमेत एकवटली आहेत. सर्व वेद, सर्व उपनिषदे आणि सर्व पुराणांमधे देवी गायत्रीचे विस्तृत वर्णन उपलब्ध आहे. देवी गायत्रीची अनेक विग्रह रूपे शिल्प, मूर्ती आणि चित्रप्रतिमा स्वरूपात उपलब्ध आहेत. देवीची साधारण उपलब्ध प्रतिमा पंचमुखी – दशभुजा अशा स्वरुपाची आहे.


 

पंचमुखी – दशभुजा देवी गायत्री


देवीच्या पांच मुखाचे मुक्ता, वैदूर्य, हेम, नीलमणि आणि धवल असे पांच वेगवेगळे वर्ण आहेत. या वर्णानांसुद्धा काही निश्चित चिह्नार्थ आहेत आणि ते मानवी मन आणि सर्वशक्तिमान निसर्ग यामधील दुवा आहेत. देवी गायत्री वेदांची जननी आहे आणि सर्व वेदांचे सार असा तिचा चोवीस अक्षरी मंत्र मन आणि शरीरासाठी आरोग्यदायी आणि पापनाशक मानला जातो. देवीला तीन डोळे आहेत, मुकुटावर ती चंद्र धारण करते आणि सजीवांच्या आत्मिक प्रगतीसाठी देवीची उपासना केली जाते. दशभुजा देवीच्या हातांत दहा आयुधे आणि शस्त्रे धारण केली आहेत, त्यांना निश्चित चिह्नार्थ मूल्य आहेत.


देवी गायत्रीची उपासना दिवसात तीन वेळा केली जाते. या तिन्ही उपासना काळांत देवीच्या तीन विग्रह प्रतिमा उपलब्ध आहेत. तीन वेगळ्या प्रतिमा – उपासनेचे तीन वेगळे प्रहर हि मांडणी फार विलक्षण आहे. दिवसातील २४ तासात निसर्गात नियमित होणारी होणारी सूर्याची एक प्रदक्षिणा, त्यानुसार बदलणारा निसर्ग आणि पार्थिव सजीव मानव यांचे नाते स्पष्ट करणारी हि मांडणी आहे. निसर्ग जितका वक्तशीर आहे तोच गुण सजीवांनी आत्मसात करावा आणि निसर्गाच्या शिस्तीत चालावे अशी योजना या संकल्पनेत आपल्या विद्वान पूर्वजांनी केली आहे. बदल हे निसर्गाचे मुलभूत प्राथमिक तत्व आहे. आपल्या शरीरात सुद्धा कालपरत्वे बदल होत असतो. तीन प्रहरातील देवीच्या तीन विग्रह प्रतिमा हेच स्पष्ट करतात.

प्रात: काळी सूर्योदयाचे वेळी सूर्यबिंबाच्या मध्यभागी आसनस्थ देवी गायत्री, कुमारिका स्वरूपात असते आणि तिला, ब्रम्हदेवाची कन्या ब्रह्मशक्ती गायत्री असे ऋग्वेदात संबोधित केले गेले आहे. यावेळी तिचा वर्ण लाल रंगाचा असतो. द्विभुज हंसवाहिनी देवीच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात ती कमंडलू धारण करते. जैन धर्म साहित्यात, या कमंडलूला फार छान रूपक मानले आहे. चार पुरुषार्थ – काम - अर्थ – धर्म – मोक्ष ... या पैकी अर्थ – अर्थार्जन याचे अत्यंत व्यवहारी रूपक म्हणजे कमंडलू. पाणी भरण्यासाठी कमंडलूचे तोंड मोठे असते...मात्र अर्घ्य देण्यासाठीचे तोंड लहान असते. तुमचा आय (उत्पन्न) जास्त-मोठा असावा मात्र तुमचा व्यय (खर्च) मात्र खूप मर्यादित असावा असे अगदी साधे आणि सोपे कमंडलूचे रूपक कुटुंबाच्या अर्थकारणासाठी यात सुचवले आहे. जैनमुनी आचार्य नेमिचंद्र यांनी याचे वर्णन फार विस्ताराने केले आहे.

मध्यान्नीला तळपता सूर्य डोक्यावर येतो तेंव्हा देवी गायत्री युवा – विवाहित स्त्रीस्वरूपात सूर्यबिंबावर आसनस्थ असते. या गरुडवाहिनी आणि त्रिनेत्री चतुर्भुज देवीला वैष्णवी शक्ती आणि सावित्री असे यजुर्वेदात संबोधित केले गेले. डाव्या वरच्या हातात शंख, उजव्या वरच्या हातात सुदर्शन चक्र, उजव्या पुढच्या हातात गदा आणि डाव्या पुढच्या हातात कमळ अशी हि वैष्णवी शक्ती, पालनकर्त्या श्री विष्णूची सहचारिणी देवता आहे.

सूर्यास्ताला वृषभ वाहन सन्निध असणारी देवी वृद्धा झालेली असते. सामवेदात वर्णन केल्यानुसार हे तिचे रुद्र स्वरूप आहे. त्रिशूळ, डमरू, पाश आणि जलपात्र धारण करणारी देवी सर्वशक्तिमान महादेवाची सहचारिणी देवी दुर्गेची प्रतिमा असते. सुर्योदयापासून सूर्यास्ता पर्यंत प्रकृतीची, निसर्गाची आणि मानवी जीवनाची नियमित आवर्तने स्पष्ट करणारी हिंदू धर्मीयांची हि प्राचीन असूनही संपूर्ण आणि प्रगत संकल्पना.

निसर्गक्रम आणि त्याबरोबर मानवी सहजीवनाचे असे बहुआयामी, विलक्षण सूक्ष्म चिह्नसंकेत आणि चिह्नार्थ हे फार सखोल अभ्यासवृत्ती, सृजनशील चिंतनातून आपल्या पूर्वाजाना साध्य झाले असावे. आपण त्यांचे सदैव ऋणी राहूया...!!

- अरुण फडके