अभिनंदन आयर्लंड!
महा एमटीबी   28-May-2018कॅथलिक पंथीय आयर्लंडच्या घटनेमध्ये गर्भपाताला बंदी होती. बलात्कारातून राहिलेला गर्भ असो किंवा गर्भाच्या जगण्याने त्या आईसमोर उभ्या ठरणाऱ्या असंख्य समस्या असो, आईने मुलाला जन्म द्यायचाच. पण, भारतीय वंशाचे असलेले आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांच्या कारकिर्दीत गर्भपातबंदीच्या कायद्यावर मतदान झाले.  

 
‘सिमोन दी बोव्हुआर’ या फ्रेंच लेखिका आणि विचारवंत महिलेच्या ‘सेकंड सेक्स’ पुस्तकावर आधारित मुख्यत: स्त्री मुक्तीची संकल्पना विदेशात मांडली गेली. त्याचीच नक्कल आपल्याकडेही झाली. पण, पूर्व- पश्चिम संस्कृतीमधल्या भेदाचा विचार या ‘मुक्ती’ संकल्पनेत नसल्यामुळे पाश्चिमात्य स्त्रियांची ‘मुक्ती’ संकल्पना आणि पूर्वेकडील स्त्रियांची ‘मुक्ती’ संकल्पना यांच्या वास्तवात बरीच दरी राहिली. आज आपल्या देशात स्त्री मतदान करू शकते. त्यासाठी भारतीय महिलेला वेगळा लढा द्यावा लागला नाही. मात्र, हाच मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी पाश्चिमात्य महिलांना लढा द्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर आज २१ व्या शतकामध्ये आयर्लंडमध्ये एक क्रांती झाली. तेथील घटनेच्या आठव्या दुरुस्तीनुसार महिलांना काही तरतुदींवर गर्भपात करण्याचा हक्क मिळाला.
 
कट्टर कॅथलिक पंथानुसार गर्भपात करणे म्हणजे पाप. हाच धागा पकडून कॅथलिक पंथीय आयर्लंडच्या घटनेमध्ये गर्भपाताला बंदी होती. बलात्कारातून राहिलेला गर्भ असो किंवा गर्भाच्या जगण्याने त्या आईसमोर उभ्या ठरणाऱ्या असंख्य समस्या असो, आईने मुलाला जन्म द्यायचाच. पण, भारतीय वंशाचे असलेले आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांच्या कारकिर्दीत गर्भपातबंदीच्या कायद्यावर मतदान झाले. यामध्ये एकूण मतदानाच्या ६६ टक्के मतदान गर्भपातबंदी कायद्याच्या विरोधात आहे. अर्थात, धर्माच्या नावावर स्त्रीला दावणीला बांधणारे जगात सर्वत्रच असतात. कधी खुलेआम तर बहुतेकदा मुखवटे पांघरूनच. त्यामुळे आयर्लंडसारख्या देशात आजपर्यंत स्त्रीला गर्भपाताचा हक्क नाकारला गेला होता. या कायद्यामध्ये बदल केल्यामुळे आयर्लंडमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशावेळी२०१२ साली आयर्लंडमध्ये गर्भपातबंदी कायद्यामुळे मृत्यू पावलेल्या डॉ. सविता हलप्पनवार यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

असो, व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड ‘मुझे कोई टोको नही, मुझे कोई रोके नही, मेरी मर्जी’ असे प्रथमदर्शनी दिसणारे पाश्चिमात्य आयुष्य! यामुळे कदाचित बहुतेकांना पाश्चिमात्य आयुष्याचे वेध लागलेले दिसतात. अर्थात याला अपवाद आहेतच. पण, मुद्दा असा आहे की, तोकडे कपडे आणि नीतिमत्तेच्या पल्याडचे जगणे वगैरे जी पाश्चिमात्य महिलांसंबंधी आपल्याकडे संकल्पना असते, त्या संकल्पनेच्या पलीकडे पाश्चिमात्य राष्ट्रातील महिलांच्या वेदनेचा टाहो कुणाला कधी ऐकू येईल का? बाकी आयर्लंडचे अभिनंदन!

 

सीबीएसईमध्ये मुलींची बाजी

बाबांनी आईला मारलं, नंतर झोक्याला टांगून दिलं.” (म्हणजे फासावर लटकावले) चार वर्षांच्या चिमुरडीने आईच्या हत्येचे गूढ निरागसपणे उकलले. वाशिम जिल्ह्यातली ही घटना. पत्नीला तिन्ही वेळा मुलीच झाल्या म्हणून पतीचा संताप अनावर झाला. “तू मुलींनाच का जन्म देतेस,” म्हणून त्याने निष्पाप पत्नीची हत्या केली. शब्दातीत... जणू मुलगी जन्माला येणे म्हणजे आकाश कोसळणे. छे! मुलींशिवाय, स्त्रीशिवाय हे जग अपूर्णच आहे, ही जाणीव असतानाही मुलींच्या जन्माला नाकारणाऱ्या नतद्रष्टांच्या मूर्खपणावर संताप येतो. ‘लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाच्या निष्कर्षानुसार, भारतात दरवर्षी पाच वर्षांखालील २लाख ३९ हजार मुली मृत पावतात. का? कशा? त्याची कारणं ‘नरेची केला हीन किती नर’ हेच असावे. अर्थात, मुलगी परक्याचं धन, मुली वंशाचा दिवा नसतात वगैरे नेहमीचीच मळलेली कारणे छोट्या मुलींच्या मृत्यूस या ना त्या आयामातून कारणीभूत असणारच.

जसजसे जग बदलत आहे, तसतसे स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्येही बदल होत आहेत. मुलगी जन्माला येऊ नये म्हणून जीवाचा आटापिटा करणाऱ्या मूर्ख आणि क्रूर लोकसमजाची गाडी पुढेही सुरूच राहते. मुलींनी जास्त शिकू नये, शिकलेच तर उच्चशिक्षित वर मिळावा यासाठी शिकावे, ही भावना तर दृढच. त्यातही हुंडा, मानपान यांचा राक्षस वधुकडच्यांच्या मानेवर बसलेला आहेच. नुकतीच नागपूरला घडलेली घटना याची विदारकता स्पष्ट करते. साखरपुड्यानंतर वराने नियोजित वधूला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. तसे केले नाही तर लग्न मोडण्याची धमकी दिली.

लग्न मोडले तर आईबाबांना त्रास होणार, घरच्यांची इज्जत वगैरे जाणार, त्यापेक्षा नियोजित वराची मागणी त्या वधूने नाईलाजाने मान्य केली. वधू जाळ्यात फसल्यानंतर वराने वधुपित्याकडे अवास्तव हुंड्याची मागणी केली. तसेच हुंडा दिला नाही तर लग्न मोडण्याची धमकी दिली. वधुसाठी इकडे आड तिकडे विहीर अशीच परिस्थिती. बातमी अपवादात्मक असेल, पण ही मानसिकता या ना त्या रूपात समाजात वावरत आहेच. वधुपिता म्हणजे आयता मिळालेला बकरा, त्याची मुलगी म्हणजे हक्काची वसुली. हा घाणेरडा समज कधी दूर होईल? असो. आजही भारतीय स्त्रीसमोर असंख्य प्रश्न आहेत. तरीसुद्धा त्यातून आपल्या स्वबळावर मार्ग काढत आपले अस्तित्व स्वीकारायला लावणारी स्त्रीशक्तीही आहेच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आज जाहीर झालेला सीबीएसईचा निकाल आणि त्यामध्ये मुलींनी मारलेली बाजी.. होय ना?