समाजसुधारक नि समाज संघटक
महा एमटीबी   28-May-2018
 

 
 
 
 
सावरकरांचे आवेश नि सामर्थ्यशील भाषणाने स्वतः दंडाधिकारीही इतका प्रभावित झाला की, आपण कोणत्या भूमिकेत सभेला उपस्थित आहोत हे साफ विसरुन तो उभा राहिला नि उद्गारला, ‘‘आता याहून कसली नि कोणाची खात्री पटवून द्यायची शिल्लक उरली आहे ?’’ कोणीही पुढे आला नाही. सावरकरांचा तो अजोड विजय होता.
 
 
रत्नागिरीजवळ शिरगावची ही कथा, सावरकर तेथे राहात होते. त्या गावचा उत्साही कार्यकर्ता महादेव लक्ष्मण गुरव यांनी श्री हनुमानाच्या मंदिरात देवाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सावरकरांना बोलाविले. सावरकरांनी त्याला पटवून दिल्यामुळे त्या नवीन मंदिराभोवती पालखीच्या प्रदक्षिणेच्या वेळी महार, मांग आदी सर्व हिंदूना समाविष्ट करुन घेण्याचे महादेव गुरव यांनी मान्य केले. प्राणप्रतिष्ठेच्या वेळी सर्वांना भजनात भाग घेण्याचीही मोकळीक देण्यात आली. रत्नागिरी येथील महार, चांभार यांचे भजनी मेळे या उत्सवासाठी शिरगावला आणण्यात आले. सीतारामपंत, पटवर्धन, आगाशे, शास्त्री आदी मंडळीही होती.
 
 
याप्रसंगी सावरकर म्हणाले, अस्पृश्य समजल्या जाणार्‍या हिंदूस देवाची पूजा करण्याचा इतर हिंदूंप्रमानेच निसर्गसिद्ध अधिकार आहे. तो त्यास उपभोगू देणे हा खरा धर्म. भव्य आणि श्रीमंत मंदिरापेक्षाही सर्व हिंदूंना जेथे प्रदक्षिणा घालता येते ते छोटसे मंदीर मला अधिक महत्त्वाचे वाटते. याहीपुढे जाऊन देवाच्या पायावर वाटेल त्या हिंदूंना जेव्हा आपले डोके टेकण्याचा अधिकार मिळेल तेव्हा त्याला आपल्या धर्माविषयी, समाजाविषयी महत्त्व वाटू लागेल.
 
 
ह्या समारंभासाठी सावरकरांनी एक विशेष गीत रचले. त्यातील काही ओळी अशा -
 
‘‘तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू
तो महादेवजी पिता आपुला चला तयाला वंदू ॥
उभयांनी दोष अभयांचे | खोडावे
द्वेषासि दुष्ट रूढीसी | सोडावे
सख्यासि आईच्यासाठी | जोवाडे
आम्ही अपराध विरुनि प्रेमा पुन्हा पुन्हा सांधू ॥
 
 
असो, येथे शतकातली तिथीप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजयंतीच्या दिवशी झालेल्या भाषणात सावरकर म्हणाले, शिवाजी महाराजांचा उत्सव करुन ह्या समाजाला त्याच्या खर्‍या रक्ताची नि पराक्रमी पूर्वजांची जाणिव करुन दिली पाहिजे. शिवाजी महाराजांचा ज्यांना थोडा तरी अभिमान आहे त्यांनी ह्या एका वर्षात १) लाठी, दांडपट्टा आणि तत्सम विषयांचे शिक्षण देण्यासाठी एक आखाडा उघडावा. २) सार्वजनिक व्यवहारात अस्पृश्यता न मानण्याचा निश्‍चय करावा आणि ३) शक्यतो स्वदेशी वस्तुच वापरण्याचा निर्धार करावा (इ.स.१९२५). १९२९ च्या नोव्हेबर महिन्यात एक दूरगामी महत्त्वाची घटना घडून आली. सार्‍या शहरात मोठी खळबळ उडाली. विठोबाच्या देवळात अस्पृश्यांना प्रवेश देण्याच्या प्रश्‍नावर त्याच देवळात सभा भरावयाची होती.
 
 
सभा शांततेने पार पाडावी म्हणून खास आदेशानुसार जिल्हादंडाधिकारी बंदोबस्त ठेवण्यासाठी सभास्थानी जातीने उपस्थित राहिला होता. सभेत सावरकरांनी आपली बाजू इतक्या बिनतोड युक्तिवादाने पटवून दिली की, विरोधकांच्या मनात वावरणार्‍या सर्व शंकाकुशंका नि कचरत्या कल्पना पार वितळून गेल्या. मावळता विरोध नि कानठळ्या बसविणारा जयजयकार यांच्या घोषात एकेक पाऊल पुढे टाकीत कृतज्ञ भावाने ‘एक देव, एक देश, एक आशा| एक जाती, एक जीव, एक भाषा| ’ यांचे यशोगीत सुरेख स्वरात गात गात अस्पृश्यांनी विठोबाच्या मंदिरात प्रवेश केला. देवळात भरलेल्या त्या भरगच्च सभेने भावपूर्ण अंतःकरणाने आणि भक्तीपूर्ण दृष्टीने, हिंदुस्थानच्या इतिहासात अशा तर्‍हेने प्रथमच घडून आलेले ते ऐतिहासिक महत्त्वाचे दृष्य पाहिले. युगानुयुगे दुःख सोशीत आलेले ते जीव, गीत गात गात पुढे चाललेल्या आपल्या मुलांच्या मागोमाग जेव्हा मंदिराची एकेक पायरी चढू लागले तेव्हा त्यांचे हृदय भरुन आले आणि डोळ्यात तेज चमकू लागले. या प्रसंगानिमित्त सावरकरांनी एक खास गीत लिहिले त्यात शेवटी ते म्हणतात,
 
 
हे सूतक युगांचे फिटले ॥ हो ॥
विधिलिखीत विटाळहि फिटले ॥ हो ॥
जन्मांचे भांडण मिटले ॥ हो ॥
शत्रुंचे जाळे तुटले ॥ हो ॥
आम्ही शतकांचे दास ॥ आज सहकारी ॥
आभार जाहले भारी ॥
 
 
 
 
 
- सु.ह.जोशी, पुणे.
मोबा.९९२२४१९२१०