आठवते तुझी ती उडी !
महा एमटीबी   28-May-2018
 

 
 
मार्सेल्स; ८ जुलै १९१० सकाळी साडेसहाच्या सुमारास मोरिया बोटीच्या शौचकूपातील बारा इंची पोर्टहोलमधून एका सत्तावीस वर्षीय युवकाने झेप घेतली सागराकडे अन् विस्मित होत सारे जग ओरडले व्वा! सावरकर व्वा!!
 
अरे एका उडीत तू केवळ साठ यार्डाचे; एकशे ऐंशी फुटाचे अंतर कापीत ब्रिटिश साम्राज्यंच पार कापलंस| कारण ते अंतर नव्हतं केवळ बोटीतून किनार्‍याचं; ते अंतर होतं बंदीवासातून मुक्ततेचं| पारतंत्र्यातून स्वातंत्र्याचं |
 
सहस्र गोर्‍या हातांनी तुझ्या देशावर चालविलेला अत्याचार संपविण्यासाठी तू निधड्या छातीने पोहोचलास त्याच्या राजधानीत; लंडनमध्ये| तुझ्या पदरवाने सारं साम्राज्य थरकापलं| श्यामजी कृष्ण वर्मा, मादाम कामा, लाला हरदयाळ, वी वी एस अय्यर, वीरेंद्रनाथ चटोपाध्याय, निरंजन पाल, हरनामसिंग वा. ब. राणा सार्‍यांचा बोलविता धनी तू आहेस अन् मदनलाला धिंग्रा, अनंत कान्हेरेंचा करविता धनीही तूच आहेस हे इंग्रजांनी ओळखलं नि तुला बंदिस्त बनवून जमले तर फासाकडे; नाहीच जमले तर काळ्यापाण्याकडे न्यायला इंग्रज सरकार हिंदुस्थानकडे निघाले|
 
आपण वादळाला नेतोय हे ओळखून डोळ्यात तेल घालून ते तुला नेत होते - पार्कर, पावर, महंमद सिद्दीकी व अमरसिंग क्षणभरही तुला नजरेआड होऊ देत नव्हते| असे असताना शौचालयांतील केवळ दोन मिनिटांच्या उसंतीत तू हा पराक्रम साधलास| तुझ्या तेजस्वी स्पर्शाने तो सागरही चरकला ! त्याला याद आली अगस्तिच्या स्पर्शाची| थरकापत त्यानं तुला किनार्‍यावर पोहोचवलं| मातृभूमीच्या मुक्ततेच्या ध्यासांत रंगलेल्या तुझा स्पर्श होताच तो किनारा स्वतःशीच पुटपुटला धन्य ! धन्य !! धन्य !!!
 
अरे हे काय ? त्या किनार्‍यावर ना तुझे ते दिव्यव्रतधारी अनुयायी दिसताहेत ना सहकारी| तरी तूं धावत रहा. तुझ्या धावण्यात भारताचा स्वर्ग आहे! भारताचे स्वातंत्र्य आहे !! भारताचे भाग्य आहे !!! थांब! तो बघ फ्रेंच पोलीस| जा गाठ त्याला, हो त्याच्या स्वाधीन| हो फ्रेंचांचा राजकीय आश्रित | सूट ब्रिटिशांच्या फंदातून| शाब्बास ! पटकन गाठ त्याला|
 
हे काय???... घात झाला | घात.. घात... वज्राघात !! दोन-चार पेनीच्या लालचीने त्याने तुला इंग्रजांच्या स्वाधीन केले| हाय हाय | काय हा सौदा ! दोन-चार आण्यात देशाच्या सार्वभौमत्वाचा; नेपोलियनच्या देशाच्या सार्वभौमत्त्वाचा सौदा| भारताच्या भाग्यविधात्याचा लिलाव|
 
फ्रान्सच्या स्वतंत्र भूमीवर पाय रोवून आंतरराष्ट्रीय कायद्याची तक्रार करीत तूं जगातील सार्‍या राष्ट्रांना रोकडा सवाल केलास, ‘बोला हो| बोला हो| सर्व सभय राष्ट्रांनो! बोला हो| मी आता फ्रांसचा राजकीय आश्रित ना| मग इंग्रजांच्या ताब्यात कां?’ तुला प्रत्त्युत्तर देत फ्रेंच मुत्सद्दी जां जोरे, कार्ल मार्क्सचा नातू जां लोंगे यांनी उच्चरवाने शब्द उच्चारले, ‘हा तर फ्रेंचांच्या सार्वभौमत्वाचा सौदा| भारताच्या मॅझिनीचा घात |‘ फ्रेंच संसदेत तो घुमला ला ह्युमानाईट, ला तॉं, देबा, ऍक्शन, ऑब्झर्वर, डेली मेल, पोस्ट इ फ्रेंच, इंग्लिश, जर्मन वृत्तपत्रांनी जगभर तो घुमवला| यच्चयावत युरोपियन जगाने युरोपियन इंग्रजांनाच धमकावलं, ‘सावरकरांना फ्रांसच्या स्वाधीन करा’| या कानठळ्या इग्लंडच्या संसदेत बसल्या| समाजवादी नेते प्रो हिंडमन, गाय डी आल्ड्रेड तुझ्या बाजूने उभे राहिले| फ्रांसने इंग्रज सरकारकडे तुझी मागणी केली| ब्रिटिश साम्राज्य पार हादरुन गेले| प्रकरण हेगच्या आंतरराष्ट्रीय लवादाकडे पोहोचले| सावरकरांचा; भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा प्रश्न हेगला पोहोचला| फ्रेंच पंतप्रधान ब्रिआँच्या कचखाऊ धोरणामुळे लवादाने निर्णय दिला, ‘सावरकर इग्लंडकडेच राहतील’| फ्रेंचाचे सार्वभौमत्त्व हेगच्या वेशीवर टांगल्या गेले| भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नायकाचा गळा हेगच्या अन्यायालयात घोटल्या गेला | फ्रेंच पंतप्रधान कुचकामी ठरला, मात्र फ्रेंच सार्वभौमत्त्वाचे निशान पेलीत; सावरकरांचा जयघोष करीत फ्रेंच जनता भडकली| त्या आगीत अवघ्या तिस-या दिवशी ब्रिआँचे पंतप्रधानपद जळून खाक झाले| तुझ्या उडीच्या प्रलयात फ्रेंच पंतप्रधानाच्या पदाचा बळी गेला| हेगच्या आंतरराष्ट्रीय अन्यायालयाची लक्तरं जगाच्या बाजारात टांगल्या गेली ! व्वा रे व्वा! तुझी उडी ! तुझा पराक्रम !!
 
तुझ्या उडीने सार्‍या जगाला कळाले भारत नावाचं राष्ट्र अजून जिवंत आहे. भारताची स्वातंत्र्यलालसा अद्यापि लोपली नाही. भारताचे पौरुष अद्यापि लयास गेलेले नाही !!! केवळ एकाच झेपेत तू हे साधलंस्| म्हणूनच कोलांट्या उड्यांवर उड्या घेणार्‍या आजच्या राजकारण्यांच्या काळातही तुझ्या राष्ट्रकारणासाठी घेतलेल्या उडीचं स्मरण आम्हाला मोहरुन टाकते; पुलकित करते|
  
(लेखक मनोचिकित्सक व दशग्रंथी सावरकर सन्मानाने सन्मानित आहे.)
 
 
 
 
- डॉ नीरज श्याम देव
मो.९८६०००३००२)