हिंदुहृदयसम्राट ‘मोअर ईक्वल’ सावरकर
महा एमटीबी   28-May-2018
 

 
 
‘‘नको त्या ठिकाणी सद्गुणांचा अतिरेक माणुसकीला घातक ठरतो. परधर्मसहिष्णुता हा सद्गुण आहे. जर तो ‘परधर्म’ आपल्या स्वधर्माशीही सहिष्णुतेने वागणारा असेल तर आणि तरच अशा परधर्माशी आपण सहिष्णुतेने वागणं हा सद्गुण होऊ शकतो. परंतु हा देशकालपात्राचा विवेक न करता, हिंदू धर्माचा निर्दय विनाश, काफरांचा उच्छेद हाच आमचा धर्म असे म्हणणार्‍या मुस्लिम किंवा ख्रिश्‍चन धर्मास ती परधर्मसहिष्णुतेची व्याख्या लागू पडत नाही, हे कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे’’ या ऊर्जस्वल मंत्राची प्रचिती स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची आज १३५ वी जयंती साजरी करताना निश्‍चितच येते.
 
परिवर्तन हा प्रकृतीचा नियम आहे, तो भारताच्या इतिहासातही घडला. कॉंग्रेसेतर विचारसरणीचे नवे सरकार आले. या सरकारला, आधीच्या सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या महनीय व्यक्तींबद्दल आकस नव्हता, द्वेष नव्हता. किंबहुना त्यांच्या राष्ट्रभक्तीबद्दल कृतज्ञताच होती. त्यामुळेच, गेल्या चार वर्षांत पंडित दीनदयाळ उपाध्याय, डॉ. हेडगेवार, स्वातंत्र्यवीर सावरकर, ही नावे लोकांपर्यंत जाऊन पोहोचली आहेत. या लोकांनी काय केले, काय भोगले हे आता कुठे लोकांना हळूहळू समजू लागले आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, की या उपेक्षित राष्ट्रपुरुषांचे ग्रहण हळूहळू सुटतांना दिसते आहे.
 
असा एकही देश नाही, ज्या देशाच्या इतिहासात उपेक्षित राष्ट्रपुरुषांची किंवा व्यक्तींची यादी नसेल. असं म्हणतात की, इतिहास नेहमी जेते लिहितात, त्यामुळे तो त्यांना सोयीचा असाच लिहिला जातो. ही गोष्ट जशी दोन वेगवेगळ्या देशांच्या बाबतीत खरी आहे, तशीच एकाच देशातील दोन वेगवेगळ्या विचारसरणीच्या नेत्यांनाही लागू आहे. यापैकी जो नेता सत्तेमध्ये येतो, आणि बराच काळ राहतो, त्या नेत्याला आणि त्याच्याच विचारसरणीला सोयीचा असाच इतिहास नोंदण्याकडे सगळ्यांचा कल असतो. ही प्रत्येक देशाचीच कहाणी आहे. म्हणूनच रशियाच्या इतिहासातून ट्रॉट्स्की खड्यासारखा बाजूला फेकला जातो; लेनिन आणि स्टालिन येतात आणि मग कालांतराने तेच लेनिन आणि स्टालिनसुद्धा बाजूला पडतात, त्यांचे पुतळे फोडले जातात. असाच प्रकार भारताच्या इतिहासात घडलेला आहे. स्वातंत्र्यानंतर ज्या विचारसरणीला सत्ता मिळाली, त्या कॉंग्रेसच्या सरकारने ठराविक नेत्यांना फक्त मोठे करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. लोकप्रियतेत त्यांच्या जवळपास पोहोचू शकतील असे जे जे नेते त्यांना वाटले, त्या नेत्यांना ठरवून योजनाबद्ध रीतीने खुजे करण्याचा किंवा खलनायकी रूप देण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर गेली अनके वर्ष झाला. योगायोगाने एकाच पक्षाचे सरकार खूप प्रदीर्घ काळ सत्तेत राहिल्यामुळे विशिष्ट नेत्यांना उपेक्षेने मारण्याचा हा कार्यक्रम वर्षानुवर्षे निर्वेधपणे चालला.
 
जॉर्ज ओर्वेलच्या ‘अॅनिमल फार्म’ या जगप्रसिद्ध कादंबरीमध्ये एक जगप्रसिद्ध वाक्य आहे- ‘ऑल अॅनिमल्स आर ईक्वल, बट सम ऑफ देम आर मोअर ईक्वल...’ यातील उपरोध सार्‍या जगाला माहित आहे. कॉंग्रेसच्या राजवटीतील उपेक्षित किंवा तिरस्कृत नेत्यांची यादी काही थोडीथोडकी नाही. त्यात अनेक लोक आहेत. उपेक्षा आणि तिरस्कार त्या सार्‍यांनाच सहन करावा लागलेला आहे. परंतु, या उपेक्षितांच्या यादीतही स्वातंत्र्यवीर सावरकर हे ‘मोअर ईक्वल’ आहेत. मला आठवतं त्याप्रमाणे, अगदी आता आतापर्यंत सावरकरांचे नाव आदराने घेणे म्हणजे महापाप होते. त्यांच्याइतका तिरस्कार सरकारी पातळीवर अन्य कोणाचाच झाला नसेल. ज्यांचा नशिबावर विश्वास आहे, ते म्हणतील की, ‘शेवटी सावरकरांचे नशीब!’ स्वतः सावरकरांप्रमाणेच जे नशिबाला मानत नाहीत, ते म्हणतील की, ही राज्यकर्त्यांची वागण्याची अपेक्षित पद्धत आहे.’ कसेही असो, पण शेवटी परिणाम हा झाला की, सावरकरांविषयी सर्वसामान्य जनतेमध्ये एकतर अज्ञान राहिले, किंवा मग, योजनाबद्ध गैरसमज पसरवले गेले. जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात, कोणत्याही काळात, कोणत्याही वंशात अशी एकही व्यक्ती झाली नसेल, की जिचे सर्व निर्णय संपूर्ण आयुष्यभर कायम बरोबर राहिले. महात्मा गांधींनी आपल्या आत्मचरित्रात स्वतःच्या चुकांना ‘हिमालयन ब्लंडर्स’ असं म्हटलं आहे. त्यामुळे, सावरकरांची प्रत्येक कृती, प्रत्येक निर्णय हा निर्विवादपणे बरोबर होता, असा दावा नाही. पण, एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन करतांना त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्व बाजूंचा एकत्रित विचार झाला पाहिजे. सावरकरांच्या कोणत्याही कृतीकडे आतापर्यंत सरकारने व सरकारी पंडितांनी मुद्दाम दूषित नजरेनेच बघितले. सोशल मीडियाचा उद्रेक झालेला नव्हता त्या काळातही सावरकरांची बदनामी मोठ्या हौसेने आणि हिरीरीने करण्यात आली. त्याला उत्तर देऊ शकणारे मुळातच मोजके लोक होते. त्यांना संदर्भासाठी साधने मर्यादित होती. त्यांची भूमिका किंवा स्पष्टीकरणे छापण्यास कोणी तयार नसायचे. कारण सरकारी अवकृपेची भीती होती. त्यामुळे, सावरकर जनतेपर्यंत जे पोहोचले, ते प्रामुख्याने सरकारी यंत्रणेला अपेक्षित असलेलेच सावरकर पोहोचले.
 
परिवर्तन हा प्रकृतीचा नियम आहे, तो भारताच्या इतिहासातही घडला. कॉंग्रेसेतर विचारसरणीचे नवे सरकार आले. या सरकारला, आधीच्या सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या महनीय व्यक्तींबद्दल आकस नव्हता, द्वेष नव्हता. किंबहुना त्यांच्या राष्ट्रभक्तीबद्दल कृतज्ञताच होती. त्यामुळेच, गेल्या चार वर्षांत पंडित दीनदयाळ उपाध्याय, डॉ. हेडगेवार, स्वातंत्र्यवीर सावरकर, ही नावे लोकांपर्यंत जाऊन पोहोचली आहेत. या लोकांनी काय केले, काय भोगले हे आता कुठे लोकांना हळूहळू समजू लागले आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, की या उपेक्षित राष्ट्रपुरुषांचे ग्रहण हळूहळू सुटतांना दिसते आहे.
 
यावर्षीपासून शासकीय पातळीवर स्वा. सावरकर जयंती साजरी होत आहे, ही सर्व राष्ट्रप्रेमी लोकांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. यावर्षी विविध वृत्तपत्रांतून, मासिकांमधून, सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणात दिसणारे सावरकरांवरील लेख, हेच दर्शवतात की ‘सावरकर’ या नावावरील सरकारी बंदी आता उठली आहे. इंग्रज सरकारने सावरकर या व्यक्तीला काळ्या पाण्यावर पाठवले होते; कॉंग्रेस सरकारने सावरकर या नावाला काळ्या पाण्यावर पाठवल. आपल्या सुदैवाने सावरकर या नावाचीसुद्धा काळ्या पाण्यावरून सुटका होतांना दिसत आहे. त्या माणसाचा, त्याच्या कार्याचा, त्याच्या विचारांचा भरपूर अभ्यास व्हावा, चर्चा व्हावी, मूल्यमापन व्हावे. यात काहीही गैर नाही. फक्त, त्यांना दडपून टाकणे गैर होते. तो कालखंड आता संपला याबद्दल एक सावरकरप्रेमी म्हणून मी स्वतःचे आणि देशवासीयांचे मनापासून अभिनंदन करतो.
 
(लेखक सावरकर साहित्याचे व्यासंगी अभ्यासक आणि व्याख्याते आहेत.)
 
 
 
अॅड.सुशील अ.अत्रे
मोबा.९४२१२२२०००)